24 January 2019

News Flash

‘कामा’ची गोष्ट : मधुमेही कामजीवन!

मधुमेहाचा परिणाम शरीराच्या सर्वच रक्तवाहिन्या आणि मज्जातंतूवर होतो.

प्रतिनिधिक छायाचित्र

मधुमेहाचे ज्याच्यावर दुष्परिणाम होत नाहीत, असा अवयव किंवा संस्था शरीरात शोधूनही सापडणार नाही. त्वचेपासून हाडांपर्यंत, यकृतापासून मूत्रपिंडापर्यंत आणि हृदयापासून मेंदूपर्यंत सर्वच अवयव वा संस्थांना मधुमेहामुळे हानी पोहोचते. जननेंद्रिय आणि लैंगिक अभिव्यक्तीशी संबंधित प्रक्रियेवरही मधुमेहाचे दुष्परिणाम घडून येतात. ते कसे, कधी आणि का घडतात याची माहिती देणारा लेख..

मधुमेहाच्या रुग्णांमध्ये लैंगिक दुर्बलतेची तक्रार सामान्य माणासांच्या मानाने तीन पटीने अधिक दिसून येते. मात्र आपल्याला मधुमेह झाला आहे म्हणजे आता आपले कामजीवन संपुष्टात आले आहे, असा समज करून घेणे हे मधुमेहापेक्षा कामजीवनावर अधिक घातक परिणाम करू शकते.

मधुमेहाचा परिणाम शरीराच्या सर्वच रक्तवाहिन्या आणि मज्जातंतूवर होतो. पुरुषाच्या शिश्नात समागम करण्यासाठी गरजेची असलेली ताठरता येण्यासाठी मज्जातंतू आणि रक्तवाहिन्या दोन्ही सशक्त आणि कार्यक्षम असणे गरजेचे आहे. मेंदूच्या तळाशी असलेल्या हायपोथलॅमस या भागामध्ये सेक्स केंद्र असते. मनात लैंगिक भावना निर्माण होताच हायपोथलॅमसमधून मज्जातंतूमार्फत जननेंद्रियांकडे संकेत पाठवले जाऊ लागतात. हे संकेत पोहोचताच शिश्नामध्ये रक्त भरले जाण्याची प्रक्रिया सुरू होते, जितके रक्त भरले जाईल, तितके शिश्न ताठ होत जाते.

मधुमेहामध्ये या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो. मधुमेहाचा परिणाम सर्व रक्तवाहिन्या आणि मज्जातंतूवर होत असतो. शिश्न ताठ होण्याची पूर्ण प्रक्रियाच मज्जातंतू आणि रक्तवाहिन्यांच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असल्याने सहाजिकच मधुमेहाचा परिणाम शिश्नाच्या ताठ होण्यावर घडू शकतो. हा परिणाम अचानक मात्र घडत नाही. मधुमेहाची सुरुवात झाल्यावर लैंगिक क्षमतेवर असा परिणाम घडून येण्यासाठी काही अवधी जावा लागतो. आपल्याला मधुमेहाची सुरुवात झाली आहे हेच जर व्यक्तीच्या ध्यानात आले नसेल आणि त्यामुळे त्यासाठी लागणारी उपाययोजनाच जर व्यक्तीने केली नसेल तर मात्र मधुमेह मज्जातंतू आणि रक्तवाहिन्यांवर सुप्तपणे आघात करत राहतो. या आघाताचे दुष्परिणाम व्यक्तीच्या ध्यानात येईपर्यंत खूप काळ जातो आणि व्यक्तीची लैंगिक क्षमता कमी होऊ लागते.

मधुमेहाचा परिणाम मज्जातंतूवर झाल्यास त्याला ‘न्युरोपॅथी’ असे म्हणतात. मधुमेहामुळे होणाऱ्या न्युरोपॅथीमध्ये मज्जातंतूवर जे परिणाम होतात, ते बऱ्याच अंशी कायम स्वरूपाचे असतात, पण असे असले तरी न्युरोपॅथी उद्भवण्याच्या सुरुवातीच्या काळात जर बी जीवनसत्त्वाचे मोठे डोस रुग्णाला दिल्यास त्याचा चांगला गुण येतो. मात्र असे डोस रुग्णाने स्वत:हून घेऊ नयेत.

मधुमेहामुळे रक्तवाहिन्यांवर परिणाम झाल्यामुळे लैंगिक दुर्बलता आली असेल तर ते तपासून पाहण्यासाठी डॉप्लर तपासणी करून घ्यावी लागते. डॉप्लर तपासणीचा शोध लागण्याआधी शिश्नातील रक्तदाब आणि हातातील रक्तदाब यांच्या भागाकाराच्या संख्येवरून याचे निदान केले जात असे. शिश्नातील रक्तप्रवाह मधुमेहामुळे कमी झाला असल्यास त्यासाठी शंट शस्त्रक्रिया करण्याचा उपाय काही डॉक्टर सुचवतात. पाश्चिमात्य देशांमध्ये अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया मोठय़ा प्रमाणावर होऊ लागल्या आहेत.

लैंगिक दुर्बलतेशिवाय मधुमेहामुळे वीर्यस्खलन न होणे किंवा वीर्यस्खलन कमी होणे अशा तक्रारीसुद्धा काही रुग्णांमध्ये दिसून येतात. या तक्रारींचे मूळही मधुमेहाचा मज्जातंतूवर होणार परिणाम हेच आहे.

कामजीवनावर होणाऱ्या मधुमेहाच्या परिणामाचे वर वर्णलेले दुष्परिणाम जरी कितीही वास्तववादी असले तरी व्यक्तीची कामप्रेरणा, लैंगिक इच्छा, प्रणय करण्यासाठी लागणारी उर्मी व क्षमता, मनात असलेली प्रेमभावना यावर मधुमेहाचा काहीही परिणाम होत नाही. आपल्याला मधुमेह झालेला आहे, त्यामुळे आपले कामजीवन आता संपुष्टात येणार हा मनाने करून घेतलेला समज मात्र कामजीवनावर परिणाम घडवू शकतो. असा परिणाम हा मनाने करून घेतलेल्या दाट समजामुळे घडतो, मधुमेहामुळे नव्हे. अनेकदा असफलता आल्यास व्यक्ती निराश होते आणि ही निराशाच मग लैंगिक इच्छा कमी करण्यास कारणीभूत होते. अशा रुग्णांचे समुपदेशन होणे आवश्यक असते.

मधुमेह झालेल्या पन्नाशीच्या वर वय असलेल्या ४५ टक्के पुरुषांमध्ये लैंगिक दुर्बलता आढळत नाही. ज्या पुरुषांमध्ये ती आढळते (५५ टक्के) त्यांना ती टाळता येऊ शकते. मधुमेहाचे निदान लवकरच केले गेले असेल, त्यावर नियंत्रण ठेवण्याची उपाययोजना योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने केली गेली असेल तर या ५५ टक्के लोकांमध्ये लैंगिक दुर्बलता येणे टाळता येऊ शकते. हे साधण्यासाठी वयाच्या तिशीनंतर प्रत्येक व्यक्तीने वर्षांतून निदान एकदा आपल्या रक्तातील साखरेची पातळी तपासून घ्यावी, जेणेकरून मधुमेह निर्माण होताच त्याचा तात्काळ उपाय करणे शक्य होईल.

मधुमेहामुळे लैंगिक दुर्बलता आलेल्या रुग्णांचा इलाज केला जाऊ शकतो. त्यासाठी व्ॉक्यूम डिवाइस (Vacuum device) किंवा शिश्नामध्ये दिली जाणारी इंजेक्शन्स (Intracavernous injection) आणि अलीकडच्या काळात उदयास आलेली वायग्रा (Sildenafil citrate) हे औषध वापरता येऊ शकते. पण उपाययोजनांची निवड तज्ज्ञ डॉक्टरांनी करावी, रुग्णाने स्वत: नव्हे. कारण हे उपाय योग्य काळजी न घेता केल्यास हानीकारक आणि अगदी प्राणघातकही ठरू शकतात.

मधुमेहाचा परिणाम मज्जातंतूवर झाल्यास त्याला ‘न्युरोपॅथी’ असे म्हणतात. मधुमेहामुळे होणाऱ्या न्युरोपॅथीमध्ये मज्जातंतूवर जे परिणाम होतात, ते बऱ्याच अंशी कायम स्वरूपाचे असतात, पण असे असले तरी न्युरोपॅथी उद्भवण्याच्या सुरुवातीच्या काळात जर बी जीवनसत्त्वाचे मोठे डोस रुग्णाला दिल्यास त्याचा चांगला गुण येतो. मात्र असे डोस रुग्णाने स्वत:हून घेऊ नयेत.

-डॉ. राजन भोसले, लैंगिक विज्ञानतज्ज्ञ.

First Published on February 6, 2018 4:29 am

Web Title: diabetic impact on sexual life