शैलजा तिवले

मानसिक आणि शारीरिक आजार हे जसे एकमेकांशी जोडलेले आहेत, तसे त्यांचा संबंध जीवनशैलीशीदेखील आहे. त्यामुळे जीवनशैलीमध्ये बदल घडविताना येणाऱ्या अडचणींना सोडविण्यासाठी मानसोपचारांचीही कधी कधी आवश्यकता भासते. परंतु मानसोपचार हे केवळ गंभीर मानसिक आजारांसाठीच घेतले जातात हा गैरसमज आपल्याकडे आहे. त्यामुळे याकडेही अनेकजण पाठ फिरवतात.

article about bedwetting problem among children
Health Special: अंथरूण ओले का होते? उपाय काय?
scrub typhus introduction diagnosis of scrub typhus threat of scrub typhus
Health Special: दुर्लक्षित पण महत्त्वाचा आजार ‘स्क्रब टायफस’ आहे तरी काय? उपचार काय कराल? 
How to treat heat-related illnesses
उष्णतेच्या लाटेचा कसा करावा सामना? सरकारने मार्गदर्शक सुचना केल्या जारी
siblings jealousy
भावंडांबद्दल वाटणारा मत्सर कसा कमी कराल? ‘या’ छोट्या छोट्या गोष्टींमधून दिसेल सकारात्मक बदल

शारीरिक आजारामध्ये उच्च रक्तदाब हादेखील मानसिक आजारांशी जोडलेला आहे. त्यामुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनाही डॉक्टर अनेकदा मानसिक समुपदेशन किंवा मानसोपचाराकडे जाण्याचा सल्ला देतात. परंतु रुग्ण अनेकदा मानसोपचार घेण्याचे टाळतात.

ज्या व्यक्तींवर मोठे निर्णय घेण्याची जबाबदारी असते किंवा नोकरीमध्ये उच्च पदावर असतात, कामाची खूप जबाबदारी असते अशा व्यक्तींमध्ये ताणतणावामुळे उच्च रक्तदाबाचे प्रमाण जास्त असल्याचे आढळते. सततचा मानसिक ताण असल्यास किंवा तापट स्वभाव असल्यास, सतत अस्वस्थपणा असल्यास याचा परिणाम हार्मोन्सच्या व्यवस्थेवर होतो. त्याचे पर्यवसान उच्च रक्तदाबामध्ये होते. मानसिक ताणतणाव हे उच्च रक्तदाब होण्यामागचे एक कारण आहे. मानसिक तणाव कमी करण्यासाठीचे उपाय केल्यास उच्च रक्तदाबाचे प्रमाण कमी होऊ शकते. ताणतणाव वाढायला लागला की झोप कमी होते आणि मग रक्तदाब वाढायला सुरुवात होते. ताणतणाव जास्त असणाऱ्या रुग्णांमध्ये हृदयविकाराचे प्रमाणही जास्त असते. परंतु याची लक्षणे दिसत नसल्याने निदान होत नाही. त्यामुळे अचानक पक्षाघात किंवा हृदयविकारामध्ये रूपांतर होत असल्याचे आढळते, असे केईएम रुग्णालयातील औषधशास्त्र विभागातील डॉ. संतोष सलाग्रे सांगतात.

रुग्ण दाखल झाल्यावरच त्याच्या बोलण्यातून हालचालीमधून त्याला ताणतणाव आहे का हे नोंदविले जाते. आर्थिक अडचणी, कुटुंब कलह अशा विविध कारणांमुळे ताणतणाव असतात. याविषयी रुग्णाशी संवाद साधला जातो. त्याचे समुपदेशन केले जाते. परंतु काही रुग्णांमध्ये काही वेळेस उच्च रक्तदाबाची औषधे घेऊनही रक्तदाब नियंत्रणात येत नाही असे दिसून येते. अशा रुग्णांना अस्वस्थता, ताणतणाव कमी करण्यासाठी मानसोपचाराची मदत घेण्याचा सल्ला दिला जातो. परंतु सुरुवातीला रुग्ण ही मदत घेण्यास फारसे तयार नसतात. टाळाटाळ केली जाते. अशा वेळी रुग्णांचे समुपदेशन करून मानसिक आजारांसाठी औषधे घेण्याची गरज नाही. समुपदेशनाने मोठी मदत होऊ शकते हे समजावले जाते. काही वेळेस कुटुंबाची यामध्ये मदत घेतली जाते. शरीराच्या आजाराला औषधांची आवश्यकता असते तसे मेंदूच्या आजारासाठी हे उपचार घेणे गरजेचे आहे असे समजावले जाते. मग हे रुग्ण समुपदेशानासाठी जायला सुरुवात करतात. मानसोपचाराचे उपचार किंवा समुपदेशन घेतल्यानंतर अशा अनेक रुग्णांमध्ये उच्च रक्तदाब नियंत्रणात आल्याचे आढळले आहे, असेही पुढे डॉ. सलाग्रे सांगतात.

जीवनशैलीचा मानसिक आजारांशी संबंध

शरीर स्वास्थ्यासाठी शारीरिक आजार आणि जीवनशैलाचा जसा संबंध आहे, तसाच जीवनशैलीचा संबंध मेंदूशी देखील आहे. शरीरामध्ये उत्साही ठेवण्यासाठीची रसायने जीवनशैलीशी निगडित अनेक बाबींमुळे तयार होतात. जसे की व्यायामामुळे ताणतणाव कमी होतो. शरीरातील स्नायूंमधील रक्ताभिसरण वाढते, तसे मेंदूमध्येही ते वाढते. त्यामुळेच फेरफटका मारून आल्याने डोक्यातील विचार कमी होतात, असे म्हटले जाते.

जीवनशैलीतील बदल महत्त्वाचा

शारीरिक आजारांवर नियंत्रण येण्यासाठी विशेषत: मधुमेह, उच्च रक्तदाब यांच्या नियंत्रण मिळविण्यासाठी जीवनशैलीमध्ये बदल करणे गरजेचे आहे हे वारंवार रुग्णाला सांगितले जाते. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून जडलेल्या सवयींमध्ये बदल करणे सोपे नसते. उदारहणार्थ नवीन वर्ष सुरू होत असताना अनेक जण मनामध्ये संकल्प करतात आणि हा संकल्प पुढच्या दहा दिवसांमध्ये सुटून जातो. यामागे त्याला संकल्प पूर्ण करण्याची इच्छा नसते असे नाही, तर यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश असतो. यात काही त्यांच्या मनाशी संबंधित काही कुटुंबे तर काही समाजाशी निगडित असतात. या बाबी कशा हाताळायच्या, कशा पद्धतीने विचार करायला हवा जेणेकरून त्याचा संकल्प जास्तीत जास्त काळ टिकेल या पद्धतीला थेअरी ऑफ प्लान बिहेव्हिअर असे म्हटले जाते. जीवनशैलीमध्ये म्हणजेच या सर्व आजारांमध्ये खाण्यामध्ये, व्यायामामध्ये, छंदामध्ये बदल करणे आवश्यक आहे. तसेच विचार करण्याच्या पद्धतीमध्ये, ताणतणाव सहन कसे करतो यामध्ये बदल करावे लागतात. यासाठी थेअरी ऑफ प्लान बिहेविअरची मदत होते. या पद्धती नवीन नसून योग आणि आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आशीष देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे.

मधुमेहामध्ये जीवनशैली बदलण्यास सांगितली आहे परंतु बदलली जातच नाही. उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी ताणतणाव कमी करण्याचा सल्ला दिला आहे, परंतु ते होतच नाहीत. तेव्हा मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेण्यासाठी सांगितले जाते. परंतु मानसोपचारापेक्षा अन्य पॅथीकडे वळण्याचा रुग्णांचा अधिक कल असतो. आजारांचे गांभीर्य वाढल्यावर नैराश्य, अस्वस्थता इत्यादी त्रास वाढल्यावर रुग्ण आमच्यापर्यंत येतात, असे डॉ. देशपांडे यांनी सांगितले. जीवनशैलीमध्ये बदल करणे मानसिक आजाराच्या रुग्णांनाही आवश्यक असते. बिहेव्हिअरल एक्टिव्हेशन थेरपी असे म्हटले जाते. उदाहरणार्थ व्यायाम करणे, वेळच्या वेळी जेवण करणे, भरपूर पाणी पिणे, छंद जोपासणे किंवा काहीतरी नवीन शिकणे इत्यादी.

मधुमेहामध्ये जीवनशैली नियमनाचा महत्त्वाचा भाग असून हे नियमन होत नसल्याने मधुमेहाची बाधा होते. जीवनशैली सुधारण्यासाठी अनेकदा रुग्णांवर मानसिक ताण येतो. खाण्यापिण्याच्या प्रवृत्तींमध्ये बदल करणेही अनेकदा ताण वाढविणारे असते. योग्य आहार आणि व्यायामामुळे मानसिक संतुलन राखण्यास मदत होते. अतिस्थूल व्यक्तींच्या जीवनशैलीमध्ये बदल करण्यासाठी जसे समुपदेशानाची आवश्यकता असते. तसेच मधुमेह किंवा इतर आजारांमध्येदेखील जीवनशैलीमध्ये बदल करण्यासाठी समुपदेशन महत्त्वाचे असते असे मधुमेहतज्ज्ञ डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.

चुकीचा सल्ला घातक

मानसिक आजारांच्या रुग्णांना त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक यांच्या चुकीचा सल्ला देण्यामुळे किंवा गैरसमज पसरवल्यामुळेही रुग्णांची प्रकृती आणखी बिघडत जाते. मानसिक आजाराची औषधे घेतल्यामुळेच तुला मधुमेहाची बाधा झाली आहे, असे रुग्णांना नातेवाईक किंवा आप्तेष्टांमार्फत सांगितले जाते. मग रुग्ण मानसिक आजारांची औषधे बंद करतो. अशामुळे त्याचा मानसिक आजारांचा त्रास तर वाढतोच तसेच मधुमेहदेखील नियंत्रणात राहात नाही. आवश्यकता असल्यास नैराश्याची औषधे घेतल्याने आयुर्मान वाढते असे आता निदर्शनास आले आहे. त्यामुळे इतर आजारांच्या भीतीने ही औषधे टाळणे चुकीचे असल्याचे डॉ. देशपांडे यांनी स्पष्ट केले.

shailaja.tiwale@expressindia.com