एकाग्रतेचा अभाव, आक्रमकपणा ही आजच्या लहान आणि कुमारवयीन मुलांमध्ये सर्वसाधारणपणे आढळणारी लक्षणे आहेत. या लक्षणांचा आणि सॉफ्ट ड्रिंक्स सेवनाचा काही संबंध आहे का, याचा अभ्यास कोलंबिया विद्यापीठातील संशोधकांनी केला. सॉफ्ट ड्रिंक्सचे मोठ्या प्रमाणात सेवन केल्यामुळे मुलांमधील आक्रमकता वाढते आणि एकाग्रता कमी होते, असे या अभ्यासात संशोधकांना आढळून आले.
कोलंबिया विद्यापीठातील मेलमॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ, व्हर्मोंट विद्यापीठ आणि हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ यांनी एकत्रितपणे पाच वर्षे वयाच्या सुमारे ३००० मुलांचा या संशोधनामध्ये अभ्यास केला. अभ्यासाच्या काळात संबंधित मुलांनी दिवसभरात सॉफ्ट ड्रिंक्सचे केलेले सेवन आणि त्यांच्या वर्तणुकीवर झालेला परिणाम याची नोंद त्याच्या आईने ठेवली.
सॉफ्ट ड्रिंक्समधील सोड्यामुळे मुलांमधील आक्रमकता वाढते, एकाग्रता कमी होते, मुलांचे लक्ष सारखे विचलीत होऊ लागते, असे संशोधकांना आढळले. जी मुले दिवसातून चार वेळा सॉफ्ट ड्रिंक्सचे सेवन करतात ती सर्वाधिक आक्रमक असतात. इतरांच्या वस्तू तोडणे, मारामारी करणे, समोरच्या व्यक्तीवर धावून जाणे अशा कृती या मुलांकडून वारंवार घडतात, असे दिसून आले.
मुलांचे सॉफ्ट ड्रिंक्सचे सेवन दिवसेंदिवस जसजसे वाढत जाते, त्याचप्रमाणे त्यांची आक्रमकताही वाढल्याचे मेलमॅन स्कूलमधील सहायक प्राध्यापक शकिरा सुगलिया यांनी सांगितले.