सध्याच्या अत्यंत घाईगर्दीच्या दिनक्रमात आपणास खास व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करण्यासाठी वेळ देता येईलच असे नाही; परंतु दिवसभरात थोडय़ा-थोडय़ा वेळाने काही मिनिटांसाठी जिन्याच्या पायऱ्या चढल्या तरी त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास चांगली मदत होते, असे एका अभ्यासात दिसून आले आहे.

याबाबतचा अभ्यास ‘अ‍ॅप्लाइड फिजिओलॉजी, न्युट्रिशन अ‍ॅण्ड मेटाबोलिम’ या पत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. कोणतीही व्यक्ती, कोणत्याही वेळी आणि कोणत्याही स्थळी राहून आपली शारीरिक तंदुरुस्ती सुधारू शकते, असा दावा अभ्यासकांनी केला आहे.

याबाबत कॅनडातील मॅकमास्टर विद्यापीठाच्या प्राध्यापक मार्टिन गिबाला म्हणाले की, या संशोधनामुळे आता लोकांना त्यांच्या दैनंदिन आहारात व्यायामासाठीचे खास खाद्यपदार्थ अंतर्भूत करणे सहज शक्य होणार आहे. ज्यांची कार्यालये बहुमजली इमारतीमध्ये आहेत किंवा जे अशा इमारतींमध्ये राहतात, त्यांना सकाळी, दुपारी जेवणाआधी तसेच सायंकाळी काही वेळ वेगाने जिने चढणे सहज शक्य आहे. यातून परिणामकारक व्यायाम घडत असल्याचा त्यांचा अनुभव आहे, असे गिबाला यांनी सांगितले.

साधारणत: १० मिनिटांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने केलेला जोराचा व्यायाम किंवा हृदयासाठीचे ‘स्प्रिंट इंटरव्हल ट्रेनिंग’सारखे व्यायाम हे परिणामकारक असल्याचे यापूर्वीच्या अभ्यासात आढळले होते. आता केलेल्या अभ्यासात, तरुणांच्या एका गटाने तीन मजली जिने दिवसातून तीन वेळा वेगाने चढण्याचा क्रम चालवला. एक ते चार तासांच्या अंतराने ते ही क्रिया करीत होते. त्यांच्या शारीरिक क्षमतेची व्यायाम न करणाऱ्या गटाशी तुलना केली असता जिने चढल्याने हृदयाच्या आरोग्यात सुधारणा झाल्याचे दिसून आले, अशी माहिती कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाचे सहायक प्राध्यापक जोनाथन लिटिल यांनी दिली.