अशोक रावकवी rowkavi@gmail.com

‘# मी टू’मुळे सगळं वातावरण खवळून उठलं आहे. स्त्री आणि पुरुष या दोहोंमध्ये पेटलेल्या या युद्धात समलिंगी व्यक्तींची स्थिती मात्र दोहोंच्या कात्रीत सापडल्यासारखी झालेली आहे.

सध्या सगळ्या वृत्तपत्रांत आणि अन्य प्रसारमाध्यमांतही मोठय़ा प्रमाणावर चर्चा केल्या जाणाऱ्या ‘# मी टू ’ याबाबत आज आपण बोलू या. यात मुख्यत: स्त्रियांच्या लैंगिक शोषणाचे उल्लेख सर्वाधिक प्रमाणात येत असले, तरी हा विषय आमच्या एलजीबीटी चळवळीशीसुद्धा अनेक प्रकारे जोडला गेलेला आहेच. त्याआधी वाचकांना मी एका ऐतिहासिक संदर्भाची आठवण करून देऊ इच्छितो. अमेरिकेत सुरुवातीला स्त्री-मुक्तीची चळवळ सुरू झालेली होती, त्यानंतर काहीशी त्या पाश्र्वभूमीवरच समलिंगींची चळवळ सुरू झाली. त्या स्वातंत्र्यानंतरच अमेरिकेची मोठय़ा प्रमाणावर आर्थिक प्रगती आणि विकास झाला, असं म्हणायला हरकत नाही.

इतिहासाची मागची काही पानं चाळून बघताना अमेरिकेच्या जर्मनी आणि जपानसोबतच्या युद्धाच्या काळात देशात मनुष्यबळाची प्रचंड कमतरता होती, असं आपल्याला दिसेल. बहुसंख्य पुरुष युद्धाच्या आघाडीवर गेले असल्यामुळं देशांतर्गत नागरी सेवांसाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची पूर्तता स्त्रियांनीच केलेली होती. यातूनच स्त्रिया आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र झाल्या. त्या नव्या बळावर त्यांनी स्वत:चं आयुष्य आणि कुटुंब या दोहोंनाही यशस्वीरीत्या सावरलं. या साऱ्या घडामोडींचा पितृसत्ताक पद्धतीवर मोठाच परिणाम झाला. याआधी पुरुषांची स्त्रियांच्या आयुष्यावर असणारी जी घट्ट पकड होती, ती यामुळं काहीशी सलावली.

आता परावलंबन संपलं होतं. मिळालेल्या आर्थिक-सामाजिक स्वातंत्र्यामुळं स्त्रिया खुलेपणानं आपल्या समलिंगी पतीच्या खटकणाऱ्या समलिंगी लैंगिक वर्तनाबद्दल प्रश्न करू लागल्या. यातूनच घटस्फोटाचं प्रमाण मोठय़ा प्रमाणावर वाढलं. यालाच ‘रिनो (फील्ल) डायव्होर्स’ असं म्हणतात. (अमेरिकेच्या पश्चिम भागातल्या कॅलिफोर्नियामध्ये रिनो नावाच्या शहरात झटकन घटस्फोट मिळण्याची सोय होती, त्यावरून हे नाव पडलं.) लवकरच असे ‘रिनो घटस्फोट’ सर्रास होऊ लागले. यांपैकी अनेक स्त्रियांना आपला पती समलिंगी असल्याचा शोध लागला होता आणि त्यांना ते मान्य नव्हतं, हे या खटल्यांमागचं प्रमुख कारण होतं.

आज भारतातदेखील एका बाजूला ‘# मी टू ’ नावाची एक नवी लैंगिक शोषणाविरुद्धची चळवळ उभी राहते आहे, तर दुसऱ्या बाजूला  अनेक स्त्रिया भारताच्या शहरी भागात मनुष्यबळाचा एक मोठा भाग बनून राहिलेल्या आहेत. यापैकी अनेक स्त्रियांना पुरुषांचा वर्चस्ववादी दृष्टिकोन आवडत नाही आणि अनेक वर्षांपूर्वी त्यांचा केला गेलेला लैंगिक छळही त्यांना आठवतो. भारतात या चळवळीची सुरुवात व्हायला कारण ठरली तनुश्री दत्ता नावाची अभिनेत्री. आणि त्यानंतर पुरुष कशा प्रकारे आपल्या सत्तेचा गैरवापर करत आहेत, याच्या अनेक भयंकर गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. जवळजवळ प्रत्येकाला हे स्त्री आणि पुरुष यामध्ये एक युद्धच सुरू झालं आहे असं वाटतं. आता तर काही ठिकाणी पुरुषांना कार्यालयातल्या स्त्रियांना भेटल्यावर त्यांना औपचारिक हाय हॅलो म्हणण्याचीही भीती वाटते, अशी परिस्थिती आहे. काही ठिकाणी ‘स्त्री कर्मचाऱ्यांसोबत कशा प्रकारे वागलं जावं’ यासाठी नवे नियम तयार करण्यात आलेले आहेत. यातला सगळ्यात दु:खद भाग म्हणजे भूतकाळात स्त्रियांचं इतक्या मोठय़ा प्रमाणावर शोषण झालेलं आहे की अगदी माझ्या आवडत्या लता मंगेशकर यांनीसुद्धा पूर्णत: फक्त स्त्रियांची बाजूच घेतलेली आहे.

स्त्री-पुरुषांच्या या युद्धात समलिंगी व्यक्तींचं नेमकं काय स्थान आहे, ते अशी एखादी व्यक्तीच सांगू शकेल. सहसा स्त्री किंवा पुरुष यांना स्वत: आपल्या लैंगिकतेबाबतीत असुरक्षितता वाटत असेल, तर ते समलिंगी व्यक्तींचा तिरस्कार करतात. नुकतंच घडलेलं एक उदाहरण सांगतो. गेल्या आठवडय़ात मी दिल्लीहून विमानानं मुंबईला परत येत होतो. विमानातल्या एका स्त्रीनं मी ‘समलिंगी चळवळीतला कार्यकर्ता’ असल्याचं ओळखलं. तिनं हात हलवत इतक्या जोरानं ओरडून हे सांगितलं, की विमानातल्या माझ्याजवळ बसलेल्या सगळ्यांनाच माझ्या लैंगिक प्राधान्याबाबत नीटच कळलं. मी काय करणार होतो? तिचे आभार मानले आणि शांत बसलो झालं.

विमानात जेव्हा प्रवाशांना भोजन दिलं जाऊ लागलं, तेव्हा आणखीनच वाईट गोष्टी घडू लागल्या. एअर होस्टेस प्रवाशांना भोजनाचे ट्रे देत असताना दोन तरुणांनी आपल्या फोनमधल्या कॅमेरांनी त्यांचे फोटो काढायला सुरुवात केली. एक एअर होस्टेस ट्रे उचलायला खाली वाकल्यावर, तर एका तरुणानं तिचा पाठीमागून फोटो काढला. मी लगेचच या गोष्टीला आक्षेप घेतला आणि तो अत्यंत चुकीची गोष्ट करत असल्याचं सांगितलं. मग दोन्हीही एअर होस्टेसनीसुद्धा त्या तरुणाला फोनमध्ये काढलेले सगळे फोटो डिलीट करायला सांगितले. प्रवासादरम्यान मी वॉशरूमकडं जात असताना ते दोघे तरुण आणि त्यांच्या गर्लफ्रेंड उठून माझ्याजवळ आल्या. त्या तिथंच माझ्याशी भांडायला लागल्या. ‘‘फोटो काढणं हा आमचा हक्क आहे त्या मुली तर ‘केवळ’ एअर होस्टेस आहेत.’’ हे कमी म्हणून की काय, त्या तरुणांच्या मत्रिणी तर मला म्हणाल्या, ‘‘तुम्ही तर समलिंगी आहात. तुम्हाला तर स्त्रियांमध्ये कुठलाच रस नाही. मग तुम्हाला नेमका काय त्रास आहे?’’

त्यांचा हा युक्तिवाद ऐकून मी थक्कच झालो. कामाच्या ठिकाणी आपलं नित्यकर्तव्य इमानानं निभावणाऱ्या आणि प्रवाशांशी सौजन्याने वागणाऱ्या स्त्रीसोबत हे लोक वाईट वर्तन करत होते. वर या गटातल्या स्त्रिया आणि पुरुष दोघेही माझ्यावरच मी समाजविरोधी कृत्य करत असल्याचा आरोप ठेवत होते. माझ्यावर हा आरोप करण्याचं आणखी कारण म्हणजे मी एक समलिंगी होतो. त्यामुळं मला या स्त्री-पुरुष युद्धात ढवळाढवळ करण्याचा कोणताच हक्क नाही, असं त्यांना वाटत होतं. प्रवास संपल्यावर त्या एअर होस्टेसनं मला या बेताल आणि बेशरम लोकांशी भांडल्याबद्दल माझे आभार मानले. स्त्री-पुरुष युद्धात समलिंगी व्यक्तींचं स्थान काय आहे, याचं हे एक ढळढळीत उदाहरणच माझ्याबाबतीत घडलेलं होतं.

माझी एक स्मिता नावाची मत्रीण आहे. ही मराठी स्त्री मुंबईतल्या एका आघाडीच्या वृत्तपत्राची संपादक आहे. याआधी दोन पुरुष जोडीदारांसोबत कटू अनुभव आल्यामुळं आता ती एकटीच राहते. मात्र ‘मी अबला आहे’ असं म्हणताना किंवा रडताना मी तिला आजवर पाहिलेलं नाही. ती रात्री उशिरा टॅक्सीनं प्रवास करायला कधीच घाबरत नाही, जे पुरुष तिचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याविरोधात ती उभी राहते. लाळघोटय़ा पुरुषांना ती अजिबात दाद देत नाही. असं असूनही या ‘# मी टू ’ चळवळीचं तिला आश्चर्यही वाटतं आहे आणि धक्काही बसलेला आहे.

उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या दसरा मेळाव्यात जे सांगितलं त्यातूनही असाच दृष्टिकोन दिसतो : ‘अशा लोकांना एक थोबाडीत द्या आणि मग शिवसनिकांकडे सोपवा.’ आमची स्मिता शिवसनिकांना वगैरे बोलावण्याच्या फंदात पडत नाही. केवळ आपल्या जिभेच्या फटकाऱ्यानं, एका वाक्यातच ती सहा फुटी पुरुषांना गारद करताना मी तिला पाहिलेलं आहे. (मुंबई महापालिकेतल्या पद्मजा केसकरही अशाच होत्या.)

स्मिताचं या ‘# मी टू ’ चळवळीबाबत जे म्हणणं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. ‘‘होय, हे खरंच आहे,’’ ती म्हणते. ‘‘पुरुषांची सत्ता असणाऱ्या या जगात स्त्रियांना योग्य ते स्थान दिलं जात नाही. पण जग असंच आहे हे मान्य करा. ते बदलणं आपलं काम आहे. सगळेच पुरुष वाईटच आहेत असं चित्र रंगवणं धोकादायक आहे. अशानं नंतर कुणीच तुमच्याशी बोलणार नाही. मग तुम्ही साऱ्या कुठे जाल?’’ तिच्या म्हणण्याचा अर्थ इतकाच आहे, की ‘‘जग केवळ काळ्या किंवा पांढऱ्या रंगानं बनलेलं नाही आणि ‘मी टू’ चळवळीतल्या काही स्त्रिया या दोहोंमधल्या करडय़ा भागामध्येदेखील आहेत.’’

स्मिता आणि तिच्या शिवाजी पार्क किंवा परळ इथं राहणाऱ्या स्वयंपूर्ण मत्रिणी जे म्हणतात ते आमच्या एलजीबीटी चळवळीलाही लागू पडतं. ‘‘तुम्ही स्वत: नीटपणे वागायला शिका, अन्यथा कसं वागायचं ते आम्ही तुम्हाला शिकवू.’’ ‘# मी टू ’ चळवळ जास्त करून सुस्थितीत असलेल्या आणि उच्चभ्रू स्त्रिया प्रामुख्याने चालवत आहेत, हेही त्यांना ठाऊक आहे. त्याखालच्या आर्थिक स्तरातल्या, अगदी सामान्य कुटुंबातल्या स्त्रिया, मुंबादेवीच्या मुली या शहरात मुक्तपणे काम करू शकतात. त्या केवळ पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आर्थिक जबाबदारी तर उचलत असतातच, पण त्यांनी अन्य कुणाच्या गैरवर्तनामुळं आपला आत्मविश्वास गमावू दिलेला नाही. या शहरातली कोणतीही स्त्री, मग मासे विकणारी कोळीण असो, भाजी विक्री करणारी असो किंवा घरकाम करणारी स्त्री – ती साधी आठवडय़ाची सुटीदेखील घेत नाही.

मला इथं ‘# मी टू ’ चळवळीतल्या कुणाही स्त्रियांचा अवमान करायचा नाही. पण प्रत्येक पुरुषावर रावणाचा पोषाख चढवून त्याआधारे समाजाकडून स्वत:करिता मान मिळवणंही योग्य नाही, हे आमच्या एलजीबीटी चळवळीनंही जाणून घेतलं पाहिजे. रावणाची दहा डोकी एकाचवेळी दहा वेगवेगळी सत्यं सांगत असतात, हे आपण विसरता कामा नये.

अनुवाद : सुश्रुत कुलकर्णी

chaturang@expressindia.com