जगामधील प्रत्येक पदार्थ जसा पंचतत्त्वांनी बनलेला म्हणजे पांचभौतिक आहे, तसेच सर्व रससुद्धा पांचभौतिक आहेत. मात्र प्रत्येक रसामध्ये दोन तत्त्वांचे (महाभूतांचे) प्राबल्य असते. त्यानुसार कडू रसामध्ये आकाश व वायू ही दोन महाभूते अधिक प्रमाणात आणि पृथ्वी, जल व अग्नी ही तीन तत्त्वे कमी प्रमाणात असतात. पृथ्वी व जलाच्या कमतरतेमुळे हा रस जड नाही, तर हलका आहे साहजिकच कडू चवीचे पदार्थ पचायला हलके असतात. जसे- कडू पडवळ, मेथी, कारले, दोडका, शेवग्याची पाने, किरमाणी ओवा, हिंग, वगैरे. कडू रसामध्ये अग्नी तत्त्वाचे प्रमाण तिखट, आंबट व खारट रसांइतके नाही आणि त्यामुळेच हा रस उष्ण नसून सहसा शीत आहे. जसे- चंदन, वाळा, नागरमोथा, वगैरे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कडू रस हा शीत असल्याने उष्ण गुणांच्या पित्तविरोधी आहे तर आकाश व वायू प्रधान असल्याने जल व पृथ्वीपासून बनलेल्या कफाच्या विरोधी आहे. कडू रस हा मुख्यत्वे कफनाशक आणि मर्यादेमध्ये वापर केल्यास पित्तनाशक आहे. जसे – पित्तपापडा, नागरमोथा, पडवळ, अडुळशाची पाने, मटारची पाने, गुळवेलीची पाने, इ.

हेही वाचा – Health Special : फसवं चीज आपली फसवणूक करतं?

कडू रसाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वतः रुचकर नसूनही तो जिभेची रुची वाढवतो. कडू रस हा वास्तवात इतर रसांचे हनन करतो, म्हणजे एकदा तुम्ही निव्वळ कडू पदार्थ चाटलात की इतर चवी जिभेला काही काळासाठी ओळखू येत नाहीत. असे का होते? कारण त्या वेळी कडू रस जिभेवरील स्वादांकुरांची शुद्धी करत असतो. गोड, आंबट, खारट व तिखट याच चवीचा आहार माणूस आवडीने खातो, त्यातही आधिक्याने गोडच. आंबट, खारट व तिखट रस तोंडामध्ये अत्यावश्यक स्त्राव वाढवतात, तर गोड रस शरीराला उपकारक ओलावा व स्नेह देतो. मात्र याच चवीच्या पदार्थांचे सातत्याने सेवन करत राहिल्याने त्याचा अतिरेक होतो आणि जिभेवर व एकंदरच संपूर्ण तोंडामध्ये ओलावा, चिकटा व बुळबुळीतपणा वाढतो, जो जिभेवरील स्वादांकुरांवर जमल्यास जिभेचे चव ओळखण्याचे काम बिघडवतो, तर लालास्त्राव (लाळ) स्त्रवणार्‍या लालाग्रंथींच्या सूक्ष्म मुखांवर जमल्यास तोंडामध्ये लाळ व्यवस्थित सुटत नाही. तो चिकटा व बुळबुळीतपणा घालवण्याचे काम कडू रस करतो. जसे – कारले, काडेचिराईत, महासुदर्शन काढा

एखाद्या आजारामध्ये आभ्यन्तर विकृतीमुळे जेव्हा तोंडाची चव गेलेली असते तेव्हासुद्धा कडू रसाचे औषधच चव परत आणते. जसं गुळवेल, काडेचिराईत, महासुदर्शन काढा.

कडू रसामध्ये पंचतत्त्वांमधील आकाश (पोकळी) व वायू (गती) यांचे प्राबल्य आहे, त्यामुळे कडू रस अडथळे दूर करुन वायूला त्याचे कार्य करण्यास आवश्यक ती पोकळी व गती देणारा असा रस आहे. साहजिकच शरीरामध्ये जेव्हा व जिथे पृथ्वी (भूमी) व जल (पाणी) या दोन तत्त्वांचे प्रमाण अधिक झाले आहे, ज्यामुळे शरीरामध्ये नको असलेली अशी रचना तयार होते, शरीर-स्त्रावांना वाहायला व वायूला इथून-तिथे जाण्यास अडथळा तयार होतो; तेव्हा तो अडथळा दूर करणारा, नको असलेली रचना काढून टाकणारा, तिथे आकाश (पोकळी) वाढवणारा व वायूला हालचालीसाठी मोकळी जागा करुन देणारा असा कडू रस आहे. जसे – हळद, कुटकी, गुळवेल, नागरमोथा, इ.

गोड, आंबट व खारट रसामध्ये जसे जल तत्त्वाचे आधिक्य आहे तसे कडू रसामध्ये नसून उलट जलाची कमतरता असल्याने हा रस रुक्ष म्हणजे कोरडा आहे, जो स्वाभाविकरित्या शरीरातला ओलावा खेचून घेतो. जसे – कारले, हळद, काडेचिराईत, नागरमोथा, इ.

कोरडेपणा शिवाय कडू चवीचे पदार्थ हे खरखरीत गुणांचे व साहजिकच शरीरात खरखरीतपणा वाढवणारे असे असतात. जसे – वेखंड, हळद, इ.
कडू चवीचे पदार्थ हे विशद (स्वच्छता करण्याच्या गुणांचे) सुद्धा असतात. जसे – कडूनिंब, अगुरु, करंज, हळद, इ.

हेही वाचा – ‘व्हिटॅमिन बी ३’चे अतिसेवन ठरू शकते हृदयविकाराचे कारण; जाणून घ्या शरीरासाठी योग्य मात्रा

कडू रसामधील वायू व आकाश या दोन तत्त्वांचे प्राबल्य आणि शीतता, कोरडेपणा, खरखरीतपणा, विशदता यांच्या एकत्रित एकत्रित परिणामांमुळे शरीरामध्ये वाढलेला क्लेद (ओलावा किंवा कफस्त्राव) शोषण्याचा विलक्षण गुणधर्म कडू चवीच्या पदार्थांमध्ये आहे. केवल क्लेदच नव्हे तर ज्या-ज्या शरीरघटकांमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक आहे त्या-त्या देह-धातूंमधील ओलावा खेचून घेण्याचे कार्य कडू रस करतो, जे पर्याप्त मात्रेमध्ये कडू खात असतानाच उपकारक होते, अन्यथा नाही. दही, ताक, लस्सी, चीज,आईस्क्रीम वगैरे दूधदुभत्याचे पदार्थ, तेल-तूप-लोणी वगैरे स्निग्ध पदार्थ,गोडधोड पदार्थ, विशेषतः साखर,मैदा अशा पदार्थांचे अतिसेवन,द्रवपदार्थांचे अतिप्राशन व त्याला अव्यायामाची-आळशी जीवनशैलीची जोड या कारणांमुळे शरीरामध्ये वाढलेले-जमलेले पाणी व चरबी कमी करण्यासाठी कडू चवीची औषधेच घ्यावी लागतात ती का, हे इथे वाचकांच्या लक्षात येईल. जसे – आघाडा, काडेचिराईत, गुळवेल, हळद, नागरमोथा, वेखंड, इ.

वरील कारणांमुळेच तारुण्यात सैल पडलेली त्वचा व शिथिल पडलेले मांस (स्नायू) यांमधील अतिरिक्त ओलावा शोषून घेऊन त्वचा व मांस यांना स्थिर करण्यास कडू रस उपयुक्त सिद्ध होतो. जसे – वाळा, करंज, तगर, हळद, चंदन, इ. जिभेवर जमलेला चिकटा व तोंडामधला अतिरिक्त ओलावा कमी करुन कडू रस जसा जिभेची व तोंडाची शुद्धी करतो, तसाच तो मस्तिष्कामध्येसुद्धा करतो. जसं वेखंड.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health special what is the function of bitter juice hldc ssb
First published on: 27-02-2024 at 15:15 IST