पाककृतींच्या यूटय़ूब आता पुस्तकांत!
सर्वाधिक खप होणाऱ्या पुस्तकांची वर्गवारी पाहिल्यास कोणाही नामवंत लेखकापेक्षा पाकशास्त्र आणि सौंदर्य या विषयावरील पुस्तकांचा क्रम सगळ्यात पहिला लागतो, असे म्हटले जाते. पाकशास्त्राने ही आघाडी ‘ई-आवृत्ती’मध्येही कायम ठेवली आहे. यू टय़ूबवर सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या व्हिडिओजमध्येही पाककलेच्या व्हिडिओंनीच पहिला क्रमांक पटकावला आहे. भारतीय पदार्थ बनवण्याच्या रेसिपींना सर्वाधिक प्रेक्षक लाभल्याचेही यानिमित्ताने पुढे आले आहे.
अनेक प्रसिद्ध शेफ आपापल्या रेसिपीज यूटय़ूबवर टाकतात. त्यांना अर्थातच प्रचंड मागणी असते. याचबरोबर अनेक गृहिणी वैयक्तिक पाककृती करून युटय़ूबवर अपलोड करतात. त्यांच्याही व्हिडीओजना देशातूनच नव्हे तर परदेशातून पसंती मिळत असल्याचे युटय़ूबतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
यात २०१३ आणि २०१४ या वर्षांत कोणत्या व्हिडीओजना सर्वाधिक व्’ाूज मिळाले आहेत ते व्हिडिओ तयार करणाऱ्या सेलिब्रेटी शेफ तसेच सामान्य गृहिणींना नुकतेच ‘यूटय़ूब टॉप शेफ’ हा खिताब देऊन गौरविण्यात आले आहे. याचबरोबर त्यांच्या पाककृतींचे एक छोटेखानी पुस्तकही यूटय़ूबतर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये संजीव कपूर, यूटय़ूब ‘वाह शेफ’ या यूटय़ूब वाहिनीचे संजय थुम्मा, हरपाल सिंग सोखी, नोइडा येथील गृहिणी निशा मधुलिका, मुंबईतील गायत्री शर्मा यांचा समावेश आहे.
‘टॉप टेन ट्रेंड’मध्ये पाककृती हा विभाग नेहमीच पहिल्या पाच क्रमांकात असल्याचे यूटय़ूब एशिया पॅसिफिकचे ‘कंटेन्ट आणि ऑपरेशन्स’ विभागचे संचालक गौतम आनंद यांनी सांगितले. दरवर्षी या प्रकारातील प्रेक्षकांची संख्या ४० टक्के वाढत असल्याचेही ते म्हणाले. तर स्वयंपाक हा माझा आवडीचा विषय असून २००७पासून मी पाककृती असणारे संकेतस्थळ सुरू केल्याची माहिती निशा मधुलिका यांनी दिली. लोकांनी घरात अधिकाधिक पदार्थ तयार करावेत यासाठी मी यूटय़ूब वाहिनी सुरू केल्याचे संजय थुम्मा सांगतात.

यूटय़ूबची काही निरीक्षणे
देशात सर्वाधिक पसंती उत्तर भारतीय पदार्थाना असून त्या खालोखाल दक्षिण भारतीय, चायनीज आणि इटालियन पदार्थाचा क्रमांक येतो.
सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या
पाच पाककृती
चिकन करीज,  बिर्याणी,
 पनीर करीज, केक, पिझा
सर्वाधिक शोधल्या गेलेल्या
पाच पाककृती
केक, हलवा, रसगुल्ला, गुलाब जाम, आईस्क्रीम
सर्वाधिक शोधल्या गेलेल्या
पाच न्याहारी पदार्थाच्या कृती
ढोकळा, समोसा, पोहे, कटलेट, पकोडा