डॉ.रिंकी कपूर

आई होणं ही जगातील सगळ्या सुंदर आणि आनंद देणारी घटना असते. त्यामुळे या काळातील प्रत्येक क्षण, काळ हा आठवणींच्या कप्प्यात जपून ठेवायचा असतो. गरोदरपणातील ९ महिन्यांच्या कालावधीत स्त्रियांमध्ये अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. अनेकदा त्यांच्या स्वभावात बदल होतो. चिडचिड होणं, काळजी वाटणं असे बदल सहाजिकच होतात. परंतु, या बदलासोबतच काही शारीरिक बदलही होत असतात. यात अनेकवेळा महिलांचे केस गळतात. त्यामुळे या दिवसांमध्ये केसांची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊयात.

केसांची काळजी कशी घ्याल?

१. शक्यतो हेअर स्टाइल, हेअर स्प्रे यांचा वापर टाळावा.

२. केसांना रंग देणे. हायलाइट्स करणं, केसांवर निरनिराळ्या ट्रिटमेंट करणं बंद करावं.

३. केसांकरिता नैसर्गिक पर्यायांचा वापर करावा.

४. गर्भधारणेदरम्यान किंवा नंतरच्या काळात मिनोऑक्सिडिल हेअर ट्रीटमेंटचा वापर करु नये.

५. केस रंगविण्याकरिता रसायनांचा वापर न करता नैसर्गिक रंगांचा पर्याय निवडा.

६. केसांची निगा राखण्यासाठी संतुलित आहार घ्या. तसेच योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

७. ओले केस विंचरू नका.

८. केस घट्ट बांधू नका.

९. केसांची स्वच्छता राखा.

१०. केसांच्या समस्या टाळण्यासाठी घरगुती उपाय.

केसांच्या आरोग्यासाठी काही घरगुती उपाय

१. केस गळत असल्यास ४ते ५ चमचे अॅलोवेरा जेल( कोरफडचा रस), दोन चमचे एरंडेल तेल आणि एक चमचा ग्लिसरीन हे मिश्रण एकत्र करावे. त्यानंतर ते डोक्याच्या टाळूपासून केसांच्या शेंड्यापर्यंत लावावे. त्यानंतर एक तासाने केस स्वच्छ धुवावे. यामुळे केस मजबूत होऊन चमक वाढते.

२. मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवा. त्यांची पेस्ट करा आणि आपल्या केसांवर लावा. त्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा. त्यामुळे केस वाढतात.

३. कढीपत्त्याची पाने नारळ तेलात उकळा आणि थंड होऊ द्या. हे मिश्रण केस धुण्यापूर्वी १ ते ३ तास आधी वापरा.

४. आपल्या आवडीच्या तेलामध्ये १-२ थेंब तीळ तेल मिसळा आणि केस धुण्यापूर्वी टाळूवर मालिश करा. वेगवेगळ्या आवश्यक तेलांमध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात, केसांच्या वाढीसाठी लव्हेंटर ऑईल चांगले असते. केस दाट होण्यासाठी रोझमेरी तेलाचा वापर करा.

५. योग्य दिनचर्या, संतुलित आहार आणि दैनंदिन व्यायामाने गरोदरपणात तसेच प्रसूतीनंतरही त्वचा आणि केसांचे आरोग्य उत्तम ठेवू शकतो.

(लेखिका डॉ.रिंकी कपूर या द एस्थेटिक क्लिनिक्स’च्या त्वचारोग सल्लागार आणि कॉस्मेटिक त्वचारोग तज्ज्ञ आहेत.)