कुणालाही टाळता न येणारे वृद्धत्व जवळ येऊ लागले की बहुतेकांना मनातून चिंता वाटते, मात्र आता अशा लोकांसाठी खूशखबर आहे. जगातील पहिली ‘वृद्धत्व प्रतिबंधक जिन’ (अँटी-एजिंग जिन) शोधून काढल्याचा दावा ब्रिटनमधील एका कंपनीने केला आहे. पेशीजालातील प्रथिन घटक (कोलाजिन) मिसळलेल्या या अल्कोहोलयुक्त पेयाच्या सेवनामुळे तुम्ही तरुण दिसाल अशी आशा कंपनीने दाखवली आहे.

नव्यानेच बाजारात आलेल्या या पेयाच्या एका बाटलीची किंमत सुमारे ३५ पौंड असून, त्यामुळे सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या कोलोजिनच्या कॅप्सूल्स खाण्याव्यतिरिक्त ‘तारुण्योत्सकांना’ एक आगळा मार्ग उपलब्ध होणार आहे.

मनुष्याचे वय जसजसे वाढत जाते, तसतसे त्याच्या शरीरातील ‘कोलाजिन’ हा संयोजक पेशीजालातील प्रथिन घटक कमी होतो व परिणामी त्याच्या त्वचेचा घट्टपणा कमी होऊन तिच्यावर सुरकुत्या पडू लागतात. त्यामुळेच सौंदर्यप्रसाधनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या ‘कोलाजिन’चे उत्पादन करत असतात.

‘अँटी-एजिन’ नावाचे हे अल्कोहोलयुक्त पेय ब्रिटनमधील बोम्पास अँड पार कंपनीने विकसित केले आहे. ४० टक्के स्पिरिट असलेले हे पेय ‘कॅममाईल’ नावाची सुगंधी वनस्पती आणि चहाच्या झाडांचा सुगंध यांचे मिश्रण आहे. याशिवाय विच-हेझल, नेट्टल, ज्युनिपर, कोथिंबीर व अँजेलिका वनस्पतीचे मूळ हे या पेयाचे इतर घटक आहेत.

सूर्यकिरणांपासून होणारे नुकसान भरून काढणे, खनिजांनी समृद्ध असणे, व्रण तयार होण्यास अटकाव करणे यांसारख्या नवचैतन्य निर्माण करण्याच्या गुणांमुळे या घटकांची निवड करण्यात आली असल्याचे या पेयाची निर्मिती करणाऱ्या वॉर्नर लेझर हॉटेल्सने त्यांच्या संकेतस्थळावर म्हटले आहे.

कोलाजिन हे शरीरात नैसर्गिकरीत्या तयार होत असते, परंतु जसजसे वय वाढत जाते, त्याची निर्मिती कमी होते. त्यामुळेच आपले वृद्धत्व इतरांना दिसू नये अशी खबरदारी घेणाऱ्यांची गरज लक्षात घेऊन त्यांना हे ‘तारुण्यदायी पेय’ उपलब्ध करून देण्यात आले आहे.