नवी दिल्ली : चीनमध्ये एका नव्या विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात खबरदारी घेण्याची सूचना केंद्रीय आरोग्य विभागाने केली असून, त्यानुसार दिल्ली, मुंबई आणि कोलकाता विमानतळावर चीनहून येणाऱ्या प्रवाशांची उष्णता लहरी संवेदक अर्थात ‘थर्मल स्कॅनर’द्वारे आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

चीनमार्गे जाणाऱ्या तसेच तिकडून येणाऱ्या प्रवाशांसाठी भारत सरकारने एक सूचनावली प्रसिद्ध करून आवश्यक ती खबरदारी घेणाचे आवाहन केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, चीनमध्ये नव्याने आढळलेल्या ‘कोरोना’ विषाणूची ४१ जणांना बाधा झाल्याचे निदान ११ जानेवारीला झाले आहे. यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

हा विषाणू आरएनए रेणूपासून तयार झालेला असून इलेक्ट्रॉन सुक्ष्मदर्शकाखाली पाहिले असता तो सूर्याभोवतीची वायुमंडळाची पोकळी किंवा प्रभावळ म्हणजेच ‘कोरोना’ प्रमाणे भासतो. त्यामुळे त्याला कोरोना व्हायरस असे संबोधिले जाते. त्याचा नवा प्रकार चीनमध्ये आढळला आहे.

या नव्या विषाणूच्या धोक्याबाबत केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेशी सल्लामसलत करून आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. या विषाणूचा मानवाकडून मानवात प्रसार झाल्याचे प्रमाण मर्यादित असल्याने जागतिक स्तरावर त्याचा प्रसार होण्याचा धोका तुलनेत कमी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यासंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनीही देशपातळीवर केलेल्या उपाययोजनांचा शुक्रवारी आढावा घेतला. चीनमार्गे ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या मदतीने विमानतळांवर माहिती दिली जात आहे.

या विषाणूचा प्रसार रोखून आवश्यक तेथे रोगनिदान आणि उपचारांची सोय उपलब्ध करून देण्यासाठी एकात्मिक कार्यक्रम राबविला जात आहे, आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. देशात या विषाणूच्या लागणीचे नमुने तपासण्यासाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद समन्वयाने काम करणार आहेत.