अमेरिकी संशोधकांचा दावा
आहारात शेंगदाण्याचा सतत वापर असलेल्या मुलांमध्ये वजन वाढणे किंवा लठ्ठपणा यावर नियंत्रण मिळविता येते, असे नव्या संशोधनातून सिद्ध झाले आहे.
हिस्पॅनिकमधील मध्यवर्ती शाळेतील मुलांच्या शारीरिक समूह निर्देशांकात (बीएमआय) ही बाब स्पष्ट झाली आहे. यावेळी शेंगदाणामिश्रित पौष्टिक आहार घेणाऱ्या मुलांचे वजन किंवा लठ्ठपणा हा असा आहार सेवन न करणाऱ्या मुलांच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून आले. सद्यस्थितीला आरोग्याच्या दृष्टीने लठ्ठपणा हा अतिशय त्रासदायक विषय बनल्याचे होस्टन विद्यापीठातील आरोग्य आणि मानवी कृती (एचएचपी) विभागाचे क्रेग जॉनस्टोन यांनी म्हटले आहे.
या अनुषंगाने होस्टन परिसरातील तीन शाळांमध्ये शारीरिक कृती आणि पौष्टिक आहारविषयक कार्यक्रमाअंतर्गत संशोधकांनी २५७ किशोरवयीन मुलांचे परीक्षण केले. त्यापैकी अध्र्याहून अधिक मुलांना शाळेतून स्कूलबसमधून घरी जाताना आहारातून शेंगदाणे किंवा शेंगदाणेमिश्रित लोणी आठवडय़ातून तीन ते चार वेळा देण्यात आले, तर उर्वरित मुलांना आठवडय़ातून फक्त एकदाच अशा स्वरूपाचा आहार दिला गेला. यावेळी काजूऐवजी शेंगदाण्यांची निवड करण्यात आली. कारण संशोधकांनुसार काजूमिश्रित आहारापेक्षा शेंगदाणे उपयुक्त असल्याचे संशोधकांना आढळले.
आठवडय़ातून बारावेळा टप्प्याटप्याने दिल्या गेलेल्या आहारानंतर मुलांना पुढील १२ आठवडेदेखील अशाच प्रकारचा पौष्टिक आहार देण्यात आला. यावेळी आरोग्यदायी आहाराचे सेवन न करणाऱ्या मुलांच्या तुलनेत आहाराचे सेवन केलेल्या मुलांच्या शारीरिक समूह निर्देशांकात (बीएमआय) घट झाल्याचे दिसून आले.
विविध कार्यक्रमांनंतर बहुतांश शाळांमध्ये मुलांना ‘ऊर्जा वाढविणारा’ किंवा ‘आरोग्याला अपायकारक’ असा आहार दिला जातो, पण संशोधकांनुसार ‘शेंगदाणे’ हा त्याला उपयुक्त पयार्य ठरू शकतो. जॉनस्टन यांच्या मते, लठ्ठपणाविरोधात लढताना सर्जनशील उपायांसोबतच लोकांनी त्यांचे वजन, इच्छा आणि भूक शमविण्यासाठी नित्यनियमितपणे आहारात सेवन केलेल्या अन्नातूनच नवा पर्याय शोधण्याची गरज आहे.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)