25 February 2021

News Flash

मन:शांती : औषधोपचार

मनोविकारावर औषधोपचार सुरू करताना ही अडथळ्यांची शर्यत प्रथम पार पाडावी लागते.

औषध म्हटलं की जवळजवळ आपल्या सगळ्यांचा चेहरा ऑ म्हणताना होतो तसा वाकडा होतो. सर्वाच्या कपाळालाच आठय़ा पडतात. औषध म्हणजे कडू चव या नुसत्या कल्पनेनेच आपल्या चेहऱ्यावर आठी दिसायला लागते.

‘अहो डॉक्टर, आजपर्यंत मला एका पैशाचंदेखील औषध लागलं नाही आहे हो, आणि आत्ता चक्क मानसिक आजारावरची औषधं?’ असे आम्हाला कित्येक वेळा ऐकायला मिळते.

‘औषध घेतलंच पाहिजे का? नुसत्या समुपदेशनाने ही समस्या सुटणार नाही का? आम्ही असं ऐकलंय की औषधांची सवय लागते. त्यांचे मूत्रपिंडावर दुष्परिणाम होतात’, असेही काहींचे प्रश्न असतात.

‘या औषधांची सवय लागते का? आम्ही असं ऐकलंय की एकदा सुरू केली की ही औषधं आयुष्यभर घ्यावी लागतात.’ हा पण एक ऐकीव माहितीवरचा नेहमीचा प्रश्न!

मनोविकारावर औषधोपचार सुरू करताना ही अडथळ्यांची शर्यत प्रथम पार पाडावी लागते. मुळात स्वीकारायच्या पायरीवर बराच काळ अडखळतात. उपचारांसाठी मनोविकारतज्ज्ञांकडे यायला बराच उशीर झालेला असतो. त्यामुळे आजारही दीर्घकालीन झालेला असतो. दीर्घकालीन आजाराला दीर्घकाळ उपचार लागू शकतात. आजाराची लक्षणे सुरुवातीला बऱ्याच वेळा लक्षात न येण्यासारखी असतात किंवा त्या लक्षणांचा रुग्ण व घरच्यांना फार त्रास होत नसतो किंवा होईल बरा आपोआप अशी वेडी आशा असते. या सर्वामुळे विकार लक्षात येऊन, स्वीकारून, उपचार सुरू होण्यास बराच अवधी वाया जातो. विकार जुना होतो, त्यामुळे उपचार दीर्घकाळ चालू शकतात.

औषधे ही उपचारासाठी निर्माण केलेली असतात. संशोधनाच्या विशिष्ट अशा तीन पायऱ्या पार पडल्यावर व ते सुरक्षित तसेच गुणकारी असल्याचे सिद्ध झाल्यावरच उपचारांसाठी वापरण्यास परवानगी मिळालेली असते. त्यामुळे जे दुष्परिणाम असतात; त्यात प्रथम प्रयोग गिनिपिगवर, मग काही रुग्णांवर त्यांच्या संमतीने औषधाचा प्रयोग केला जातो. ते अत्यंत कमी प्रमाणात असतील, अशी पूर्ण काळजी घेतलेली असते.

जे दुष्परिणाम होतात ते मूळ संस्थेबरोबर इतर शरीरसंस्था आणि पेशींवर त्याच्या कार्याचा परिणाम झाल्यामुळे होत असतात आणि बरेचसे आपोआप कमी होतात किंवा औषधाचा डोस कमी करून वा दुसरे औषध वापरून बरे करता येतात. शिवाय जिथे परिणाम असतो तेथेच दुष्परिणाम असतो. आपल्या खाद्यपदार्थाना पण ते नसतात का? साधे केळे बघा, त्यातीन जीवनसत्त्वांमुळे शौचाला साफ होण्यासाठी ते उपयुक्त असते, पण खोकला झाला असताना आपण ते खाणे टाळतो. वजन कमी करायचे असेल तरी टाळतो. थोडक्यात, परिणाम व दुष्परिणाम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे ग्लास अर्धा भरलेला की रिकामा याप्रमाणे आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवलेला चांगला. तसेच बऱ्याचदा रुग्ण स्वत:च्या मनाने औषधे एकदा सांगितलेल्या प्रमाणातच डॉक्टरला न सांगता, दाखवता घेत राहतात. अनावश्यक काळ व मनाने घेतल्यामुळे दुष्परिणाम होऊ शकतात, उलट अशामुळेच जास्ती होऊ शकतात!

या विकारांचे उपचार, मेंदूशी निगडित असल्याने नक्कीच थोडे जास्त काळ करावे लागतात. कारण उपचारांचा परिणामच पूर्णपणे एक महिनाभरात दिसू लागतो. त्यापुढे सर्व लक्षणे कमी होऊन बरी व्हायला आणखी काळ जातो. मग तेच औषधाचे प्रमाण काही काळ ठेवून, मग कमी कमी करून ती बंद करायची असतात. बंद करताना मूळ लक्षणे परत उद्भवत नाहीत ना, याची खात्री करावी लागते. नैराश्य पहिल्यांदा लक्षात आले असताना किमान सहा महिने तरी उपचार करावे लागतात. स्किझोफ्रेनियाचा विकार होऊन सहा महिने झाले तर किमान दोन वर्षे तरी उपचार घ्यावे लागतात. दोन वर्षांपेक्षा जास्त जुना आजार असेल तर पाच वर्षे आणि सहा वर्षांपेक्षा जुना असेल तर आयुष्यभर उपचार घ्यावे लागू शकतात.

काही वेळा एक झटका किंवा विकारदोष येऊन बरा झाल्यावर मध्ये काही काळ रुग्ण पूर्णपणे लक्षणविरहित असतो. अशा वेळी उपचार थांबवून नंतर पुन्हा सुरू करावे लागतात. असे पुन:पुन्हा होत असल्यास मात्र कायम एखादे औषध घ्यावे लागू शकते.

मनोविकार कोणता आहे आणि किती लवकर व नियमित उपचार घेतो त्यावर किती काळ घ्यावे लागणार व रुग्ण बरा होणार हे अवलंबून असते. नैराश्य व चिंता यासारखे विकार हे लवकर व नियमित योग्य उपचारांनी पूर्ण बरेही होऊ  शकतात! खरे पाहता गोड चव, तिखट चव आपल्याला भुलवते व नंतर त्रास देते, पण कडू चव हवीशी नाही वाटली तरी शरीरात गेल्यावर चांगले परिणामच देते. त्यामुळे औषध म्हटल्यावर तोंड वाकडे करण्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोनासह, त्याच्याशी मैत्री करत घेतले तर जास्त प्रभावी व गुणकारी ठरू शकेल व आपलाच फायदा होईल असा मला विश्वास वाटतो!

Adwaitpadhye1972@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2018 1:39 am

Web Title: medication
Next Stories
1 पिंपळपान : पुदिना
2 औषधसाक्षरता
3 पथ्य अपथ्य! : स्पाँडिलायसिस
Just Now!
X