ज्या दिवसात स्वच्छता सर्वात जास्त गरजेची असते, नेमके त्याच दिवसात स्त्रिया त्याकडे दुर्लक्ष  करतात. मात्र हे दुर्लक्ष नंतर आजारात परावर्तित होऊन त्रासदायक ठरू शकते. केवळ अस्वच्छतेमुळे जंतुसंसर्ग झाल्याने अनेक स्त्रियांना स्त्रीरोगतज्ज्ञांकडे जाण्याची वेळ येते. मासिक पाळीसाठी आज बाजारपेठेत सतराशे साठ प्रकारची सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध असली तरी केवळ ती वापरणे एवढेच स्वच्छतेसाठी पुरेसे नाही.

स्त्रियांची मासिक पाळी हा आता न बोलण्याचा विषय राहिलेला नाही. किंबहुना गेल्या काही दिवसात देवळातील प्रवेशासंबंधी सुरू असलेल्या सामाजिक चळवळींच्या मध्यवर्ती हाच विषय होता. मात्र भारतासारख्या असंख्य पातळ्यावर विभागल्या गेलेल्या समाजाच्या एका स्तरावर ही क्रांती सुरू असतानाच अजूनही लाखो स्त्रियांना मासिक पाळी नकोशी वाटते, हे वास्तव नाकारता येत नाही. आरोग्याच्या दृष्टीनेही महिन्यातील हे चार दिवस खरे तर महत्त्वपूर्ण असतात. मात्र या दिवसात शारीरिक व मानसिक स्तरावर होत असलेल्या बदलांमुळे स्त्रियांना ताण येतो व त्याचा साहजिक परिणाम या चार दिवसांकडे दुर्लक्ष करण्याकडे होतो. अर्थातच जेव्हा स्वच्छतेबाबत अधिक जागरूक राहणे गरजेचे असते नेमके तेव्हाच त्याबद्दल उदासीनता बाळगली जाते. मात्र त्यामुळे जंतुसंसर्गापासून कर्करोगापर्यंतच्या आजारांना आमंत्रण मिळते. मासिक पाळीदरम्यानच्या स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी २८ मे या दिवशी जागतिक पातळीवर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. स्त्रियांचे आरोग्य चांगले राखले जावे यासाठी मासिक पाळी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे दर महिन्याला येणारी अडचण असा दृष्टिकोन न ठेवता मासिक पाळीच्या दिवसांमध्ये स्वच्छता कशी राखला येईल याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
loksatta Health Special article, nutrition, food, pregnancy period
Health Special: गरोदरपणात किती खावं? काय खावं?
Vanchit Bahujan Aghadi Changes Lok Sabha Candidates in maharashtra ahead of lok sabha 2024 Election
‘वंचित’ चा फेरबदल कोणाच्या फायद्याचा? कोणाच्या सांगण्यावरून?
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?

अस्वच्छता म्हणजे आजारांना निमंत्रण

योनी हा स्त्रियांच्या शरीरातील महत्त्वाचा आणि नाजूक भाग आहे. समाजामधील गैरसमजुतीमुळे स्त्रिया मासिक पाळी, योनीमार्ग या विषयावर बोलणे टाळतात. मात्र या प्रवृत्तीमुळे स्त्रिया या भागातील स्वच्छता आणि आजाराकडे दुर्लक्ष करतात. मात्र मासिक पाळीच्या दिवसांमध्ये याची स्वच्छता केली नाही तर खाज येणे, जंतुसंसर्ग होणे, पांढरे पाणी जाणे यांसारखे आजार होऊ शकतात. योनीमार्गाचा जंतुसंसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी बराच अवधी लागतो त्यामुळे वेळीच स्त्रियांनी योनीमार्गाची स्वच्छता करून आजारापासून दूर राहावे.

मासिक पाळीतील बदलते अंतर

मुलींना मासिक पाळी येऊ लागल्यावर सुरुवातीला प्रत्येक महिन्यात पाळी येतेच असे नाही, मात्र याबाबत घाबरून न जाता ती सायकल तयार होण्यासाठी काही काळ जावा लागतो. वर्षांनंतर पाळी नियमित होते, मात्र काही वर्षांनतरही हा त्रास सुरू असेल तर यावर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. यासाठी तीन महत्त्वाची कारणे आहेत असे डॉ. नंदनवार यांनी सांगितले. हिमोग्लोबिन, हार्मोनल बदल किंवा पाळी पुढे-मागे करण्यासाठी औषधांचा वापर यामुळे हा त्रास होतो. यासाठी पौगंडावस्थेतील मुलींना आठवडय़ातून दोन वेळेस लोहयुक्त औषधे देण्यात याव्यात असे राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमातही सांगितले गेले आहे.

काळसर रक्तस्राव म्हणजे आजार नव्हे

स्त्रियांना लाल रक्तस्रावाबरोबरच अनेकदा काळसर रंगाचा रक्तस्राव होत असतो. मात्र या वेळी घाबरून न जाता अशा प्रकारचे रक्त जाणे साहजिक आहे. यासाठी जास्त काळ पॅड न बदलणे या कारणांमुळे काळसर रक्तस्राव होऊ शकतो.

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये घ्यायची काळजी

सध्या धकाधकीची जीवनशैली आणि जाहिरातींचे कौशल्य यामुळे बाजारात मिळणाऱ्या सॅनिटरी पॅडचा वापर करण्याकडे स्त्रियांचा अधिक कल आहे. मात्र कमी गुणवत्ता असलेल्या पॅडच्या वापरामुळे जंतुसंसर्ग, योनीमार्गातून पांढरे द्रव जाणे, खाज येणे यांसारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे स्त्रियांनी चांगली गुणवत्ता असलेले पॅड वापरावेत. रक्तस्रावाच्या प्रमाणानुसार दिवसातून किमान तीन ते पाच वेळा पॅड बदलावेत. बऱ्याचदा स्त्रिया एकच पॅड दिवसभर वापरतात याचा स्त्रियांच्या शरीरावर घातक परिणाम होऊ शकतो. सुकलेले रक्त व घाम यामुळे योनीमार्गात संसर्ग होण्याची शक्यता वाढते, असे केईएम रुग्णालयातील सामाजिक वैद्यकशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. कामाक्षी भाटे यांनी सांगितले. सरकारी शाळांमधून कमी किमतीत चांगली गुणवत्ता असलेले पॅड विद्यार्थिनींना देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. स्वच्छतेबाबतीत मासिक पाळीच्या दिवसांमध्ये पाण्याची उपलब्धता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पॅड वापरण्याची परिस्थिती नसेल तर घरगुती कापडांचे पॅडही वापरले जाऊ शकतात. यासाठी वापरात येणाऱ्या कापडाला शिवण, बटण नसावे याची खात्री करून घ्यावी. त्याशिवाय कापड स्वच्छ पाण्याने धुवून उन्हात वाळत घालावे. कापडावरील जंतू उन्हाने मरतात. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात उन्हामध्ये कापड घालणे शक्य नसल्यास या कापडांना इस्त्री केली तरी चालू शकते. त्याबरोबरच महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या कापडाचा स्वत:चा वेगळा संच असावा. इतर कोणाचेही पाळीचे कापड वापरू नये.

पाळी येण्याचे वय कमी

काही वर्षांपूर्वी वयाच्या १४ व्या वयात मुलींना पाळी येत होती. मात्र गेल्या काही वर्षांत १० व्या वयातही मुलींना मासिक पाळी सुरू होते. यामध्ये काही घाबरण्याचे कारण नाही असे डॉ. नंदनवार यांनी सांगितले. सध्या मुलींच्या खाण्यापिण्याच्या पद्धती बदलल्या आहेत, त्यात मुलींच्या खाण्यामध्ये प्रथिनेयुक्त पदार्थाचा जास्त समावेश असतो. शेतीमध्ये अधिक रासायनिक खतांची फवारणी केली जाते त्याचा परिणामही स्त्रियांच्या शरीरावर होत असतो. त्याबरोबरच जेवणाच्या अनियमित वेळा, जंक फूड खाण्याचे वाढलेले प्रमाण, रात्रीचे जागरण यामुळेही मुलींच्या शरीरातील हार्मोन्सवर परिणाम होत असतो. यामुळे मासिक पाळी व स्राव यावरही परिणाम होतो.

– मीनल गांगुर्डे

meenal.gangurde@expressindia.com