मिस युनिव्हर्स ही स्पर्धा सौंदर्यासाठी जगभरात मैलाचा दगड मानली जाते. या स्पर्धेत जिंकणाऱ्या सौंदर्यवतींची जगभरात चर्चा होते. यात मिस युनिव्हर्सचा मान कोण पटकावणार याकडे सर्वांचे लक्ष असते. या सौंदर्यस्पर्धेतील इतरही गोष्टी गाजताना दिसतात. त्याच पार्श्वभूमीवर अनेक देशांत अशाप्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्याचप्रमाणे यंदा न्यूझिलंडच्या मिस युनिव्हर्स स्पर्धेतील एक गोष्ट विशेष गाजत आहे, ती म्हणजे मलेशियाच्या एका सौंदर्यवतीने हिजाब घालून स्पर्धेत घेतलेला सहभाग. स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी तिची निवड झाली असून तिने हिजाब घालून या स्पर्धेत सहभाग नोंदवणे ही ऐतिहासिक घटना आहे. या सौंदर्यवतीचे नाव नुरुल शामसूल आहे. मलेशियन आणि इंडोनेशियन वंशाची असणारी २० वर्षीय विद्यार्थिनी मूळची न्यूझीलंडची आहे.

नुरुल हीने अंतिम फेरीत निवडून आल्याचा आनंद आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन व्यक्त केला आहे. ही ब्युटी क्विनचा जन्म आणि लहानपण न्यूझिलंडमध्ये गेला असून ती लवाईकाटो विद्यापीठात शिक्षण घेत आहे. ती म्हणते अशाप्रकारे मिस युनिव्हर्स न्यूझिलंडच्या स्पर्धेत हिजाब घालून सहभागी होणारी मी जगात पहिलीच आहे. मात्र यामुळे एक विशिष्ट संकल्पना बदलण्यास मदत होईल. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून सौंदर्य नेमके काय आहे याबाबत पुर्नविचार करायला हवा. पुढे ती म्हणते, माझ्या अनुभवानुसार, न्यूझिलंडमधील लोक हे विविध संस्कृतींचा स्वीकार करणारे लोक आहेत. त्यामुळे हा देश युनिक आहे. त्यामुळे तुम्ही कोण आहात आणि तुमचे मूळ काय याबाबत कधीच घाबरुन जाऊ नका. या स्पर्धेची अंतिम फेरी ४ ऑगस्ट रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.