घर सांभाळणे असो किंवा ऑफिसमध्ये काम करणं असो; प्रत्येक गोष्टीसाठी मेहनत ही लागतेच. घर सांभाळणारी प्रत्येक स्त्री सकाळी सगळ्यांच्या आधी उठते आणि सगळी कामे आवरून सगळ्यात शेवटी झोपते. दुसरीकडे ऑफिसला जाणारी मंडळी सकाळी लवकर घर सोडतात. ट्रेन, बसने प्रवास करून आठ-नऊ तास ड्युटी करतात आणि मग रात्री घरी येतात. हे सर्व करता करता, अनेकदा खूप थकवा, तणाव व चिडचिड होणे आदी आरोग्याच्या समस्या उदभवतात आणि या सगळ्यावर उपाय म्हणून आपण फक्त थोडा वेळ झोपणे म्हणजेच विश्रांती घेणे पसंत करतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विश्रांती ही आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी खूप जास्त गरजेची आहे. पण, विश्रांती म्हणजे केवळ रात्रीची झोप का? तर नाही… आपले भावनिक, शारीरिक व आध्यात्मिक संतुलन राखण्यासाठी झोपेव्यतिरिक्त सात प्रकारची विश्रांती घेणेही आपल्या प्रत्येकासाठी तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणूनच आज आपण या लेखातून यासंबंधी अधिक जाणून घेणार आहोत. विश्रांतीचे प्रकार किती व कोणते आणि स्वतःच्या दैनंदिन दिनचर्येत याचा कसा उपयोग करून घ्यायचा हेसुद्धा आपण जाणून घेऊ.

सेक्रेड रेस्ट : रिकव्हर युअर लाइफ, रिन्यू युअर एनर्जी, रिस्टोअर युअर सॅनिटी या पुस्तकाचे लेखक डॉक्टर सौंद्रा डाल्टन-स्मिथ यांच्या मते, विश्रांती हा केवळ एकच उपाय नाही. आपल्या शरीर आणि मनाला योग्यरीत्या कार्यरत ठेवण्यासाठी विविध प्रकारच्या विश्रांतीची आवश्यकता असते. कारण- विश्रांतीचा प्रत्येक प्रकार तुमच्या शरीरातील ऊर्जा पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. त्यामुळे विश्रांतीचे हे सात प्रकार समजून घेणे आपल्या सगळ्यांसाठीच फायदेशीर ठरणार आहे.

हेही वाचा…१०० ग्रॅम लसणात आहेत ‘हे’ पोषक घटक; उच्च रक्तदाबामध्ये ठरेल वरदान, वाचा तज्ज्ञांची मते…

विश्रांतीचे हे सात प्रकार म्हणजे शारीरिक, मानसिक, भावनिक, संवेदनात्मक , क्रिएटिव्ह, सामाजिक, व आध्यात्मिक.

१. शारीरिक विश्रांती –

शारीरिक विश्रांती म्हणजे आपण दिवसभर करीत असलेल्या हालचालींमधून थोडा वेळ आराम करणे होय. झोपेव्यतिरिक्त शारीरिक विश्रांती घेण्यासाठी तुम्ही पुढील काही गोष्टी करू शकता.
जसे की, १. स्ट्रेचिंग, २. थोडा वेळ झोप घेणे, ३. मालिश करणे, ४. थोडा वेळ ब्रेक घेणे, ५. चालायला जाणे आदींचा यात समावेश असतो.
जेव्हा आपण शारीरिकदृष्ट्या विश्रांती घेतो. तेव्हा आपण आपल्या स्नायूंना दुरुस्त करण्यासाठी आणि त्यांच्या पुनर्प्राप्तीसाठी वेळ देतो. त्यामुळे आपल्याला थोडा कमी थकवा जाणवतो .

२. मानसिक विश्रांती –

मानसिक विश्रांती म्हणजे आपल्या मनात दररोज येणाऱ्या मानसिक तणावापासून विश्रांती घेणे होय. आपण अशा जगात राहतो जिथे नेहमी काही ना काही घडत असते. त्यामुळे काही काळासाठी मेंदूचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी त्याला ब्रेक देणे फायदेशीर ठरू शकते. मानसिक विश्रांती घेण्यासाठी तुम्ही पुढील काही गोष्टी करू शकता.
जसे की, १. तुमचा फोन बंद करून ठेवा. २. सोशल मीडियापासून स्वतःला लांब ठेवा. ३. ध्यान करा. ४. दररोज काही मिनिटे एका ठिकाणी शांत बसा आणि दीर्घ श्वास घ्या.
जेव्हा आपण मानसिकरीत्या विश्रांती घेतो, तेव्हा आपण आपल्या मेंदूला रिचार्ज करण्यासाठी वेळ देतो. त्यामुळे आपल्याला लक्ष केंद्रित करणे, कार्यरत राहणे व सतर्क राहण्यास मदत होते.

३. भावनिक विश्रांती –

भावनिक विश्रांती म्हणजे दररोज सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या संकटांपासून विश्रांती घेणे. भावनिक विश्रांती घेण्यासाठी तुम्ही पुढील काही गोष्टी जसे की, १. एकट्याने वेळ घालवणे, २. तणावपूर्ण परिस्थिती टाळणे, ३. विश्वासू मित्र-मैत्रिणींशी संवाद साधणे, ४. स्वत:ची काळजी (सेल्फ केअर) घेणे, ५. जर्नलिंग करणे म्हणजेच रोज डायरी लिहिणे. ६. निसर्गाच्या सान्निध्यात राहणे इत्यादी गोष्टी करू शकता .
या सर्व गोष्टी केल्यामुळे तुम्ही स्वतःसाठी वेळ काढू शकाल. भावनिक संतुलन राखू शकाल आणि यामुळे तुमची चिडचिडसुद्धा कमी होईल. भावनिक विश्रांती विशेषतः आव्हानात्मक ठरू शकते. कारण- स्वतःसाठी वेळ काढल्याबद्दल अनेकदा आपण स्वतःला दोषी ठरवतो. पण, ही बाब लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, स्वतःची काळजी घेण्यात, स्वतःसाठी वेळ काढण्यात कोणताही स्वार्थीपणा नाही.

४. संवेदनात्मक विश्रांती (Sensory Rest) –

आपण दररोज आवाज, प्रकाश (लाईट) आणि इतर उपकरणांच्या दिवस-रात्र संपर्कात असतो. तर या उपकरणांपासून तुमच्या ज्ञानेंद्रियांना विश्रांती देणे म्हणजे संवेदनात्मक विश्रांती होय. तर संवेदनात्मक विश्रांती घेण्यासाठी तुम्ही पुढील गोष्टींचा तुमच्या जीवनात समावेश करू शकता.
जसे की, १. टीव्ही बंद करून ठेवणे, २. डोळे बंद करून शांत बसणे, ३. एका शांत खोलीत वेळ घालवणे, ४. अंघोळ करणे, ५. एखादे (Silent) शांत गाणे ऐकणे, ६. दीर्घ श्वास घेण्याचा सराव करणे आदींचा समावेश होतो.
जेव्हा आपण आपल्या ज्ञानेंद्रियांना विश्रांती देतो, तेव्हा शरीरातील संवेदनांचे ओझे मनातून किंवा डोक्यातून काढून टाकण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत होते.

५. क्रिएटिव्ह विश्रांती –

क्रिएटिव्ह विश्रांतीचा अर्थ असा आहे की, तुमच्या दैनंदिन कामातून म्हणजेच घर किंवा ऑफिसची कामे बाजूला ठेवून छंद जोपासणे. या विश्रांतीसाठी तुम्ही पुढील काही पर्यायांचा उपयोग करून पाहू शकता. ज्यामध्ये १. दररोजच्या कामातून विश्रांती घेणे, २. एखादा छंद जोपासणे, ३. तुम्हाला आवडणारी एखादी गोष्ट म्हणजेच चित्रकला, विणकाम, स्वयंपाक करणे; या क्रियाकलापांचा उपयोग करण्यास डॉक्टरांनी सांगितले आहे. जेव्हा आपण क्रिएटिव्ह विश्रांती घेतो, तेव्हा आपण नवीन गोष्टींचा विचार करण्यासाठी वेळ देतो; ज्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळण्यास मदत होते.

६. सामाजिक किंवा सोशल विश्रांती –

सामाजिक किंवा सोशल विश्रांती म्हणजे आपण दररोज ज्या गोष्टी करतो, त्यापेक्षा काहीतरी वेगळे करणे होय. दररोजच्या कामामुळे कुटुंब, मित्र-मैत्रिणींसाठी, तसेच स्वतःसाठी हवा तसा वेळ काढता येत नाही. म्हणून सोशल विश्रांती घेण्यासाठी तुम्ही पुढील पर्यायांचा वापर करू शकता. ज्यामध्ये १. एकट्याने वेळ घालवणे, २.जवळचे मित्र आणि कुटुंबासह वेळ घालवणे, ३. सोलो ट्रिप, ट्रेकिंग किंवा हॉटेलमध्ये जेवायला जाणे, ४. स्वत:ची काळजी घेणे या बाबींचा समावेश होतो. या विश्रांतीमुळे ताण, चिडचिड तर कमी होईलच आणि इतरांशी स्वतःला जोडून ठेवण्यासही मदत होईल.

७. आध्यात्मिक विश्रांती :

आध्यात्मिक विश्रांतीमध्ये तुम्ही ध्यान करणे, प्रार्थना करणे, तुम्हाला आवडणारे एखादे पुस्तक वाचणे, निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणे, योगा करणे अशा सर्व गोष्टींचा तुम्ही समावेश करू शकता. जेव्हा आपण आध्यात्मिकरीत्या विश्रांती घेतो, तेव्हा आपण स्वतःला आपल्या अंतरंगाशी जोडण्यासाठी आणि आपल्या जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी वेळ देतो; जे आपल्याला जीवनाच्या प्रत्येक वाटेवर स्थिर राहण्यास मदत करतात.

हेही वाचा…पॅकबंद पदार्थांतील ‘पाम तेल’ तुमच्यासाठी हानिकारक? पाहा तज्ज्ञ काय सांगतात…

तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात या सात विश्रांतीच्या प्रकारांचा समावेश करणे कठीण वाटू शकते. पण, तुमच्या सर्वांगीण कल्याणासाठी ते अगदी आवश्यक आहे. या सात प्रकारच्या विश्रांतीचा तुमच्या जीवनात समावेश कसा करायचा याच्या काही टिप्स खालीलप्रमाणे :

एक शेड्युल तयार करा – प्रत्येक प्रकारच्या विश्रांतीसाठी वेळ ठरवा आणि तुमच्या जीवनात त्यांना प्राधान्य द्या. जसे तुम्ही तुमची विविध कामे किंवा व्यायाम यासाठी वेळापत्रक तयार करता त्याचप्रमाणे अगदी विश्रांतीसाठीसुद्धा अधूनमधून आवश्यक तो वेळ द्या.

विश्रांती घ्या – शरीर आणि मनाला विश्रांती देण्यासाठी दिवसभरात लहान-लहान ब्रेक घ्या. थोडे चालायला जा, ध्यान करा किंवा फक्त दीर्घ श्वास घ्या.

सीमा निश्चित करा – तुमची वेळ आणि ऊर्जा या दोघांची एक सीमा निश्चित करा. एखादी गोष्ट तुम्हाला पटत नसेल, तर नाही म्हणायला शिका. तसेच जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा मदत मागायलाही घाबरू नका.

स्वतःला डिस्कनेक्ट करा – तुमच्या मनाला विश्रांती देण्यासाठी तंत्रज्ञान आणि समाजमाध्यमांपासून नियमितपणे दूर रहा.

प्रयोग करून पाहा – विविध प्रकारच्या विश्रांती घेण्याचे प्रयोग करून पाहा आणि आपल्यासाठी काय गरजेचे आहे ते जाणून घ्या. प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या असतात. त्यामुळे तुम्हाला कोणत्या विश्रांतीच्या प्रकारांमुळे शांतता मिळते ते शोधा आणि तुमच्या दिनचर्येत त्यांचा समावेश करून पाहा.

सवय लावा – तुमच्या आयुष्यात विश्रांतीची सवय लावून घ्या. आपल्या दैनंदिन नित्यक्रमात त्याचा समावेश करा आणि या विश्रांती घेण्याच्या सवयीला स्वत:ची काळजी घेण्याच्या सरावाचा एक भाग बनवा.

तुमच्या जीवनात या सात प्रकारच्या विश्रांतीचा समावेश करण्यास वेळ लागू शकतो; पण ते फायदेशीर आहे. विश्रांतीला प्राधान्य देऊन, तुम्ही अधिक संतुलित आणि परिपूर्ण जीवन जगू शकता. त्यामुळे विश्रांती घ्या, आराम करा आणि तुमच्या शरीर व मनाची योग्य ती काळजी घ्या. सर्व सात प्रकारच्या विश्रांतीचा स्वीकार करणे म्हणजे एक निरोगी, आनंदी आणि अधिक परिपूर्ण जीवन जगणे होय. म्हणून ब्रेक घ्या, विश्रांती घ्या… तर आज आपण या लेखातून झोपेव्यतिरिक्त आरामाचे किती व कोणते प्रकार आहेत ते समजून घेतले.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What are the seven types of rest how to incorporate these types of rest in your life follow this tips ltdc asp
First published on: 31-03-2024 at 16:13 IST