शेतकरी आंदोलनादरम्यान कंटेंट सेन्सॉरशिपवरुन केंद्र सरकार आणि ट्विटरमधील वाद समोर आल्यापासून ‘मेड इन इंडिया’ Koo अ‍ॅप झपाट्याने लोकप्रिय होत आहे. ट्विटरला स्वदेशी पर्याय म्हणून Koo अ‍ॅपची चर्चा असून सरकारमधील काही मंत्रीही Koo अ‍ॅप वापरण्यास प्रोत्साहन देत आहेत. मात्र, या ‘मेड इन इंडिया’ अ‍ॅपमध्ये चिनी गुंतवणूक असल्याचं समोर आलं आहे.

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) अप्रम्या राधाकृष्णा यांनी CNBC-TV18 ला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत Koo अ‍ॅपमध्ये चिनी कंपनीची छोटी गुंतवणूक असल्याचं सांगितलं. “शुनवेई कॅपिटल या चिनी कंपनीची छोटी गुंतवणूक अ‍ॅपमध्ये आहे, पण त्यांचा हिस्सा खरेदी करता येऊ शकतो. त्यामुळे ते लवकरच यातून बाहेर पडतील”, असंही राधाकृष्णा यांनी स्पष्ट केलं. “शुनवेई कॅपिटलने सुरूवातीला आमच्या व्होकल या अन्य स्टार्ट-अपमध्ये गुंतवणूक केली होती. पण आता आम्ही ‘कू’ कडे लक्ष केंद्रीत केलं आहे, त्यामुळे शेनवाई लवकरच बाहेर पडेल”, असं राधाकृष्णा म्हणाले. शुनवेई कॅपिटलशिवाय ‘कू’मध्ये 3one4 कॅपिटल (माजी इन्फोसिस बोर्ड मेंबर मोहनदास पै यांची कंपनी), कलारी कॅपिटल आणि ब्लम व्हेंचर्स यांची गुंतवणूक आहे.

काय आहे Koo अ‍ॅप?

Koo app अप्रम्या राधाकृष्णा (Aprameya Radhakrishna) आणि मयंक बिदावत्क (Mayank Bidawatka) यांनी मार्च 2020 मध्ये डेव्हलप केलं आहे. Koo app ने ऑगस्ट 2020 मध्ये भारत सरकारकडून आयोजित Aatmanirbhar App Challenge स्पर्धा जिंकली होती. Koo चा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातही केला होता. Koo अ‍ॅपवर भारतीय भाषांमध्ये ट्विटरप्रमाणे माइक्रोब्लॉगिंगचा अनुभव मिळतो. सोप्या शब्दात सांगायचं तर Koo म्हणजे ‘मेड इन इंडिया’ ट्विटर आहे. हिंदी, इंग्रजी, मराठीसह आठ भारतीय भाषांचा सपोर्ट या अ‍ॅपमध्ये आहे. Koo चा वापर अ‍ॅपसोबतच वेबसाइटवरुनही करता येतो. याचा इंटरफेस ट्विटरप्रमाणेच असून शब्दांची मर्यादा 350 आहे. ट्विटरप्रमाणेच Koo वर युजर्सना फॉलो करण्याचा पर्याय आहे. Koo वर भारतीय भाषांमध्ये विचार व्यक्त करण्याची सोय आहे.

ट्विटर-केंद्र सरकारचा वाद काय?

शेतकरी आंदोलनादरम्यान चुकीची आणि चिथावणीखोर माहिती पसरवत असल्याचा दावा करत काही ट्विट आणि खात्यांवर निर्बंध लादण्याचे सरकारने दिलेले आदेश ट्विटरकडून पाळण्यात आले नाहीत. त्यावरुन दोघांमध्ये वाद सुरू आहे. याचा चांगलाच फायदा मेड इन इंडिया Koo अ‍ॅपला झालाय. गेल्या काही दिवसांमध्ये Koo डाउनलोड करणाऱ्यांच्या प्रमाणात झपाट्याने वाढ झाली आहे.