कुत्र्यानंतर पाळीव म्हणून मानमरातब मिळवणारा प्राणी म्हणजे मांजर. प्रत्येकालाच लहानपणापासून प्राणी-पक्षीजगताची जाणीवदीक्षा दिली जाते ती चिऊ, काऊ आणि अखेरीस माऊच्या ओळखीने. पूर्वी वाडे, चाळी, बंगले संस्कृतीमध्ये अनेक दारांआड तरी या वाघाच्या ‘पाळीव’ मावशीचा वावर असायचा. अनेक घरांचा तिच्यावर मौखिक दावा असायचा. चार घरांतील स्वयंपाकघरात आवश्यक पदार्थाची हक्कवसुली, सात उंबऱ्यांमध्ये फिरवत त्या घरांत पिल्लांना दाखवत गुपचूप गुडूप होण्याची कसरत करणारी मांजरे प्रत्येकाच्या स्मृतिकोशात दडली असतील. खाणे हवे असले, लाड करून हवे असले की जवळ येणारे आणि एरवी जगातल्या कोणालाही फुकटचा भाव न देता आपल्या जागेवर पहुडणे हे या प्राण्याचे सार्वत्रिक वैशिष्टय़.  मांजर  पाळीव असले, तरी स्वत:चे स्वातंत्र्य आणि आब राखून असते. पाळीव असूनही मांजरांचा अनेक उंबऱ्यांवरचा भटका शिरस्ता आजही गाव आणि शहरांत सारखाच आहे. मात्र फ्लॅट संस्कृतीमुळे शहरी निमशहरी भागांमध्ये कुत्र्याप्रमाणेच घरामध्ये जाणीवपूर्वक मांजर बाळगले जाण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. चार घरी फिरणाऱ्या मांजरींचे चित्र एकाच घरात २४ तास विसावणाऱ्या मांजरामध्ये परावर्तित झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मांजराच्या बाबतीत लोकांमध्ये अनेकदा टोकाच्या भूमिका दिसतात. मांजर अत्यंत आवडत असल्यास पाहताक्षणी तिच्या डोक्यावर कुरवाळण्यास हात पुढे होतो. तर नावडत असल्यास तिच्या कोणत्याही वर्तवणुकीबाबत हातातली वस्तू फेकून मारावी इतका संताप येतो. घरा, वाडय़ांमध्ये आगंतुक येणारे मांजर उंच इमारतींमधील फ्लॅटमध्ये दुरापास्त बनल्यानंतर आज मांजर विकत घेऊन पाळण्याचे प्रमाण वाढत आहे.  आपल्याकडे स्थानिक प्रजातीच्या मांजरात बरेच वैविध्य पाहायला मिळते. रंग, केस, आकार, गुणवैशिष्टय़े असे वैविध्य असूनही त्याच्या नेमक्या प्रजातींची किंवा वंशावळीची नोंद करण्यातच आलेली नाही. त्यामुळे गावठी किंवा देशी मांजर आणि परदेशी प्रजाती अशी ढोबळ वर्गवारी केली जाते. स्वतंत्र प्रजाती म्हणून नोंद असलेल्या मांजरांमध्ये आपल्याकडे मिळणाऱ्या मांजरांची गुणवैशिष्टय़े दिसत असली तरीही त्याची भारतीय प्रजाती म्हणून नोंद नाही. पाळीव मांजरातील स्वतंत्र प्रजाती म्हणून  साधारण ७३ प्रजातींची नोंद जगात वेगवेगळ्या संस्थांनी केली आहे. त्यामध्ये अमेरिकन प्रजातींचा वरचष्मा आहे. नोंद झालेल्यापैकी जवळपास ४० प्रजाती या अमेरिकन आहेत. त्यामध्ये नैसर्गिक किंवा मूळ प्रजातींबरोबरच ‘हायब्रिड आणि मिक्स ब्रिड प्रजातींचाही समावेश आहे. हायब्रिड म्हणजे दोन नोंद झालेल्या प्रजातींची गुणवैशिष्टय़े लक्षात घेऊन त्यांचे मुद्दाम ब्रिडिंग करून तयार करण्यात आलेली प्रजाती. दोन प्रजातींचे मुद्दाम न ठरवता ब्रिडिंग झाल्यानंतर त्यातून जन्माला आलेल्या पिल्लात काही पूर्णपणे वेगळी गुणवैशिष्टय़े दिसली तर त्याची नोंद मिक्स ब्रिड म्हणून केली जाते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pet cat information cat care domestic cats cat breeds
First published on: 18-02-2017 at 00:44 IST