डॉ. कांचन पटवर्धन, आहारतज्ज्ञ

गणेशोत्सवात खाण्याची मौज असते. उकडीचे मोदक, बेसनाचे लाडू या पदार्थानी पोट भरले तरी मन मात्र भरत नाही. त्याशिवाय जिथे जावे, तिथे ताटात गोडाचे पदार्थ येत असतात. गणपतीला नैवेद्य दाखविले जाणाऱ्या या पदार्थामध्ये आरोग्यासाठी आवश्यक जीवनसत्त्वेही असतात. त्यामुळे हे पदार्थ प्रमाणात खाल्ले तर ते उपायकारकच ठरतात.

गणपतीला दाखवल्या जाणाऱ्या नैवेद्याच्या यादीमधील सर्वात पहिला क्रमांक मोदकांचा लागतो. आपल्याकडे प्रातांनुसार मोदक तयार करण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. कोकणात जिथे नारळ व तांदूळ जास्त प्रमाणात असतो, तिथे उकडीचे मोदक तयार केले जातात. आणि इतर भागांमध्ये तळणीचे मोदक केले जातात. उकडीच्या मोदकात खोबरे व गूळ याचा वापर केला जातो. खोबऱ्यात कॅल्शिअम, लोह व फॅटी अ‍ॅसिड असते. खोबऱ्यात तेलाचे प्रमाण असले तरी प्रमाणात खाल्लय़ास कोलेस्टोरॉलचे प्रमाण वाढत नाही हे खोबऱ्याचे वैशिष्टय़. मोदकाच्या सारणात खोबऱ्याबरोबर गुळाचा वापर करणे चांगले. गुळामुळे लोह वाढते. ऊर्जा वाढवण्यासाठी गुळाचा उपयोग होतो. पंचखाद्य सारण घालून अनेक ठिकाणी मोदक तयार केले जातात. या पंचखाद्याच्या सारणात खवा, खसखस, खडीसाखर, खारीक, सुके खोबरे या पदार्थाचा समावेश होतो. तळणीच्या मोदकात या सारणाचा वापर केला जातो. खव्यामध्ये मोठय़ा प्रमाणात प्रथिने व कॅल्शिअम असते. अशक्तपणा असलेल्या लहान मुलांना या मोदकाचा चांगला फायदा होतो. खसखसमुळे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. वाईट कोलेस्टोरॉल कमी करण्यासाठी शरीराला लोहाचा पुरवठा करण्यासाठी खारकेचा उपयोग होतो. खारकेत भरपूर फायबर, जीवनसत्त्व ‘बी १’, ‘बी २’, ‘बी ३’ व ‘बी ५’ असून पोटॅशियमही पुरेसे असते. गणपतीला बेसनाच्या लाडवांचाही प्रसाद दिला जातो. बेसनातही प्रथिने असते, तसेच बेसन हे पुष्टीदायक मानले जाते.

गणेशोत्सवात ऋषिपंचमीची भाजी केली जाते. यामध्ये सर्व भाज्या एकत्र केल्या जातात. ऋषिपंचमीला विशिष्ट पद्धतीने आहार सेवनाविषयी काही नियम आहेत. या दिवशी नांगरणी न झालेल्या शेतातून सहज उगवून येणाऱ्या रानभाज्यांचे व धान्यांचे  सेवन केले जाते. या दिवशी हिरव्यागार व ताज्या कसदार रानभाज्यांचे सेवन केले जाते. या भाज्यांमध्ये खनिजांचे व जीवनसत्त्वांचे प्रमाण जास्त असल्याचे सृदृढ आरोग्यासाठी ही भाजी उपयुक्त असते. गणेशाच्या आगमनानंतर गौरीची तयारी सुरू होते. घरात गौरीचे आगमन झाल्यानंतर विविध पदार्थ तयार केले जातात. यांमध्ये विविध डाळी वाटून चटणी केली जाते. याला वाटली डाळ म्हटले जाते. एरवी एकत्रितपणे वेगवेगळ्या डाळी खाल्लय़ा जात नाहीत. मात्र गौरीच्या निमित्ताने वाटली डाळ आवर्जून केली जाते. याच काळात दही-भाताचा नैवेद्यही गौरीला आवर्जून दिला जातो. जेवण झाल्यानंतर शेवटी दही-भाताचे सेवन पोटासाठी चांगले ठरते.

उपवासात फळांचा आहार उपयुक्त

श्रावणात विविध सणांच्या निमित्ताने उपवास केले जातात. या उपवासात कायम साबुदाणे व तळणीचे पदार्थ खाण्याऐवजी फळांवर अधिक भर द्यावा. सध्या बाजारात सीताफळ, सफरचंद, पेर, केळे हे पदार्थ उपलब्ध आहेत. आहारात फळांचा पुरेसा वापर केल्याने पचनशक्ती सुधारते. ही फळे स्वच्छ धुऊन खावीत. पावसाळ्यात अनेकदा भाज्या व फळांवर माती साचण्याशी शक्यता असते. ही माती पोटात गेल्याने अनेक पोटाचे आजार सुरू होऊ शकतात.