भारताच्या ऑनलाइन मार्केटमध्ये दबदबा निर्माण करणाऱ्या चीनच्या शाओमी कंपनीने आता ऑफलाइन मार्केटमध्येही एक नवा रेकॉर्ड बनवलाय. ऑफलाइन मार्केटमध्ये एका दिवसात तब्बल 10 लाखांहून अधिक उपकरणांची विक्री केल्याचा दावा कंपनीने केला आहे. ’10 जानेवारी रोजी ऑफलाइन मार्केटमध्ये शाओमीच्या 10 लाखांहून अधिक विविध उपकरणांची विक्री झाली, हा नवा विक्रम आहे’, असे कंपनीने म्हटले. एका परिपत्रकाद्वारे कंपनीने ही माहिती दिली.

10 लाखांहून अधिक विक्री झालेल्या उपकरणांमध्ये स्मार्टफोन, एमआय टीव्ही, एमआय इकोसिस्टिम आणि अन्य अ‍ॅक्सेसरिजचा समावेश आहे. पण अर्थात विक्रीमध्ये सर्वाधिक वाटा स्मार्टफोन्सचा होता. “शाओमीने 2017 च्या पहिल्या तिमाहीत ऑफलाइन बाजारात विस्ताराला सुरूवात केली होती, आणि यंदा अ‍ॅनिव्हर्सरीनिमित्त काहीतरी खास करण्याचं आम्ही ठरवलं होतं. सगळ्या टीमने कठोर मेहनत घेतली त्यामुळे ऑफलाइन मार्केटमध्ये एकाच दिवसात तब्बल 10 लाखांहून अधिक उपकरणांची विक्रीचा विक्रम शक्य झाला’, अशी प्रतिक्रिया शाओमी इंडियाचे प्रमुख (ऑफलाइन ऑपरेशन्स) सुनील बेबी यांनी दिली.

भारतात शाओमीचे सध्या 2500 पेक्षा अधिक Mi स्टोअर, 75 पेक्षा अधिक Mi होम आणि 20 पेक्षा अधिक Mi स्टुडिओ आहेत. याशिवाय कंपनीकडे 7000 पेक्षा अधिक पार्टनर स्टोअर आहेत. कंपनीने पहिल्या ब्रँड एक्सक्लुसिव रिटेल स्टोअरची (Mi Home)सुरूवात 10 मे 2017 रोजी केली होती, त्यावेळी अवघ्या 12 तासांमध्ये विक्रमी 5 कोटींहून अधिक महसूल मिळाला होता.