25 March 2019

News Flash

पिंपळपान : घणसर

कोकणात घणसरीला दिव्य औषधी वनस्पती म्हणून खूप मोठा मान आहे.

कफप्रधान शोधविकारात घणसर हे एक उत्तम औषध आहे.

‘‘नागदन्ती कटुस्तिका रूक्षा वातकफापहा। मेधाकृद्विषदोघ्नो

पाचनी शोधनाशिनी॥ शुल्मशूलोदरव्याधिकुष्ठदोषनिकृन्तनी॥’’ (रा. नि.)

घणसर ही दंतीची एक जात आहे. ही सर्वत्र होते. दक्षिण कोकण व बंगालमध्ये विपुल प्रमाणात होते. हिचे वृक्ष लहान किंवा मोठा थेट आंब्याच्या झाडासारखे दिसतात. खोड सरळ, साल राखेच्या रंगाची, गुळगुळीत, पाने आंब्याच्या पानांसारखीच दिसतात, परंतु त्यांना बारीक कात्रे असतात. पाने ६ ते १२ इंच लांब देठयुक्त, दोन्ही बाजूंस गुळगुळीत, फुले फिक्कट हिरवी, मंजिरीने येतात. पाकळ्या लोमयुक्त, नरकेसर १० ते १२, फळ गोल, मांसल, मुळाची साल जाड बाहेरून खडबडीत व उदी रंगाची व आतून पिवळी असून उदी रंगाचे ठिपके असतात. मुळाच्या सालीची रुची तिखट कापरासारखी सुगंधी असते. या झाडाची उत्पत्ती पावसाळ्यात मुळापासून होते. मुळाची साल, पाने, बिया औषधात वापरतात.

हस्तिदंती, नागदन्ती (सं.), हकूम (हिं.), बरागाच्छ (बं.), भुत्नकुसुम (ते.) नागाळी या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या घणसरीला श्री चरकसंहितेमध्ये, दन्ती द्रवंती व नागदन्ती असा एकत्रित उल्लेख आहे. मात्र या तिन्ही वनस्पती भिन्न भिन्न आहेत, याबद्दल शंका नको. डॉ. वा. ग. देसाई व प्रो. बलवंतसिंह या थोर वनस्पतिशास्त्रज्ञांनी क्रोटॉन ऑबलॅगिफालिया म्हणजेच नागदन्ती किंवा घणसर, असे स्पष्ट सांगितले आहे. घणसरीच्या मुळाची साल शोधघ्न, ज्वरघ्न व मोठय़ा मात्रेंत रेचक व विषनाशक आहे.

कफप्रधान शोधविकारात घणसर हे एक उत्तम औषध आहे. कोणत्याही तऱ्हेची सूज घणसर दिली असता बरी होते. मात्र हे औषध प्रारंभीच दिले पाहिजे. फुप्फुसाची सूज, वृषणाची सूज, सांध्याची सूज, यकृताची सूज, पुळी, नखुरडे यांवर घणसर फार हितावह आहे. मुळाची साल पोटात देतात व उगळून लेपही करतात. शोधघ्न, औषधांच्या वर्गात घणसर अग्रेसर आहे. या वर्गात घणसर, नागदौणा, निर्गुडी, बचनाग, अफू, सुरमा, पारा, गुग्गुळ, सागरगोटा, शिलाजित वगैरे आहेत. नूतन व जाज्वल्य शोधांत घणसरीचा उपयोग होतो. घणसरीबरोबर निर्गुडीची पाने व सागरगोटा चूर्ण दिल्यास रेच न होता ताप व सूज लगेच कमी होते. घणसरीबरोबर नवसागर दिल्यास यकृताची क्रिया सुधारून पित्तशुद्धी होते. दूषित पित्त शौचावाटे बाहेर पडते, यकृतवृद्धी कमी होते.

कोकणात घणसरीला दिव्य औषधी वनस्पती म्हणून खूप मोठा मान आहे. कारण कोकणातील साप, घोणस, फुरसे यांचा आढळ सर्वत्र मोठय़ा प्रमाणावर असतो. अनेक कोकणवासीयांना नेहमीच सर्पदंशाला तोंड द्यावे लागते. नव्व्याण्णव टक्के सर्पदंश हे जरी बिनविषारी असले तरी, सर्पदंशावर सत्वर घणसरीच्या मुळाच्या सालीचे चूर्ण तासा-तासाने देण्याची प्रथा आहे.

– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

First Published on March 13, 2018 3:54 am

Web Title: medicinal plant baliospermum montanum