दिवसातून केवळ वीस मिनिटे व्यायाम केल्याने स्मरणशक्तीत सुधारणा होत असल्याचा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे. हा अभ्यास वयोमानामुळे उद्भवणाऱ्या स्मृतिभ्रंश सारख्या रोगाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो. सहा आठवडे दिवसातून केवळ २० मिनिटांसाठी कसून व्यायाम केल्याने स्मरणशक्तीत सुधारणा होत असल्याचे कॅनडातील मॅकमास्टर विद्यापीठातील संशोधकांना आढळून आले. या अभ्यासामध्ये सहभागी झालेल्या तरुणांच्या स्मरणशक्तीत कमी कालावधीतच सुधारणा झाल्याचे आढळून आले.

त्याचबरोबर ज्या लोकांना व्यायामाचा अधिक फायदा होतो त्यांच्यामध्ये मेंदूत तयार होणाऱ्या मज्जा ऊतकांच्या वाढीशी संबंधित असलेल्या घटकामध्ये लक्षणीय वाढ झाली. ही प्रथिने मेंदूतील पेशींची वाढ आणि कार्यासाठी जबाबदार असतात. व्यायाम केल्याने या प्रकारच्या स्मरणशक्तीत होणाऱ्या सुधारणेमुळे अ‍ॅरोबिक व्यायामपद्धती आणि उत्तम शैक्षणिक कामगिरीमधील दुवा स्पष्ट होण्यास मदत होईल, असे मॅकमास्टर विद्यापीठाच्या सहायक प्राध्यापिका जेनिफर  हाईस यांनी सांगितले. आपल्या जीवनाच्या उत्तरार्धात, म्हणजे वृद्धावस्थेत स्मृतिभ्रंशामुळे कमकुवत होणाऱ्या स्मरणशक्तीला व्यायामामुळे फायदे होऊ शकतात असे   हाईस यांनी म्हटले. या अभ्यासात ९५ लोकांनी सहभाग घेतला होता. त्यांनी सहा आठवडय़ांचा व्यायाम प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केला. यामध्ये व्यायाम प्रशिक्षण आणि संज्ञात्मक प्रशिक्षणाचा समावेश करण्यात आला होता.

या व्यायामामुळे सहभागी झालेल्यांना हस्तक्षेप स्मृती कार्यात सुधारणा झाल्याचे आढळून आले. वृद्ध प्रौढांच्या स्मरणशक्तीत व्यायामामुळे सकारात्मक बदल आढळून येतात की नाही हे शोधण्यासाठी संशोधकांनी वृद्ध प्रौढांची चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. कॉगनेटिव न्यूरोसायन्स या नियतकालिकात हा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे.