विविध विकारांपासून लहान मुलांचा बचाव करणे ही आई-वडिलांची जबाबदारी असली तरी ते जोखमीचे काम! बालकांच्या विविध आजार आणि त्यांची काळजी कशी घ्यावी याबाबतचे हे सदर..

पाच वर्षांच्या सुबोधला सतत सर्दी-खोकला होत असे. अगदी महिन्यातून एकदा. काही वेळा तर पंधरवडय़ातून एकदा. दरवेळी यावर जुजबी उपचार घेऊन बरा व्हायचा, पण सतत होणाऱ्या सर्दी-खोकल्यामुळे सुबोधची तब्येतही सुधारत नव्हती. सुबोधच्या आईला काय करावे काही कळेना.

सुबोधच्या आजाराची माहिती घेतली, तेव्हा कळले की त्याच्या आजाराचा प्रकार ज्याला आपण व्हायरल म्हणतो, अशा सर्दी-खोकल्यापेक्षा वेगळा होता. आधी खोकला, त्यानंतर सर्दी आणि मग एकदोन दिवसांनी ताप असा काहीसा हा प्रकार होता. नियमित सर्व मुलांना अधूनमधून होणाऱ्या या संसर्गजन्य आजारात आधी ताप आणि मग सर्दी-खोकला असा क्रम आढळतो, तसेच सुबोधचा खोकला रात्री जास्त वाढायचा. तो झोपल्यावर बऱ्याचदा सू-सू असा शिट्टीसारखा आवाज यायचा. ही सगळी लक्षणे बालदमा असल्याचे दर्शवते. नियमित होणारा सर्दी-खोकला आणि दम्याचा सर्दी-खोकला यातला फरक काय? हा आमचे शिक्षक विचारत असलेला प्रश्न किती महत्त्वाचा होता आणि निदानासाठी निर्णायक होता हे लक्षात आले.

सुबोधच्या आजोबांना अ‍ॅलर्जीचा त्रास होता आणि प्रवासात किंवा संध्याकाळच्या वेळी सुबोधचा त्रास वाढायचा. या सगळ्या गोष्टींमुळे सुबोधला बालदम्याचा त्रास असल्याचे निदान पक्के झाले. सुबोधच्या पालकांना हे निदान सांगितले, तेव्हा त्यांचे प्रश्न बरोबर होते – डॉक्टर सुबोधला दम लागत नाही. लहान मुलांमधील दमा हा मोठय़ा व्यक्तींसारखा नसतो. त्यात दम लागतोच असे नाही. दम लागणे हा बालदम्याच्या अनेक लक्षणांपकी एक आहे आणि ही लक्षणे सहसा मोठय़ा म्हणजे ५ वर्षांच्या पुढील वयोगटात दिसून येतात. लहान मुलांमध्ये सतत आणि रात्री वाढणारा कोरडा खोकला, वारंवार सर्दी-खोकला, श्वास घेताना शिट्टीसारखा आवाज येणे, छातीत दुखणे, फक्त थकवा येणे, स्वतहून शारीरिक हालचाली कमी करणे किंवा कमी खेळणे, आपल्या मित्रांपेक्षा कमी शारीरिक हालचाली करणे, अशी लवकर ओळखू न येणारी लक्षणेही दिसून येतात. दमा हा थेट दमा म्हणून समोर येत नाही. तो अशा अनेक लक्षणांच्या आडून हळूच दार ठोठावत असतो. पण हे दार ठोठावणे हळू असले तरी सततचे असल्याने दम्याचे निदान आमच्या हातून निसटत नाही, असे म्हटल्यावर सुबोधच्या पालकांना निदान पटले.

आता पुढे काय? मुळीच काळजी करायची नाही. तोंडावाटे पंपमधून दिले जाणारे दमा नियंत्रणात ठेवणारे स्टीरॉइडचे औषध श्वासावाटे सुबोधला द्यायचे. एवढे आहे की ते चुकवायचे नाही. जरा श्वास वाढल्यासारखा वाटला की श्वसननलिका फुगविणारे औषध ४ ते ५ दिवस घ्यायचे. तेही परत पंपद्वारे श्वासातूनच. दर तीन महिन्यांनी तपासणीसाठी यायचे. लक्षणांमध्ये घट दिसून आली की हळू हळू स्टीरॉइडचा पंप कमी करायचा. स्टीरॉइड म्हटले की सुबोधच्या आईला घाबरायला झाले. अहो हे स्टीरॉइड खूप कमी प्रमाणात असते आणि त्याचे मुळीच दुष्परिणाम नसतात हे समजून सांगितल्यावर त्यांना हायसे वाटले. फक्त औषधे पुरेशी नाहीत. बाहेर जाताना नाकाला रुमाल बांधणे, त्रास होतो त्या वेळेला म्हणजे शक्यतो संध्याकाळी बाहेर न जाणे, खिडक्या बंद ठेवणे, घर स्वच्छ करताना न झाडता ओल्या कपडय़ाने पुसून काढणे अशा गोष्टीही सुबोधच्या पालकांना समजून सांगितल्या.

सुबोधचा हा दमा बरा होईल का?

सगळ्यात अवघड प्रश्न? छे ! सगळ्यात सोपा प्रश्न. दमा म्हणजे सुबोधच्या फुप्फुसांना येणारा राग आहे. राग जसा नियंत्रित करावा लागतो, तसेच दम्यावर नियंत्रण ठेवावे लागते. काही गोष्टींमुळे आपला राग वाढतो तेव्हा सतर्क राहावे लागते. दम्याचे तसेच असते. योग्य काळजी घेतल्यास दमा नियंत्रणात राहतो आणि इतरांसारखे सर्वसामान्य आयुष्य सुबोधला जगता येईल. हे सांगितल्यावर सुबोधच्या पालकांची काळजी कमी झाली. गेल्या महिन्यात कळले की त्याची शाळेतील क्रिकेट टीममध्ये निवड झाली.

amolaannadate@yahoo.co.in