‘स्क्रीन टाइम’ हा आपल्या सगळ्यांसाठी काळजीचा विषय आहे. मुलांचा स्क्रीन टाइम जास्त आहेच पण पालकांचाही खूप जास्त आहे. त्यामुळे आपल्यासमोर असणारी समस्या बरीच गुंतागुंतीची आहे. त्यात कोरोना संकटानंतर वाढलेला स्क्रीन टाइम कमी करायचा कसा हे कुणाच्याच लक्षात येत नाहीये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपण कशासाठी स्क्रीनसमोर आहोत, आपला हेतू, आपण किती वेळ देतो आहोत, का मोबाईल किंवा इतर गॅजेट्स वापरतो आहोत, स्क्रीन व्यतिरिक्त आपण कुठल्या गोष्टी करतो, जसं की व्यायाम करणं, छंद जोपासणं, व्हर्च्युअल जगाच्या पलीकडे आपल्या स्नेही, मित्रमैत्रिणींना भेटणं, आणि या स्क्रीन टाइमचे आपल्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष होणाऱ्या परिणामांची तीव्रता यावरुन आपला स्क्रीन टाइम आपण चांगल्या पद्धतीने वापरतो आहोत की वाईट पद्धतीने हे ठरतं. या गोष्टींचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. हातात फोन आहे म्हणजे तो सतत वापरला पाहिजे असं मुळीचंच नाहीये. आपल्याला फोन कधी, कशासाठी, किती वापरायचा याचं भान असलंच पाहिजे.

हेही वाचा… Health Special: पित्त म्हणजे नेमकं काय? त्याचे प्रकार किती?, जाणून घ्या

स्क्रीन टाइम मॅनेजमेंट आणि स्क्रीन डिपेन्डन्सी कमी करण्यासाठी खालील चार मुद्यांचा प्रत्येकाने विचार करणं आवश्यक आहे.

१) स्क्रीन टाइम म्हणजे काय?
२) छोटी ध्येय
३) स्क्रीन डिपेंडन्सी
४) संवाद

स्क्रीन टाइम म्हणजे काय?

तुमचा मोबाईल, टॅब, लॅपटॉप आणि टीव्ही यांचा वापर मिळून तुमचा दिवसाचा स्क्रीन टाइम ठरतो. त्यामुळे तो किती असावा असा विचार जेव्हा कराल तेव्हा या सगळ्याचा एकत्रित विचार करा. मोबाईलच्या अतिवापरा मुळे जर कुठल्या शारीरिक समस्या निर्माण झालेल्या असतील, उदा. डोळे, पाठ दुखी तर अर्थातच वापर कमी केला पाहिजे. आपला स्क्रीन टाइम आपण चांगल्या आणि गरजेच्या कारणांसाठी दिलेला आहे ना हे एकदा तपासले पाहिजे. नैराश्य, अस्वस्थपणा, रागीटपणा, सतत उदास वाटणं अशा स्वरूपाच्या मानसिक समस्याही अति स्क्रीन टाइम मुळे उद्भवू शकतात त्यामुळे सावधान असणं आवश्यक आहे.

हेही वाचा…. Health Special : अ‍ॅलर्जी नेमकी का सुरू होते? ती कशी टाळता येईल?

छोटी ध्येयं

स्क्रीन मग तो कुठल्याही प्रकारचा असो, कुठल्याही कारणाने आपण वापरात असू तो आता फक्त आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग झालेला नाहीये तर जवळपास आपल्या शरीराला उगवलेला एक नवा अवयव आहे. अशा परिस्थितीत एकदम बदल करणं अतिशय कठीण जाऊ शकतं. जिथे असे बदल मोठी माणसं एका रात्रीतून करू शकत नाहीत तिथे मुलाकडून आपण कशी अपेक्षा करणार? म्हणूनच बेबी स्टेप्स आवश्यक आहेत. एकावेळी एक पाऊल, एक उद्दिष्टय, एक ध्येय. ते पूर्ण केल्यावर पुढचं ध्येय. असं केल्यामुळे स्क्रीन टाइम कमी करण्याचं दडपण येत नाही आणि आपण सहजपणे बदल स्वीकारू शकतो.

स्क्रीनचे अवलंबत्व

ज्यावेळी तुम्हाला तुमचा फोन बाजूला ठेववत नाही, फोन न घेता चुकून घराबाहेर पडलात तर अस्वस्थ वाटतं, दर थोड्या वेळाने फोन चेक करावासा वाटतो, सोशल मीडियावर सतत जाण्याचा मोहा होतो, फोन बंद करायला सांगितला तर तुम्हाला राग येतो, चिडचिड होते, याचा अर्थ तुमचा किंवा तुमच्या मुलांचा/ विद्यार्थ्यांचा प्रवास मोबाईल अवलंबत्वाकडे सुरु झालेला आहे. अशावेळी वेळीच सावरणं, ते जाणून घेऊन समजुतीने स्वतःच्या वर्तणुकीत बदल घडवून आणणं आवश्यक आहे.

हेही वाचा… Health Special: नियमित चालण्याचा आणि रोगप्रतिकारक शक्तीचा संबंध काय?

संवाद

पालकच स्क्रीनवर अवलंबून असतील तर त्यांना मुलांशी विशेष संवाद साधता येत नाही. कारण ही समस्या फक्त मुलांची नाही तर सगळ्यांची आहे. पालकांचा सीमित स्वरूपाचा स्क्रीन टाइम पाल्यांना दिसला तर काही प्रमाणात बदल घडून येऊ शकतात. इंटरनेटवर गेल्यानंतर काय वाटतं? का जावंसं वाटतं ? गेलं नाही तर काय वाटतं ? याविषयी संवाद साधत असताना तिथे असणारे धोके मुलांना सांगितले पाहिजेत. त्याचा मनामेंदूवर होणारा परिणाम सांगितला पाहिजे. तरच आपण स्क्रीन टाइम मॅनेजमेंटच्या दिशेने पाऊल उचलल्या सारखे होईल.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health special how to manage screen time hldc asj