देशात मधुमेह साथीसारखा झपाटय़ाने पसरत आहे. त्यामुळे त्याबाबत तातडीने उपाययोजना करायला हव्यात, असे मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे. देशात सध्या जवळपास साडेसात कोटी मधुमेहाचे रुग्ण असून, आणखी सात कोटी व्यक्तींमध्ये त्याची लक्षणे आहेत. त्यामुळे आपण खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पब्लिक हेल्थचे (हैदराबाद) संचालक जी.व्ही.एस.मूर्ती यांनी स्पष्ट केले.

निम्म्याजणांना त्यांना मधुमेह आहे हेच माहीत नसते. मात्र शरीरात गुंतागुंत निर्माण झाल्यावर त्यांना आजाराचे गांभीर्य लक्षात येते. त्यामुळेच याबाबत जनजागृती हे आपल्यापुढे मोठे आव्हान असल्याचे मूर्ती यांनी सांगितले. जगातील निम्मे मृत्यू केवळ मधुमेहामुळे होत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले.

जगभरात मधुमेहावर ७०० अब्ज डॉलर्स इतका खर्च उपचारांसाठी होतो, तर भारतात हे प्रमाण १० अब्ज डॉलर्स इतके आहे. यात औषधे तसेच उपचाराचा खर्च तसेच आजारी पडल्याने काम करणे अशक्य होते त्यामुळे हा खर्च वाढतो. राज्य सरकारे या आजाराबाबत आता गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. मधुमेह झाल्यानंतर शरीरात जी गुंतागुंत निर्माण होते. ती जर रोखली तर आरोग्य विम्यावर दर महिन्याला जे  पैसे खर्च होतात ते कमी करता येणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. योग्य आहार घेणे, तणावमुक्त जीवन व नियमित व्यायामाद्वारे मधुमेह टाळता येऊ शकतो. अनेक वेळा ध्यानधारण महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.