25 March 2019

News Flash

डेंग्यू, मलेरियाला घाबरू नका!

विषाणूजन्य ताप, डेंग्यू आणि मलेरियाचा ताप

पावसाळा सुरू झाला की डेंग्यू, हिवताप(मलेरिया), लेप्टोस्पायरोसिस आदी आजारांमुळे माणसे दगावल्याचे कानावर येत राहते आणि त्याचबरोबरीने या आजारांची भीतीही वाढू लागते. वास्तविक हे मृत्यू वेळेत योग्य उपचार न घेतल्याने झालेले असतात. एरवी औषधोपचार आणि योग्य काळजी घेऊन रुग्ण बरे होऊ शकतात. हे आजार झाल्यानंतर काय काळजी घ्यावी याबाबत केईएम रुग्णालयाचे सहयोगी प्राध्यापक आणि मेडिसिन युनिट प्रमुख डॉ. संतोष सलाग्रे यांनी दिलेली माहिती..

पावसाळ्यामध्ये प्रामुख्याने डेंग्यू, हिवताप आणि लेप्टोस्पायरोसिस या तीन आजारांचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात होत असतो. या तिन्ही आजारांमध्ये शरीरातील प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होते. त्यामुळे रक्तस्राव होणे, थुंकीतून रक्त पडणे, लघवी किंवा विष्ठेमधून रक्त पडणे, अंगावर लाल चट्टे येणे ही लक्षणे दिसून येतात. साधारणपणे मानवी शरीरामध्ये अडीच ते साडेतीन लाख प्लेटलेट्स असतात. या पेशी एक लाखांपेक्षा कमी झाल्या असतील, तर काळजी घेणे आवश्यक असते मात्र धोकादायक नसते. प्लेटलेट्सची संख्या २० हजारांहून कमी झाल्यास मात्र धोक्याचे लक्षण आहे. प्लेटलेट्सची संख्या एक लाखापेक्षा कमी झालेल्या रुग्णांना रक्तस्राव होत असल्यास त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करून पेशी चढवल्या जातात. साधारणपणे एका पिशवीमधून ५ ते १० हजार प्लेटलेट्स शरीराला मिळतात. त्यामुळे एकावेळी चार ते पाच पिशव्या चढवल्या जातात. जेणेकरून २० हजार प्लेटलेट्स असलेल्या रुग्णाच्या शरीरातील प्लेटलेट्सची संख्या किमान ६० हजारांपर्यंत पोहोचेल.

विषाणूजन्य ताप, डेंग्यू आणि मलेरियाचा ताप

या सर्व आजारांची लक्षणे साधारण एकसमान असून सुरुवातीला ताप येतो. त्यामुळे विषाणूजन्य ताप आणि डेंग्यू, मलेरियाचा ताप कसा ओळखावा, असा प्रश्न सामान्य माणसाला पडतो. विषाणूंमुळे येणारा ताप साधारणपणे दोन ते चार दिवस असतो. या तापामध्ये अंगदुखी, उत्साह कमी होणे, थकवा येणे ही लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात. व्यवस्थित आहार, जास्तीत जास्त पाण्याचे सेवन आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेऊन यातून घरच्या घरीच बरे होता येते.

मात्र थंडी भरून ताप येत असेल, काही ठरावीक कालावधीने उदाहरणार्थ दर आठ किंवा १२ तासांनी ताप येणे, उलटी, मळमळ किंवा जुलाब होणे, दम लागणे, अन्नपचन न होणे आदी लक्षणे असल्यास ताप अंगावर न काढता तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचार घ्यावेत. रुग्णाचा रक्तदाब, नाडी तपासून रुग्णाला ग्लुकोजची आवश्यकता आहे का याबाबत डॉक्टर निर्णय घेतात.

आकडी किंवा बेशुद्ध अवस्था, रक्तस्राव, रक्ताची उलटी, हात आणि पायावर लाल पुरळ यायला लागले तर लगेचच या रुग्णांना मोठय़ा रुग्णालयांमध्ये दाखल करणे गरजेचे आहे.

लहान मुले किंवा वयोवृद्ध रुग्णांना खूप जास्त प्रमाणात म्हणजे साधारण १०४-१०५ अंश.सें. ताप आल्यास आकडी येऊ शकते. तेव्हा या वयोगटातील रुग्णांना तापाच्या औषधांसोबत मोकळी हवा आवश्यक असते. त्यामुळे खिडक्या, दारे उघडे ठेवावीत, पंखा लावावा, अंगावर कमीत कमी कपडे घालावेत आणि साध्या किंवा थंड पाण्याने अंग पुसून घ्यावे. जेणेकरून ताप डोक्यापर्यंत पोहोचून आकडी येणार नाही.

डेंग्यू किंवा मलेरियामध्ये घ्यावयाची काळजी

तापाचे निदान झाल्यानंतर घाबरून न जाता तात्काळ औषधोपचार सुरू करावेत. शारीरिक अवस्थेनुसार आवश्यकता भासल्यास रुग्णाला रुग्णालयात दाखल केले जाते. औषधोपचार सुरू असतानाच रुग्णाचे जेवण आणि पाण्याच्या सेवनाकडे नातेवाईकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. मलेरियामध्ये रक्तातील साखर कमी होते. तेव्हा मधुमेहाच्या रुग्णांच्याबाबत ही काळजी घेणे गरजेचे आहे. अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा डोस पूर्ण करणे. बहुतांश वेळा रुग्ण ताप किंवा अन्य त्रास बरे झाले की औषधे घेणे बंद करतात. त्यामुळे मग दाद न देणारा तापही होण्याची शक्यता असते.

तापाचे निदान आवश्यक

विविध जिवाणूंच्या संसर्गाप्रमाणे तापामध्ये विविधता असते. त्यामुळे विषाणूजन्य तापाव्यतिरिक्त लक्षणे आढळल्यास किंवा दोन दिवसांनीही ताप कमी होत नसल्यास डॉक्टरांकडे जाऊन तापाचे निदान करणे आवश्यक आहे.

पावसाळ्यातील आजारांमुळे गंभीर अवस्था किंवा मृत्यू होण्याची कारणे

सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे ताप अंगावर काढणे, वेळेत औषधोपचार न घेणे. याव्यतिरिक्त अति कमी झालेला रक्तदाब, फुप्फुसामध्ये निर्माण झालेले पाणी, मेंदूतील किंवा इतर महत्त्वाच्या अवयवातील रक्तस्राव, मूत्रपिंड किंवा यकृत निकामी झाल्याने होणारे दुष्परिणाम यांमुळेही मृत्यू ओढवू शकतात. मात्र वेळेत तज्ज्ञांकडे नेऊन उपचार सुरू केल्यास बहुतांश रुग्णांना आराम पडतो.

(शब्दांकन: शैलजा तिवले)

First Published on July 24, 2018 12:36 am

Web Title: dengue fever malaria