आज जगभरात फ्रेंडशिप डे साजरा केला जात आहे. मैत्रीला जातीय रंग रूप नसते, मैत्री एक अतूट नातं जे रक्ताच्या नात्यांपेक्षा ही सरस मानलं जातं. एकमेकांच्या मनात काय चाललं आहे हे न सांगताही ज्याला समजते तोच खरा मित्र. असेच मैत्रीचे एक अनोखे उदाहरण या फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने समोर आले आहे. पुण्याच्या पाषाण मध्ये राहणारे प्रभू राजेंद्र सगट आणि मूकबधिर असलेला कृष्णा ज्ञानोबा शिंदे या दोघांची मैत्री कौतुकास्पद ठरत आहे. कारण यातील एक जण मूकबधिर आहे तर दुसरा सामान्य ऐकू-बोलू शकणारा आहे. पण कृष्णाच्या व्यंगाचे वेगळेपण न मानता प्रभूने त्याच्याशी मैत्री केली आणि ती जपलीही. कृष्णाही आपली ही मैत्री अतिशय उत्तमरितीने जपत आहे. या दोघांतील या अनोख्या मैत्रीला आता १२ वर्षं झाली असून त्यांचे नाते दिवसेंदिवस आणखी घट्ट होत चालले आहे.

कृष्णा ज्ञानोबा शिंदे हा जन्मताच मूकबधिर आहे. त्याला त्याचे कुटुंब सोडून बाकी जग माहीत नव्हते. मग अचानक त्याला प्रभू हा मित्राच्या रुपाने भेटला. वयाच्या पाचव्या वर्षापासून दोघांची घट्ट मैत्री झाली. आज त्यांच्या मैत्रीला तब्बल १२ वर्ष झाली आहेत. दोघांचे वडील एकाच कंपनीत कामाला होते. त्यामुळे कृष्णाला हक्काचा मित्र भेटला, तो त्याच्यावर रागावू शकतो,भांडू शकतो…पण न बोलता. प्रभू सर्वसामान्य मुलांसारखा बोलू आणि ऐकू शकत होता पण कृष्णा जे सांगू पाहत होता ते प्रभूला समजायचे नाही आणि प्रभू जे बोलायाच ते कृष्णापर्यंत पोहोचायचे नाही.

पण मैत्रीत खूप मोठी ताकद असते असे म्हणतात तेच खरं. हळूहळू या दोघांना एकमेकांची भाषा समजायला लागली. कृष्णा आपले म्हणणे प्रभूला इशाऱ्याने समजावून सांगतो आणि प्रभूदेखील ते इशारे अचूक समजून घेतो. त्यामुळे दोघांना संवादात कोणत्याच अडचणी येत नाहीत. तसेच सध्या सोशल मीडियाचे जग असल्याने आता ते दोघे या माध्यमाचाही अतिशय चांगल्या पद्धतीने वापर करायला लागले आहेत. साधारणपणे सामान्य मुलांना मूकबधिर मुलांशी मैत्री करताना काही अडचणी येतात. मात्र प्रभूला अशी कुठलीच अडचण भासत नसल्याचे त्याने ‘लोकसत्ता ऑनलाईन’शी बोलताना सांगितले.

कृष्णा अतिशय प्रेमळ आणि दयाळू आहे. त्याच्या या स्वभावाबाबत सांगताना प्रभू म्हणाला, कृष्णा एकदा पुण्यातील हडपसर येथे काही कामानिमित्त गेला होता. त्या ठिकाणी त्याला अत्यंत गरीब मुलगा भेटला त्याला कृष्णाने चक्क आपल्या अंगावरील जॅकेट काढून दिले होते. याची माहिती कृष्णाच्या आई आणि वडिलांना समजली त्यांनी देखील कृष्णाचे कौतुक केले. तर नुकताच माझ्या वडिलांचा अपघात झाला असताना कृष्णाने मला सर्वतोपरी मदत केल्याचे प्रभू अगदी कौतुकाने सांगतो. एकूणच काय तर कृष्णाच्या ओठांच्या हालचालींवरुन त्याचे सुख दुःख समजून घेण्याची ताकद प्रभूच्या मैत्रीत आहे. कृष्णा औंधच्या आय.टी.आय मध्ये इलेकट्रीकचे प्रशिक्षण घेत आहे, तर प्रभू आता १२ वीत आहे.