गेले काही महिने देवमाशांच्या मृत्यूंच्या बातम्या येत आहेत. कधी तामिळनाडूहून, कधी अलिबाग तर कधी मुंबईहून. माणसांचा फारसा वावर नसलेल्या किनाऱ्यावर आलेल्या माशांच्या घटनाही आहेतच. एवढय़ा अजस्र जीवाला नेमके काय होते, ते मात्र अनेकदा अनुत्तरित राहते किंवा त्यांची कारणे समजली आणि ती मानवनिर्मित असली तर ती दूर करण्याबाबत कोणाला फारसे सोयरसुतक नसते.
या वर्षांतील देवमाशांसंदर्भातील पहिली मोठी बातमी आली ती तामिळनाडूहून. थुथुकोडी किनाऱ्यावर शंभरहून अधिक पायलट देवमाशांचा मोठा थवा लागला होता. त्यातील काही मासे जिवंत होते. वनविभाग आणि केंद्रीय सागरी मत्स्यसंशोधन केंद्राने स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने या माशांना पुन्हा समुद्रात सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र हे मासे पुन्हा किनाऱ्याकडेच निघाले आणि आपल्या इतर सोबत्यांसोबत मृत्यू पावले.. चाळीस वर्षांपूर्वी, १९७३मध्ये थुथुकोडी किनाऱ्यावर याच प्रकारे पायलट देवमाशांचा थवा मृत्युमुखी पडला होता. देवमाशांचा असा थवा लागणे ही तशी दुर्मीळ गोष्ट नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात. थव्याला दिशा देणारा मुख्य माशाच्या चुकीमुळे खोल समुद्रात जाण्याऐवजी संपूर्ण थवा किनाऱ्याकडे येऊन अडकला असेल, किनाऱ्यावर अन्नाच्या शोधात आलेल्या देवमाशांच्या थव्याला भरती-ओहोटीचे गणित लक्षात न आल्याने ओहोटी वेळी पुन्हा समुद्रात वेगाने परतणे शक्य झाले नसेल, एखादा मोठा भक्षक देवमासा मागावर असल्याचे लक्षात आल्याने भरधाव वेगात हे मासे चुकीच्या दिशेने आले असतील किंवा भारताची पूर्व किनारपट्टीचा उतार तीव्र असल्यानेही हा थवा अडकला असण्याची शक्यता आहे.
पूर्व किनारपट्टीवरील ही घटना ताजी असतानाच मुंबईच्या जुहू किनारपट्टीवर ३६ फुटी देवमासा लागला. अंगावर खरचटल्याच्या खुणा असलेला हा मासा दोन दिवसांपूर्वी समुद्रातच मरण पावला असल्याची शक्यता होती. तसे कोकण किनारपट्टीवर याआधीही काही देवमासे मृत झाले होते. मात्र आर्थिक राजधानीतील माशाएवढी त्यांना प्रसिद्धी मिळाली नाही. अडीच ते तीन हजार किलो वजनाच्या या माशाच्या उदरात प्रचंड वायू साठून ते तोंडातून बाहेर आले होते. या वायूचा स्फोट होऊ नये म्हणून तो वायू बाहेर काढण्यासाठी आधी प्रयत्न करावे लागले. त्यातच त्याच्या शवविच्छेदनाची पुरेशी व्यवस्था नसल्याने त्याला दोन क्रेनच्या साहाय्याने उचलून काही अंतरावर गाडण्यात आले. अलिबागच्या किनाऱ्यावर काही महिन्यांपूर्वी याच प्रकारचा ४२ फूट लांबीचा देवमासा आला होता. हा मासा जिवंत होता. त्याला पुन्हा समुद्रात ढकलण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र प्रचंड आकाराच्या या माशाला हलवणे कठीण गेले आणि काही तासांनी या देवमाशाचा मृत्यू झाला. गेल्या आठवडय़ातही रायगडच्या किनाऱ्यावर पुन्हा एक मृत देवमासा आढळला. मात्र तो जागचा हलवणेही कठीण असल्याने त्याला तिथेच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
महासागरातील देवमासे हे खाद्यासाठी तसेच पिल्लांना जन्म देण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करत असले तरी अरबी समुदातील देवमासे अशा प्रकारे मोठे स्थलांतर करत नाही. हे मासे ओमानच्या बाजूला तिनशे ते चारशेच्या कळपाने समुदात फिरताना दिसतात. ओमानच्या दक्षिण बाजूला सोमालिया देशाजवळ पाण्याचा प्रवाह आहे, त्याला सोमाली करंट म्हणतात. दक्षिण ध्रुवापासून आलेला हा करंट सोमालियाकडून भारतीय उपखंडाकडे येतो. या प्रवाहासोबत देवमासे प्रवास करतात. देवमासे हे सस्तन प्रकारातील असल्याने त्यांच्याकडे पिल्लांचा सांभाळ केला जातो. आईसोबत लहान देवमासे खाद्याच्या शोधात पश्चिम किनाऱ्यावर येतात. दरम्यानच्या काळात आई मुलांना सोडून गेली किंवा आईपासून ताटातूट झाली की हे लहान देवमासे दिशाहीन होतात. किनाऱ्यावर खाद्यासाठी आलेल्या या पिल्लांना भरती-ओहोटीचे गणित लक्षात येत नाही. ओहोटी सुरू झाली की भारीभक्कम वजनामुळे तातडीने मागे फिरणे त्यांना जमत नाही आणि ते अडकून पडतात. साधारण थंडी संपली की जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान असे मासे किनाऱ्याला लागतात.
सध्या किनाऱ्याला येत असलेले देवमाशांच्या मृत्यूमागे ही नैसर्गिक कारणे असतीलही. पण यासोबतच आणखी एका कारणाकडे संशोधक लक्ष वेधत आहेत. साउंड नेव्हिगेशन अ‍ॅण्ड रेंजिंग (सोनार) म्हणजे अत्यंत कमी तरंगलांबी असलेला आवाज. समुद्रातील वाहनांचा शोध घेण्यासाठी सोनारचा उपयोग केला जातो. देवमासा, डॉल्फिन हे आवाजाबाबत संवेदनशील असतात. या तरंगलहरींमुळे त्यांच्या कानात आणि मेंदूमध्ये अंतर्गत रक्तस्रव होतो. त्यामुळे त्याचा मृत्यू होण्याची किंवा दिशाहिन होऊन ते किनाऱ्यावर येण्याची शक्यता वाढते. काही वेळा हे आवाज म्हणजे त्यांना अधिक मोठा देवमासा येत असल्याचा संदेश वाटतो आणि त्यामुळे भरधाव वेगात ते दिशाहिन झेपावतात.
चाळीस वर्षांपूर्वी १९७३ मध्ये तामिळनाडूच्या थुथुकोडी किनाऱ्यावर देवमासे लागले त्याच्याआधी दोन वर्षे १९७१चे युद्ध झाले होते. त्यावेळी संरक्षण दलाकडून सोनारचा वापर जास्त झाला होता. अरबी समुद्रातही वेगवेगळ्या कारणांसाठी अशाच ध्वनिलहरींचा वापर वाढला आहे का याचा अभ्यास करण्याची गरज आहे. त्यासाठी समुद्रात काही ठिकाणी ध्वनिलहरी मोजणारी यंत्र लावावी लागतील. काही वर्षे अभ्यास केल्यावर समुद्रातील आवाज नेमका किती वाढला आहे, ते समजू शकेल. मात्र जमिनीवरच्या प्रश्नांच्या जंजाळात अडकलेल्या प्रशासनाला समुद्रातील माशांना कितीसा प्राधान्यक्रम द्यावासा वाटेल.
प्राजक्ता कासले prajakta.kasale@expressindia.com