scorecardresearch

तीन लीटरपेक्षा जास्त पाणी पित असाल तर व्हा सावधान, आरोग्याला होऊ शकतं मोठं नुकसान

वेळच्या वेळी पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतो. पण गरजेपेक्षा जास्त पिणं हे देखील धोकादायक असल्याचा दावा या व्हिडीओमध्ये करण्यात आलाय.

drinking-water-more-alarm-bells-for-heart-kidneys

पाण्याला जीवन म्हटलं जातं. तसंच पाण्यामुळे शरीरातील प्रत्येक क्रिया सुरळीतपणे पार पडत असते. त्यामुळेच पाणी आपल्या शरीरासाठी अत्यंत गरजेचं आहे. पाण्यामुळे शरीराला अनेक पोषकघटकांचा पुरवठा होत असतो. म्हणूनच वेळच्या वेळी पाणी पिणं अत्यंत गरजेचं आहे. पण प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणे शरिरासाठी धोकादायक ठरु शकतं, हे सांगणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

तज्ज्ञांच्या मते, निरोगी शरीरासाठी दिवसातून दोन लिटर ते तीन लिटर पाणी पुरेसे आहे. जर आपण व्यायाम किंवा कठोर परिश्रम घेत असला तर पाच ते सहा लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण तीन लीटरपेक्षा जास्त पाणी पिल्यास आपल्या आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं, असं या व्हायरल व्हिडीओमध्ये सांगण्यात आलंय. या व्हिडीओला आतापर्यंत ९५ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.

ओवर-हायड्रेशनमुळे होऊ शकतं ब्रेन फॉग

पाणी कमी पिल्याने जसा डी-हायड्रेशनचा धोका वाढतो, तसेच शरिरातील पाण्याचे प्रमाण वाढले तर ओवर-हायड्रेशनचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे जसे कमी पाणी पिणे धोकादायक असते, तसे अधिक प्रमाणात पाणी पिणेही धोकादायक असते. अति-हायड्रेशनमुळे ब्रेन फॉग, वजन वाढणं आणि डोकेदुखीचा धोका वाढू शकतो, असं या व्हिडीओमध्ये सांगण्यात आलंय.

न्यूट्रिशनिस्ट रेणू राखेजा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करत हा दावा केला आहे. शरिरात अधिक प्रमाणात पाणी घेण्यात आले आणि जर ते बाहेर काढण्याचे तंत्र बंद असेल, तर शरिरात पाणी साठू शकते. साठलेले पाणी रक्तातील अनेक घटक पातळ करते. त्यामुळे शरिराला हानी होऊ शकते, असं त्यांनी हा व्हिडीओ शेअर करत सांगितलं आहे.

किडनीवर होऊ शकतो परिणाम

तसंच किडनी शरिरातील सर्व पाणी बाहेर टाकण्यास सक्षम नसते. त्यामुळे शरिरातील इलेक्ट्रोलाईटचा ताळमेळ बिघडू लागतो आणि अधिकचे पाणी शरिरात साठू लागते. परिणामी शरिराचे वजन वाढत जाते. आपण दररोज जास्त पाणी पित असाल तर मूत्रपिंडा संदर्भातील अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

याला वॉटर इनटॉक्सिकेशन किंवा वॉटर पॉयझनिंग म्हटलं जातं. यादरम्यान रक्तात ऑक्सिजनची लेवल वाढते ज्यामुळे मृत्यू होण्याचा धोका ओढावू शकतो.

निरोगी शरिरासाठी दिवसातून अडीच ते तीन लिटर पाणी पुरेसे आहे. यात तुम्ही चहा, कॉफी आणि ज्यूस अशा गोष्टींचा समावेश करु शकता. शारीरिक काम करणाऱ्यांसाठी अधिक प्रमाणात द्रव शरिरात घ्यावे लागते. दिवसातून १० ते १२ ग्लास पाणी पिणे आदर्श मानलं जातं. व्यक्तीची उंची, वजन, व्यायामाची पद्धत यावरुन पाण्याच्या प्रमाणात वाढ होऊ शकते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-09-2021 at 18:03 IST
ताज्या बातम्या