साखरेचा वापर असलेले गोड पदार्थ अधिकाधिक प्रमाणात खाल्ल्यामुळे पुरुषांमध्ये उदासीनता, नैराश्य त्याचप्रमाणे इतर मानसिक आजार उद्भवू शकतात, असे नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानंतर शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

साखरेच्या अतिसेवनामुळे मानवी आयुष्य मोठय़ा प्रमाणात प्रभावित झालेले आहे. मात्र आम्ही केलेल्या संशोधनात साखर आणि मानसिक आजार यांचाही परस्पर संबंध असू शकतो हे आमच्या लक्षात आले. त्याचा पुरुषांवर अधिक परिणाम होतो, असे ब्रिटनमधील लंडन विद्यापीठातील अनिका नपेल यांनी म्हटले आहे.

मानसिक आरोग्यावर प्रभाव टाकणारे अनेक घटक आहेत. मात्र शर्करायुक्त पदार्थ अधिक प्रमाणात खाणे किंवा पेय पिण्यामुळेही मानसिक आरोग्य धोक्यात येत असल्याचे नपेल म्हणाले. १९८३ ते २०१३ या कालावधीत गोड पदार्थ आणि पेयांमुळे पाच हजार पुरुषांचे तर दोन हजार महिलांचे मानसिक आरोग्य बिघडल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. संशोधकांनी रोजच्या आहारातील साखरेचे तीन गटांत वर्गीकरण केले. ६७ ग्रॅम साखरेचे सेवन करणाऱ्या पुरुषांचे पाच वर्षांत २३ टक्के मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. साखरेच्या अतिसेवनामुळे उदासीनता, नैराश्य येण्याची शक्यता अधिक वाढते, असेही संशोधकांनी स्पष्ट केले.