डॉ. तिलोत्तमा पराते

वाढत्या वयानुसार स्त्रियांमध्ये प्रकृतीच्या काही विशिष्ट समस्या सुरू होतात. अशा वेळी अनेकदा डॉक्टर आणि औषधांना पर्याय उरत नाही. चांगल्या आरोग्यासाठी योग्य जीवनशैली अंगिकारणे आणि तरीही काही समस्या उद्भवल्याच तर त्यावर वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात औषधोपचार करून आजारावर मात करणे आवश्यक आहे.

हाडांची ठिसूळता म्हणजे काय?

‘ऑस्टिओपोरोसिस’ म्हणजे हाडांची घनता कमी असणे. या आजारात हाडे एवढी ठिसूळ होतात की, त्यामुळे फॅ्रक्चर होण्याची भीती वाढते. हा एक ‘सायलेंट’ आजार आहे. जोपर्यंत फ्रॅक्चर होत नाही, तोपर्यंत त्याचे गांभीर्य कळत नाही. स्त्रियांना वाढत्या वयात हा आजार अधिक प्रमाणात होतो. विशेषत: रजोनिवृत्तीच्या काळात.

ऑस्टिओपोरोसिसचे प्रकार

वृद्ध महिलांमध्ये ऑस्टिओपोरोसिस हा आजार रजोनिवृत्तीनंतर अथवा वृद्धत्वाकडे झुकतानाच्या काळात होतो. इतर गंभीर आजार, दीर्घकाळ घ्यावी लागलेली विशिष्ट औषधे किंवा सदोष जीवनशैलीमुळेही हा आजार होतो. वृद्ध महिलांमध्ये ‘इस्ट्रोजेन’ या संप्रेरकाच्या कमतरतेमुळे हाडांचा ऱ्हास होतो. त्यामुळे हाडे ठिसूळ होऊन त्यांचे वजन कमी होते, ती हलकी होतात. परिणामी पाठीच्या कण्याचे वा मनगटाचे हाड मोडणे ही या आजारात सामान्य बाब होऊन जाते. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने वयाच्या चाळिशीनंतर आपल्या हाडांची काळजी घेणे आवश्यक आहे. वयोमानामुळे जो ऑस्टिओपोरोसिस होतो तो स्त्री-पुरुष दोघांनाही वयाच्या साधारणत: पंच्चाहत्तरीनंतर होतो. त्यात शरीरातील कॅल्शियमचे शोषण कमी होते. ‘ड’ जीवनसत्त्वाची पातळी कमी होण्यासारखी लक्षणे आढळतात. यामध्ये हाडांच्या आतील सर्व भागांवर दुष्परिणाम होतो. विशेषत: पडल्यावर कंबरेच्या हाडांना दुखापतीची शक्यता वाढते. ज्यांची देहयष्टी अथवा बांधा एकदमच बारीक आहे, हाडे कमकुवत आहेत, अशा लोकांनाही ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोका असतो.

ऑस्टिओपोरोसिसचे निदान

  • ज्या हाडांना ऑस्टिओपोरोसिसची शक्यता दिसत आहे, त्या भागाचा ‘एक्स-रे’ काढल्यास निदान होऊ शकते.
  • ऑस्टिओपोरोसिसच्या निदानासाठी ‘बीएमडी मशीन’ही वापरले जाते. आपला उजवा पाय त्या मशीनमध्ये ठेवल्यास कॉम्प्युटरच्या मदतीने आपणास हाडांची घनता कळू शकते. हीसुद्धा निदानाची एक चांगली पद्धत आहे.
  • ‘डेक्झा स्कॅन’ मशीन हेही एक अत्याधुनिक उपकरण आहे. यात प्रत्येक सांध्यामध्ये किती प्रमाणात ऑस्टिओपोरोसिस आहे हे कळते. ही निदानाची सर्वोत्तम पद्धती आहे. यामध्ये रुग्णाला मशीनवर झोपावे लागते. पाठीचा कणा, दोन्ही मनगटे, कंबरेची दोन्ही हाडे यामध्ये महत्त्वाच्या सांध्यांचे फ्रॅक्चर होण्याची भीती किती आहे हे यातून कळते.

महत्त्वाचे-

नियमित व्यायाम, कॅल्शियम व जीवनसत्त्व ‘ड’ असलेला आहार आणि धूम्रपान व मद्यपानापासून दूर राहिल्याने ऑस्टिओपोरोसिसपासून दूर राहणे आणि फॅ्रक्चर टाळणे शक्य आहे.

ऑस्टिओपोरोसिसची लक्षणे

  • कमकुवत आणि पातळ हाडे ’ लवकर तुटणारी हाडे
  • नाजूक हाडे ’ हाड मोडणे (फॅ्रक्चर) ’ सहजरीत्या फ्रॅक्चर होणे
  • सतत कंबर दुखणे ’ मणके घासल्यामुळे उंची कमी होणे
  • पाठीच्या कण्यामध्ये बाक येणे ’ सांधे दुखणे ’ संपूर्ण शरीर दुखणे

काय करावे-

  • धूम्रपान व मद्यपानाचा दुष्परिणाम हाडांवर होतो, त्यामुळे ते दोन्ही टाळावे.
  • कॉफीच्या अतिसेवनानेही हाडांवर दुष्परिणाम होतो, तेव्हा दिवसभरातून दोनच कप कॉफी बरी.
  • आहारामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात मिळावे याची खबरदारी घ्यावी.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याने ‘ड’ जीवनसत्त्वाच्या गोळ्या व इंजेक्शनचा वापर करावा.

(शब्दांकन- महेश बोकडे)