आज ‘जागतिक मूत्रपिंड दिवस’. सहसा लक्षणे दिसत नसल्यामुळे मूत्रपिंडाचा विकार अनेक जणांमध्ये दुर्लक्षितच राहतो. या विकाराबाबत वेळीच वैद्यकीय सल्ला घेता यावा व शक्यतो आजार उद्भवूच नये म्हणून प्रयत्न सुरू व्हावेत या दृष्टीने मूत्रपिंड विकाराबाबत थोडेसे-

लक्षणे दुर्लक्षित राहणारी

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?

मूत्रपिंडाचा विकार असलेल्या अनेक रुग्णांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. त्यामुळे मूत्रपिंडाचा विकार लवकर लक्षातच येत नाही. हळूहळू थकवा येणे, अशक्तपणा, वजन कमी होणे, भूक कमी लागणे, रात्री लघवीला जाण्यासाठी उठावे लागणे, सारखे लघवीला जावे लागणे अशी लक्षणे या रुग्णांमध्ये असतात. पण ही लक्षणे इतर आजारांमध्येही दिसू शकतात. शिवाय रुग्णाला फार काही वेगळे होत असल्यासारखे वाटत नाही, आणि त्यामुळे लक्षणे बऱ्याच जणांमध्ये दुर्लक्षित राहतात. काही जणांमध्ये अंगावर व चेहऱ्यावर थोडी सूज येणे, लघवीचा रंग लाल दिसणे, कोरडय़ा उलटय़ा होणे अशी लक्षणेही दिसतात. ही सगळी लक्षणे मूत्र विकारांची असू शकतात व तपासण्याद्वारे त्याची खात्री करता येते. अंगावर सूज येण्यामागे काही महत्त्वाची कारणे असू शकतात. मूत्रपिंडाचा आजार, यकृताचा आजार, हृदयविकार, अ‍ॅनिमिया (रक्तक्षय), कुपोषण, स्त्रियांमध्ये संप्रेरकांची पातळी कमीजास्त होणे यामुळे सूज येऊ शकते. त्यामुळे सुजेचे नेमके कारण कळून घेणे गरजेचे.

आजाराचा धोका कुणाला अधिक?

मधुमेह, उच्च रक्तदाबाचे रुग्ण किंवा ज्यांना मूत्रपिंडाला पूर्वी जंतूसंसर्ग होऊन गेला आहे किंवा मूतखडा होता असे रुग्ण, लहानपणी मूत्रपिंड विकार झालेले वा मूत्रपिंड विकाराची आनुवंशिकता असलेले रुग्ण, या सर्वाना मूत्रपिंड विकार होण्याचा धोका अधिक असतो. त्यांनी वेळोवेळी त्या दृष्टीने तपासणी करून घेणे इष्ट.

तपासण्या कोणत्या?

उच्च रक्तदाबाचा त्रास असलेले कित्येक रुग्ण बराच काळ तपासत नाहीत. रक्तदाबाची तपासणी मूत्रपिंड विकारासाठीही गरजेची असते. ज्यांना अ‍ॅनिमिया आणि उच्च रक्तदाब हे आजार एकाच वेळी असतात त्यांना मूत्रपिंडाच्या आजाराची शक्यता वाढते. रक्त आणि लघवीच्या साध्या तपासण्या मूत्रपिंड विकारासाठी खूप महत्त्वाच्या. त्यात युरिया, क्रिएटिनिन, हिमोग्लोबिन व युरिक अ‍ॅसिड या तपासण्या प्रामुख्याने करतात. अंगावर सूज आहे का हे पाहणेही गरजेचे. मूत्रपिंड विकाराचा धोका असलेल्यांना लघवीची ‘एसीआर’ तपासणी (अल्ब्युमिन-क्रिएटिनिन रेशो/ युरिन मायक्रो अल्ब्युमिन) करतात. त्यातून मूत्रपिंडाच्या आजाराची शक्यता कळते. मूत्रपिंडाचा त्रास असल्याचे समजल्यावर सोनोग्राफीही केली जाते.

बालकांमध्येही मूत्रपिंड विकार शक्य

या वर्षीच्या ‘जागतिक  मूत्रपिंड दिना’साठी बालवयातील मूत्रपिंड विकारांच्या जनजागृतीवर भर देण्यात आला आहे. लहान मुलांना मूत्रपिंड विकार कसा होईल असे आपल्याला वाटते. पण बालकांमध्येही तो होऊ शकतो व बऱ्याचदा त्याची कारणे आनुवंशिक किंवा जन्मजात असतात. जंतूसंसर्गामुळेही या आजाराची शक्यता निर्माण होऊ शकते. लवकर आजाराचे निदान होणे गरजेचे. बालकाला थंडी-ताप येणे, पोट दुखणे, लघवीला सारखे जावे लागणे, लघवी गढूळ होणे, चेहऱ्यावर व शरीरावर सूज येणे ही त्याची लक्षणे असू शकतात.

मूत्रपिंड विकार आणि डायलिसिस

मूत्रपिंड विकार झालेल्या प्रत्येक रुग्णाला डायलिसिस करावाच लागतो असे नाही. परंतु या रुग्णांना त्यांना असलेले उच्च रक्तदाब व मधुमेहासारखे इतर आजार, जंतूसंसर्ग या दृष्टीने काळजी घ्यावी लागते. मूत्रपिंड विकार लवकर लक्षात आले व योग्य वैद्यकीय काळजी घेतली तर आजार नियंत्रणात राहून डायलिसिस लांबवणे शक्य होते. अनेकदा लक्षणांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे रुग्ण खूप उशिरा डॉक्टरांकडे जातात व तोपर्यंत मूत्रपिंडाच्या कार्यावर वाईट परिणाम झाल्याचे दिसून येते.

डायलिसिस जन्मभर?

मूत्रपिंड विकाराचे दोन प्रकार असतात. कायमचा व तात्पुरता मूत्रपिंडविकार. तात्पुरत्या विकारात रुग्ण रुग्णालयात दाखल असेल आणि लघवीला झालेला जंतूसंसर्ग, मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो एंटेरिटिस अशा इतर गोष्टी उद्भवलेल्या असतात. अशा रुग्णाला त्या काळापुरता मूत्रपिंड विकार निर्माण होऊ शकतो व प्रसंगी डायलिसिसदेखील लागू शकतो. पण तो कायमचा मागे लागत नाही. ज्या रुग्णांना ‘क्रॉनिक किडनी डिसिज’ असतो, अर्थात त्याचे मूत्रपिंड हळूहळू खराब होत गेलेले असते त्याला कायम डायलिसिस करण्याची वेळ येऊ शकते. सर्वसाधारणपणे मूत्रपिंडाचे कार्य ५ ते १० टक्के एवढेच सुरू असेल तेव्हा डायलिसिसचा निर्णय घेतला जातो. पण हल्ली डायलिसिसच्या पद्धती सुधारल्या आहेत आणि कमी वेदनांमध्ये व पथ्य पाळून वर्षांनुवर्षे नियमित घेणे शक्य होते. मूत्रपिंडाचे कार्य ५ ते १० टक्केच उरले की त्यांना डायलिसिस किंवा मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा पर्याय सुचवला जातो.

प्रतिबंध कसा करावा?

  • इंडियन क्रॉनिक किडनी डिसिज रजिस्ट्री’नुसार ‘किडनी फेल्युअर’च्या प्रमुख कारणांमध्ये ३३ टक्के वाटा मधुमेहाचा व १५ टक्के वाटा उच्च रक्तदाबाचा आहे. हे सारे बदललेल्या जीवनशैलीशी निगडित आहे. मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठीच्या काही साध्या गोष्टी अशा-
  • मधुमेह वा उच्च रक्तदाब असल्यास तो नियंत्रणात ठेवा.
  • घरात मूत्रपिंडाचा आजार असेल किंवा लहानपणी मूत्रपिंड विकार होऊन गेला असेल, मुतखडा, लघवीचा जंतूसंसर्ग असेल किंवा अंगावर सूज येत असेल तर प्रतिवर्षी एकदा तरी मूत्रपिंडाचे कार्य तपासून घेणे चांगले.
  • समतोल आहार घेणे व पुरेसे पाणी पिणे गरजेचे.
  • वजन वाढू देऊ नका. स्थूलता असेल तरीही मूत्रपिंडावर ताण येऊ शकतो. नियमित व्यायामाने वजन नियंत्रणात ठेवता येईल.
  • धूम्रपान उच्च रक्तदाब व मूत्रपिंड विकार या दोन्हीच्या दृष्टीने अतिशय वाईट आहे. त्यामुळे धूम्रपान आणि मद्यपानापासून दूर राहणेच बरे.
  • अनेक जण स्वत:च्या मनाने डोकेदुखी, पाठदुखी यासाठी दीर्घकाळ वेदनाशामक गोळ्या घेतात. अ‍ॅसिडिटीसाठीही लोक वर्षांनुवर्षे विशिष्ट गोळ्या घेतात. या औषधांमुळेही मूत्रपिंडावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारे औषधे घेणे टाळावे.

– डॉ. अभय हुपरीकर, मूत्रपिंडविकारतज्ज्ञ

abhayhuprikar@gmail.com

(शब्दांकन- संपदा सोवनी)