गुढी पाडवा हा सण आणि पारंपरिकता या दोन गोष्टी हातात हात घालून असतात. नऊवारी साडी, नथ, चंद्रकोर, कुर्ता, धोती या वेशात अनेक तरुण तरुणी हौशेने शोभायात्रांमध्ये सहभागी होतात. गुढीपाडव्याच्या शोभायात्रांमध्ये डोक्याला फेटे बांधलेली मंडळीही खूप असतात. फक्त भगवे किंवा गुलाबी फेटेच नाही तर वेगवेगळ्या रंगांचे, स्टाइलचे फेटे आता पाहायला मिळतात. सध्या फेट्यांची नवनवीन स्टाइलही बाजारात आली आहे. गेल्या ६ वर्षांपासून फेटे बांधण्यात तरबेज असलेले शैलेश काळे फेट्यांच्या विविध प्रकाराबद्दल अधिक माहिती देतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठी फेटा, पंजाबी फेटा, मारवाडी फेटा असे फेट्यांचे खूप प्रकार आहेत. फेट्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कपड्यातही आता खूप बदल झालाय. आधी केवळ कॉटनच्या कपड्याला स्टार्च करून फेटा बांधला जायचा. मात्र आता साडीच्या फेट्याचा ट्रेण्ड आहे. सुरुवातीला केशरी किंवा गुलाबी रंगाचा साधा फेटाच सर्वत्र बांधला जायचा. मग ते लग्न कार्य असो किंवा शोभायात्रा. पण आता यातही अनेक बदल झालेले दिसतात. जरीची बॉर्डर असलेल्या किंवा अगदी पारंपरिक काठा-पदराच्या सहावारी किंवा नऊवारी साड्यांचा फेटा अनेक जण बांधतात. त्याचबरोबर ‘बांधणी फेटा’ हा देखील प्रसिद्ध होतो आहे. लाला, हिरव्या, पिवळ्या किंवा मिश्र रंगसंगतीतला बांधणी फेटा एक भारी लूक देऊ शकतो. एकदम ‘रांगडा’ लूक हवा असेल तर कोल्हापुरी स्टाइलच्या फेट्याला पर्याय नाही. मोठा डौलदार तुरा आणि लांबलचक शेमला ही या फेट्याची खासियत आहे. कोल्हापुरी स्टाइलने बांधलेला फेट्याला आजही तेवढीच मागणी आहे.

मराठीतील सर्व गुढी पाडवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gudhi padwa 2017 beautiful marathi fete style
First published on: 27-03-2017 at 11:39 IST