गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी त्यांच्या काही तंत्रज्ञानाविषयी सवयींबद्दल माहिती दिली आहे. मुलांसाठी स्क्रीन टाईम, पासवर्ड कधी व किती लवकर बदलला पाहिजे आणि ते किती मोबाइल फोन वापरतात यासारख्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली आहेत. सुंदर पिचाई यांनी कॅलिफोर्नियाच्या सिलिकॉन व्हॅलीमधील गुगल हेडक्वार्टरमध्ये बीबीसीला मुलाखत दिली आहे.
सुंदर पिचाई यांना ते त्यांच्या मुलांना स्क्रीनचा वापर करण्यासाठी किती वेळ परवानगी देतात? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यांनी सांगितले की ते आपल्या मुलांना त्यांच्या स्वत:च्या मर्यादा निश्चित करण्याचे स्वातंत्र्य आणि प्रोत्साहन देतात. “मी ती एक वैयक्तिक जबाबदारी आहे असा विचार करतो, ज्याचा निर्णय ती व्यक्ती स्वतः घेते,” असे पिचाई म्हणाले. मुलांवर तंत्रज्ञानाचे दुष्परिणाम काय आहेत असे विचारले असता पिचाई म्हणाले की, जर आपण आपला इतिहास पाहिले तर तंत्रज्ञानाबाबत आपल्याला अनेकदा भीती दाखवली जात आहे.
“अमेरिकेत असलो तरी आजही मनात भारतच आहे”; देशाच्या आठवणीने सुंदर पिचाई भावूक
सुंदर पिचाई यांनी पासवर्डबाबतही महत्त्वाची माहिती दिली आहे. पिचाई यांनी किती वेळा आपला पासवर्ड बदलता असे विचारले असता ते म्हणाले की ते वारंवार आपला पासवर्ड बदलत नाही. पासवर्डच्याबाबतीत त्यांनी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन (two-factor authentication)चा वापर करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. यामुळे अनेक प्रकारची सुरक्षा मिळते.
पिचाई किती फोन वापरतात?
आपण किती फोन वापराल असे विचारले असता ते म्हणाले की एकावेळी मी वेगवेगळ्या कामासाठी २० हून अधिक फोन वापरतो. मी सतत फोन बदलत असतो आणि नवीन वापरुन पाहतो आणि मी नेहमीच टेस्टिंग करत असतो.
सुंदर पिचाई यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) देखील भाष्य केले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर बोलताला पिचाई म्हणाले की, मानवाद्वारे बनवलेले हे सर्वात महत्वाचे आणि क्रांतिकारक तंत्रज्ञान आहे. याची तुलना वीज किंवा इंटरनेट सारख्या शोधांसोबत केली जाऊ शकते. पण कधीकधी असे वाटते की यापेक्षा आर्टिफिशियल इंटेलिजन्स अधिक महत्वाचे आहे.