कॉलेजचे दिवस भुर्रकन उडून गेले, याची जाणीव फायनलचा अभ्यास करताना प्रकर्षांने होते. प्लेसमेंट, जॉब, करिअर हे प्रश्न डोक्यात घोंघावत असतानाच कॉलेजचे ते मखमली, बिनधास्त, हळवे, उनाड, धमाल दिवस आठवत राहतात आत. फेअरवेलच्या दिवशी निरोपाचे भोंगे वाजू लागले, की जहाज किनारा सोडण्याची वेळ जवळ आली समजायचं. एक किनारा सोडताना उमजतं.. समुद्र अजून शिल्लक आहे. आणखी बरेच किनारे धुंडाळायचेत.
काहीच दिवसांची सोबती असलेल्या, कँटीनची सवय जडलेल्या जागेवर, चिम्या एकटाच उशिरापर्यंत बसून होता. पूर्वापार चालत आलेल्या सवयीप्रमाणे, परीक्षेच्या आदल्या दिवशीच करायच्या अभ्यासाचं पुस्तक हातात होतं, पण या वेळी मन मात्र केव्हाच ठिकाणाहून पसार होतं. त्याला उगाच हवा दमट, आभाळ दाटून आल्यासारखं वाटलं, उगाच! आपल्या श्वासाइतक्याच सवयीच्या झालेल्या, सोयीपुरता ‘कॉलेज’ संबोधलेल्या, घरासमान वास्तूला आपण अलविदा करणार; या विचारानेच चिम्याला सतत अस्वस्थ वाटू लागलं आणि पाणी कधीच संपलेला पेला, शेवटच्या थेंबाच्या आशेने तिसऱ्यांदा ओठांना टेकवला. कँटीनमधला पोऱ्या परत सांगायला आला, ‘दादा, चल कँटीन बंद करायचंय.’ चिम्यानं ‘फक्त पाचच मिनिटांचा’ प्रस्ताव पुन:श्च मांडून तो पास करून घेतला. त्या पाचच मिनिटांत, पाच वर्षांचं त्याला जगायचं होतं. चिम्या कधी हळवा होत नसे, का कुणास ठाऊक पण आज तो झाला!

त्याच्या डोळ्यांच्या बहुल्यांसमोर ७० एम्एम् चित्रपट प्रसंगानुरूप सरकत गेला. त्यामध्ये आठवण झाली कॉलेजच्या पहिल्या शायनिंग दिवसाची, खरंच शाळेच्या गणवेशातून मिळालेली मुक्तता पुरेपूर लुटली होती, त्यानंतर आपल्या स्वभावानुसार धुंडाळलेले मित्र, गडद होत गेलेली मैत्री, बुडवलेले तास, घरात पोहोचलेली प्रिन्सिपलची तक्रार-पत्रं, ती लपवताना झालेली तारांबळ, पहिल्यांदाच मनापासून भावलेलं कुणी आणि पहिल्यांदाच मिळालेला सणसणीत नकारही. उभारलेली मंडळं, घेतलेल्या स्पर्धा, हरलेली-जिंकलेली शेकडो बक्षिसं, कॉलेजच्या मॅनेजमेंटने काढून घेतलेला पािठबा, तेव्हा स्वत: दारोदार फिरून उभे केलेले स्पॉन्सर्स, सारं सारं लख्ख लक्षात. अगदी काल घडून गेल्यासारखं टवटवीत!

परंतु, झोळीतून सांडलेल्या आठवणींच्या पसाऱ्यानं खोली भरलेली असताना, त्यात त्याला चमकताना दिसला एक ‘चिंता’मणी! ‘आता पुढे काय?’ हा प्रश्न दररोज किमान वीस वेळा ऐकल्यानंतर, चिम्याला खरंच वाटू लागलं, ‘आता पुढे काय?’! शिक्षणाची तत्सम शाखा निवडण्याचं कारण, ती (शाखा) फार आवडते असंही नाही किंवा फार पुढचा विचार करून ही निवडलीये अशातलाही भाग नाही. निर्णायक क्षणी बौद्धिक चाचणीने हा कौल दिला, तो नशिबाचा कौल मानून आम्ही सहकुटुंब तो स्वीकारला, आणि म्हणून आज आपण इथे.

गरजांचा क्रम आता बदललाय. पूर्वी कधी तरी फॅशन मॅगझीन वाचणारे आपण, ‘जॉब ओपनिंग’ या नावाचं, पूर्वी भज्यांतील तेल काढायला वापरलेलं पान आज आवर्जून वाचतो. चार मित्र-मैत्रिणींना फोन केल्यावर बातम्या कळतात, ‘भाय, मुझे तो नोकरी लग गया, मी ‘एमबीए’ची तयारी सुरू केली, आता बापाचा बिझिनेस बघणार,’ हे असलं काही ऐकल्यावर मनावरचा ताण सर्वाधिक वाढतो आणि भलं मोठं प्रश्नचिन्ह चिकटलेला एक प्रश्न मनात उभा राहतो, ‘आता पुढे काय?’

कालकालपर्यंत वाटत असणारी सुरक्षितता आज अचानक विरळ झालेली जाणवत होती. एकदम कासवावरचं टणक कवच काढून घेतल्यावर त्याला जसं वाटेल तशाच प्रकारे चिम्यालाही कुठे तरी आर्थिक, मानसिक, सामाजिक असुरक्षिततेचे भास आता होऊ लागले. घरून निघताना बाबांकडे हल्ली पैसे मागताना कससंच होतं, बरोबरच्याच काही मित्रांची, त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील चाललेली धावपळ बघून, आपण काहीच करत नाही, अशा विचारांचं मळभ मेंदू भरून टाकतो, ‘आयुष्यात काही तरी मोठं करायचं’ हे तर झालंच पण अजून काय करायचं हेच न समजल्याने सगळं जग ठप्प झाल्याप्रमाणे भासू लागतं. ‘आईशप्पथ, आयुष्याची हिरोशिमा-नागासाकी झाली यार’ असं कधी कधी मनात येतं.

अशातच पायापाशी येतो, आता चांगलाच ओळखीचा झालेला मोत्या. कॉलेजमध्ये आलो तेव्हा नुकताच जन्माला आला होता पठ्ठय़ा! आता पोरं म्हणतात याची मिसेस प्रेग्नंट आहे. ‘यांचं बरं असतं राव,’ असा निरुपयोगी विचार मनात चटकन कारण नसताना येऊन गेला. तेव्हा मन पुन्हा मनाला समजावू लागलं, ‘अरे, हा काही शेवटचा दिवस नाही आजचा. अजून परीक्षा व्हायचीये, निकाल लागायचाय, तुझ्याकडे अगदी बर्राच वेळ आहे, कर आराम कर.’ तेव्हाच दुसरं मग गचांडी धरून समोर उभे, ‘ऊठ, कामाला लाग, आत्ता मेहनत, तर पुढे आराम. आत्ता आराम, पुढे जन्मभर कष्ट लक्षात ठेव.’ अशा वेळी आपल्याला हृदय आहे आणि ते धडधडतंय याचा प्रत्यक्ष प्रत्यय येऊन जातो, तसा चिम्याला तो बऱ्याचदा येऊन गेलाय.

चिम्याला स्वत:ला कळेना, आत्ता वाटत असलेल्या भावनेला मराठी शब्दकोशातील नेमका कुठला शब्द चपखल बसेल? कारण एकीकडे मनात आयुष्यभराची साठवण झालेले आठवणीतले क्षण आणि काहीच दिवसांच्या पल्याड उभं असलेलं व्यवहारी जग. तेवढय़ात त्याला बहाल झालेली ‘पाचच’ मिनिटं संपली हे समोर आशेने उभ्या असलेल्या पोऱ्याच्या सुमुखावरून दिसलं. त्याने एकही शब्द न वाचलेले उद्याच्या परीक्षेचे कागद बॅगेत भरले आणि पुन्हा एकदा पाणी संपलेल्या पेल्यावर चवथ्यांदा ओठ टेकवले, अजूनही शेवटच्या थेंबाची आशा ठेवून तो बाहेर पडला.

एका शहराला विश्रांतीसाठी लगडलेल्या जहाजाच्या निरोपाचे भोंगे आता वाजू लागले, हीच खूण होती जहाज किनारा सोडणार याची! परंतु अजूनही समुद्र शिल्लक आहे. नवं शहर पुकारत आहे. अजूनही!

– आदित्य दवणे