ऑस्ट्रेलियातील आहारतज्ज्ञांचा दावा

मेडिटेरनेन डाइट म्हणजेच भूमध्य प्रदेशातील आहाराने हृदयविकारावर नियंत्रण मिळविता येते, असा दावा ऑस्ट्रेलियातील आहारतज्ज्ञांनी केला आहे. फळे, हिरव्या भाज्या, मासे आणि प्रक्रिया न केलेले अन्न यांचा समावेश भूमध्य प्रदेशातील आहारात होतो. ज्यांना हृदयविकार आणि पक्षाघात यांचा त्रास आहे, त्यांनी दररोजच्या आहारात जर भूमध्य आहाराचा समावेश केला, तर त्यांना निश्चितच फायदा होतो, असे या आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले.

भारतासह ३९ देशांतील १५००० लोकांचा अभ्यास करून ऑस्ट्रेलियातील आहारतज्ज्ञांनी हा निष्कर्ष काढला आहे. या लोकांच्या जीवनशैलीचा आणि दररोजच्या आहाराचा अभ्यास केला असता असे आढळले की, खूपच कमी लोक सकस आणि सत्त्वयुक्त आहार घेतात. अनेकांना पाश्चात्त्य देशांमधील सत्त्वहीन आहारच आवडतो. प्रक्रिया केलेले धान्य, मिठाई, डिजर्ट (मिष्टान्न), शर्करायुक्त पेय आणि खूपच तळलेले पदार्थ यांचा आहारात समावेश असतो. मात्र अशा प्रकारचा आहार घेणाऱ्या लोकांना हमखास हृदयविकार होतो, असे या तज्ज्ञांनी सांगितले. अशा प्रकारचा सत्त्वहीन आहार घेणाऱ्या लोकांना हृदयविकाराचा झटका, पक्षाघात आणि हृदयविकाराने मृत्यू यांचे प्रमाण अधिक आढळले. मात्र भूमध्य प्रदेशातील सकस आहार घेणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकार नियंत्रणात असल्याचे आढळले, असा दावा या आहारतज्ज्ञांनी केला.

या आहारतज्ज्ञांनी १५,४८२ लोकांना आहार आणि हृदयविकार यांबाबत प्रश्न विचारले. त्यातील अनेकांचे सरासरी वय ६७ होते, परंतु त्यांच्या आरोग्याबाबत बऱ्याच तक्रारी होत्या.

अनेकांनी आहारामध्ये तळलेले, मसालेदार, शर्करायुक्त पदार्थ असतात, असे सांगितले. सत्त्वयुक्त आणि भूमध्य प्रदेशातील आहारांबाबत माहिती नसल्याचेही अनेकांनी सांगितले. त्यापैकी अनेकांना हृदयविकाराचा त्रास होता, पण त्यांचा आहाराबाबत निष्काळीपणा दिसून येत होता, अशी माहिती या आहारतज्ज्ञांनी दिली.