काही दिवसांपूर्वीच दक्षिण कोरियातील ख्यातनाम कंपनी Kia Motors ने भारतातील आपली भारतातील पहिलीच कार Kia Seltos एसयूव्ही लाँच केली. अनेक दिवसांपासून चर्चेत राहिलेल्या या गाडीला परवडणाऱ्या किंमतीत इतके दमदार आणि आधुनिक फीचर्स असल्याने ग्राहकांचाही शानदार प्रतिसाद मिळताना दिसतोय. आतापर्यंत 35 हजारांहून अधिक जणांनी या गाडीसाठी नोंदणी केली आहे. 25 हजार रुपयांमध्ये या कॉम्पॅक्ट एसयूव्हीसाठी 16 जुलैपासून बुकिंग सुरू होतं. ग्राहकांच्या शानदार प्रतिसादानंतर या गाडीसाठी वेटिंग पिरेड तब्बल चार महिन्यांपर्यंत पोहोचला आहे. कारचं प्रोडक्शन वाढवण्यावर आता कंपनीकडून भर दिला जाणार आहे.

9.69 लाख ते 15.99 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरुम) या बहुप्रतिक्षित कारच्या विविध व्हेरिअंट्सची किंमत ठरवण्यात आली आहे. दोन डिझाइनच्या पर्यायांसह ही कार भारतीय बाजारात उतरवण्यात आली असून दक्षिण कोरियाची ख्यातनाम कंपनी असलेल्या Kia Motors ची ही भारतातील पहिलीच कार आहे. बाजारात या कारची एमजी हेक्टर, टाटा हॅरियर आणि ह्युंडई क्रेटा यांसारख्या एसयूव्हीशी स्पर्धा असेल. विविध सात रंगांच्या पर्यायांमध्ये ही कार उपलब्ध असणार आहे.

टेक लाइन आणि जीटी लाइन अशा दोन डिझाइनमध्ये ही कार लाँच करण्यात आली आहे. कॉम्पॅक्ट एसयूव्ही प्रकारात एखादं मॉडल दोन डिझाइनच्या पर्यायांसह लाँच केली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. टेक लाइन अधिक प्रीमियम आणि फॅमिली-ओरिएंटेड स्टायलिंग पॅकेजसह आहे. तर, जीटी लाइनची स्टाइल स्पोर्टी आहे. याद्वारे तरुणांना आकर्षित करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. टेक लाइनमध्ये पाच व्हेरिअंट आणि जीटी लाइनमध्ये तीन व्हेरिअंटचे पर्याय उपलब्ध आहेत.

किआ सेल्टॉसच्या इंजिनचे तीन पर्याय आहेत. यामध्ये 1.4-लिटर पेट्रोल टर्बोचार्ज्ड, 1.5-लिटर पेट्रोल आणि 1.5-लिटर डिझेल इंजिनचा समावेश आहे. सर्व इंजिन ‘भारत स्टेज 6’ (बीएस 6) मानकांनुसार आहेत. ह्युंडई क्रेटासारख्या प्लॅटफॉर्मवर Seltos आधारीत आहे. तुलनेने सेल्टोस नक्कीच थोडीफार मोठी आहे. 1.5-लिटरच्या पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह 6-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन स्टँडर्ड असून दोन्ही इंजिनमध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय देखील उपलब्ध आहे. 1.4-लिटर टर्बोचार्ज्ड इंजिनसह 7-स्पीड ड्युअल क्लच ट्रांसमिशनचा पर्याय आहे.

कनेक्टेड कार –
ही कनेक्टेड कार आहे. यामध्ये UVO Connect नावाची एक कनेक्टिव्हिटी सिस्टिम आहे. यात नेव्हिगेशन, सेफ्टी-सिक्युरिटी, व्हेइकल मॅनेजमेंट, रिमोट कंट्रोल आणि कनव्हिनियन्स या 5 श्रेणीअंतर्गत 37 फीचर्स देण्यात आलेत. अँड्रॉइड ऑटो, अॅपल कार-प्ले आणि नेव्हिगेशनसह 10.25 इंच टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टिम, 8-स्पीकर साउंड सिस्टिम, एअर प्यूरिफायरसाठी रिमोट कंट्रोल, रिमोट इंजिन स्टार्ट-स्टॉप, व्हेइकल ट्रॅकिंग, व्हॉइस कमांड, 8-स्पीकर साउंड सिस्टिम, 360 डिग्री सराउंड कॅमेरा, 6-एअरबॅग, एबीएस, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, व्हेइकल स्टेबिलिटी मॅनेजमेंट, हिल स्टार्ट असिस्ट, फ्रंट व रिअर पार्किंग सेंसर्स आणि ब्लाइंड स्पॉट व्ह्यू मॉनिटर यांसारखे फीचर्स आहेत.