25 March 2019

News Flash

उन्हाळय़ातील नेत्रदाह

दैनंदिन प्रवासातही वाऱ्याचा त्रास अधिक होतो. वाऱ्यामुळे डोळ्यांना इजा होत नाही.

संग्रहित प्रतिनिधिक छायाचित्र

थंडी ओसरून एव्हाना टळटळीत उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. तापमानाचा पाराही उंचावत आहे. वातावरणातील हे बदल आरोग्यावर परिणाम करणारे ठरतात. उन्हाचा तडाखा जसा वाढू लागतो, तसे डोळे या नाजूक अवयवाच्या तक्रारी वाढू लागतात. डोळे हे मानवी शरीरातील एक महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय. अतिशय महत्त्वाचा आणि नाजूक अवयव. उन्हाळ्यात डोळ्यांचे आरोग्य जपणे महत्त्वाचे आहे. या काळात डोळ्यांच्या त्रासाचे मुख्य कारण म्हणजे सूर्याकडून येणारी अतिनील किरणे. धूळ, माती, प्रदूषके, पाण्याची कमतरता अशा अनेक घटकांमुळे आपल्या शरीरातील हा खिडकीरूपी अवयव दुखावला जातो. हवेतील उष्मा वाढल्यामुळे डोळ्यांतील अश्रूंची लवकर वाफ होऊन डोळे कोरडे पडण्याची दाट शक्यता असते. उष्म्याचा त्रास होऊन डोळ्यांची जळजळ होणे, त्यातून पाणी येणे, डोळ्यात खुपणे असे अनेक त्रास संभवतात. उन्हाळ्यात उन्हासोबत हवाही कोरडी वाहते आणि त्यासोबत धूळ, माती ज्यामुळे डोळ्यांची खाज, डोळे लाल होणे अशी लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे उन्हाळ्यात लहान मुले आणि वयोवृद्धांमध्ये प्रकर्षांने जाणवतात. उष्णतेने शरीरातील पाणी कमी होऊन ‘डिहायड्रेशन’ होते. ज्यामुळे आपल्या शरीरासोबत डोळेही थकतात. उन्हाळ्यात आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि जिवाणू संसर्ग लवकर होतो.

दैनंदिन प्रवासातही वाऱ्याचा त्रास अधिक होतो. वाऱ्यामुळे डोळ्यांना इजा होत नाही. मात्र डोळे लाल होणे, सुजणे, कोरडे होणे, रखरखीत होणे असा तात्पुरता त्रास जाणवण्यास सुरुवात होते. उन्हाळ्याच्या सुटीत लहान मुले खूप वेळ उन्हात, धुळीत वा बागेत खेळत असल्यामुळे डोळ्यांना खाज, पाणी येण्याचा त्रास होतो. ज्याला ‘अ‍ॅलर्जिक कन्ज्युक्टिवायटिस’ म्हणतात. जास्त वेळ डोळे चोळल्यामुळे कालांतराने बुब्बुळावर परिणाम होतो. काही मुले उन्हाळ्याच्या सुट्टीत तरण तलावात पोहण्यासाठी जातात. त्यातील क्लोरीनमुळेही मुलांच्या

डोळ्यात लाली व खाज येऊ शकते. या परिस्थितीत नेत्रतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषध उपचार करायला पाहिजे. सुटीमध्ये घरी बसून मुले टीव्ही बघण्यात वा भ्रमणध्वनीवर खेळ खेळण्यात मग्न होतात. त्यामुळेही डोळ्यांवर परिणाम होतो. आजकाल कार्यालयात, घरी, गाडीत सतत सुरू असलेल्या वातानुकूलित यंत्रणेमुळे डोळे कोरडे पडत आहेत. तसेच संगणक, भ्रमणध्वनी, लॅपटॉपचा वापर अपरिहार्य असला तरी सलग त्याच्या स्क्रीनकडे टक लावून पाहिल्याने डोळे कोरडे होतात.

सध्या धकाधकीच्या जीवनात खासकरून उन्हाळ्यात आपल्या नाजूक डोळ्यांचे आरोग्य जपणे आवश्यक आहे. काही साध्या उपायांनी आपण आपल्या डोळ्यांचे आरोग्य सांभाळून अनेक दुष्परिणामांपासून दूर राहू शकतो.

* कोरडी व उष्ण हवा आणि अतिनील किरणांपासून बचावासाठी यू. व्ही. रेज संरक्षित गॉगलचा वापर.

* दुचाकी वाहन चालवताना गॉगलबरोबर हेल्मेटचाही वापर करणे.

* तहान लागण्याची वाट न पाहता दर अर्ध्या तासाला पाणी पिणे आणि सोबत आरोग्यदायी शीतपेयांचेही सेवन करणे.

* शक्य तिथे वातानुकूलित यंत्रणेऐवजी कुलरचा वापर करावा. जेणेकरून हवेत ओलावा राहण्यास मदत होते.

* उन्हातून आल्यावर थंड पाण्याने डोळे स्वच्छ करावेत. पण उघडय़ा डोळ्यांवर पाण्याचा सपका मारू नये. त्याऐवजी एका वाटीत पाणी घेऊन उघडझाप करावी.

* डोळ्यांची जळजळ होत असेल तर स्वच्छ रुमालात बर्फाचे तुकडे घेऊन डोळ्यावर शेकावे.

* डोळे जर चिकटत असतील, लाल होत असतील तर नेत्ररोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

* नेत्ररोगतज्ज्ञांनी दिलेल्या मात्रेतच ‘आय ड्रॉप’ टाकावा. त्याचा जास्त वापर डोळ्यांना अपाय ठरू शकतो.

* पुरेशी झोप घेऊन डोळ्यांना आराम द्या तसेच नियमित डोळ्यांचा व्यायाम करावा.

* संगणक, भ्रमणध्वनी, लॅपटॉपवर काम करताना आठवण ठेवत डोळ्यांची उघडझाप करावी. डोळ्यांच्या विश्रांतीसाठी ‘लुब्रिकेटिंग ड्रॉप’चा वापर करावा.

* ताजी फळे, पालेभाज्या यांचे नियमित सेवन करावे.

– डॉ. अंजना महाजन,नेत्ररोगतज्ज्ञ

First Published on March 27, 2018 1:45 am

Web Title: eye care during summer