वैद्य विक्रांत जाधव

मागील लेखात पावसाचा आनंद लुटताना प्रकृतीला हानी पोहोचणार नाही या दृष्टीने काय पथ्य सांभाळावे याची माहिती देण्यात आली. या लेखात पावसाचा त्रास होऊ नये या दृष्टीने खाण्यात काय टाळावे याविषयी चर्चा करण्यात आली आहे.

पावसाळ्यामध्ये कोणत्याही प्रकारची बाटलीत बंद असलेली सरबते घेऊ  नयेत. या सरबतांमध्ये साखरेचे प्रमाण वाढवलेले असल्याने ती पचायला जड असतात. शरीरातील वाताचे प्रमाण सरबताच्या गारव्याने वाढते. त्यामुळे शरीराचे जडत्व वाढते. विविध प्रकारची शीतपेये तसेच पावडरच्या दुधापासून तयार केलेले आइस्क्रीम टाळायला हवे. शास्त्रीयदृष्टय़ा पावसाळ्यात म्हशीचे दूध शक्यतो घेऊ  नये. परंतु हे अशक्य असल्याने त्यावर संस्कार करून, पाणी टाकून त्यात सुंठ, पिंपळी टाकून उकळवून घेतल्यास लाभदायक ठरते. तसेच पनीर आणि त्याचे पदार्थ पावसाळ्यात खाऊ  नयेत. ते खाल्ल्यास पोटाचे त्रास खात्रीपूर्वक होतात.

हल्ली प्रत्येक ऋतूत बंगाली मिठाई खाल्ली जाते. परंतु पावसाळ्यात मात्र ती सेवन करू नये. जिलेबी आणि त्याबरोबर खाल्ली जाणारी मिसळ पावसाळ्यात आरोग्याला बाधा आणू शकते. विविध प्रकारचे सुकलेले मांस पावसाळ्यात टाळावे. शास्त्रीयदृष्टय़ा सर्व मासेदेखील टाळावेत अन्यथा त्रास संभवतो. विविध प्रकारचे बंद पाकिटातील आयते तयार सूप पावसाळ्यात सेवन न केलेले उत्तम. पावसाळ्यात पालेभाज्यांनी शरीरस्थ दोषांची अधिक वृद्धी होते आणि ताप, जुलाब, दुर्गंधी अधोवायू (गॅस), मळमळ, पोटफुगीसारखी लक्षणे उद्भवतात. पालक, मेथी, शेपू, करडई या भाज्यांचे सेवन विशेषत्वाने टाळावे. कारली, कोबी या भाज्याही वात वाढवणाऱ्या असल्याने टाळायला हव्यात. कोरडय़ा भाज्यांचे सेवन पावसाळ्यात करू नये. रुक्ष, कोरडय़ा, पचायला जड असलेल्या पदार्थानीदेखील वात वाढतो. चणाडाळ, राजमा, चवळी, वाल ही वाळवलेली धान्ये टाळावीत. त्यामुळे वातवृद्धी होऊन वातव्याधी बळावतात. साबुदाणा, शिंगाडा, बटाटा हे उपवासाला प्रचलित असलेले पदार्थ आयुर्वेदाने टाळायला सांगितले आहेत. या पदार्थाचे सेवन केल्याने शरीर जड होते आणि वात वाढून त्रास होतो. याचा प्रत्यय अनेकांना असेलच.

रताळ्याचासुद्धा अधिक वापर टाळायला हवा. रताळ्याचे गोड पदार्थ भूक लागल्यास अल्प प्रमाणात खावेत. थंड पाणी, बटाटय़ाचे तळलेले पदार्थ, शिळे पदार्थ, जव या धान्यांचे पदार्थ पावसाळ्यात सेवन करू नयेत, वात वाढतो. पावसाळ्यात पाणी चांगले उकळून प्यावे. केवळ पाणी किंवा न उकळलेले पाणी सेवन करणे टाळावे. पावसाळ्यात थंड भोजन करू नये. थंड जेवण केल्याने वात वाढतो, तसेच जेवण करताना त्या पदार्थानी अग्नी मंद होणार नाही याची काळजी घ्यावी. आयुर्वेदशास्त्राने ऋतुचर्या या सदरात प्रत्येक ऋतूचा सेवनीय आहार, त्या ऋतूचा शरीरावर आरोग्यकारक परिणाम होण्यासाठी आणि वाढलेल्या दोषांचा समतोल होऊन शरीर निरोगी राहण्याच्या हेतूने केला आहे. म्हणून पावसाळ्यात वात कमी करणारा आहारच सेवन करावा. कडू, तिखट, रसाचे पदार्थ वाताची वृद्धी करणारे असतात. त्यासाठी आम्ल, लवण हे अग्नी वाढवणारे पदार्थ, तसेच वाताचा प्रकोप कमी करणारे पदार्थ सेवनात ठेवावेत. आम्ल आणि लवणरस हे उष्ण असून भूक वाढवणारे आहेत. या ऋतूमध्ये मका, बाजरी यांचे पदार्थ न खाल्लेले उत्तम. मक्याचे कणीस पावसात खातात पण त्याला लिंबू मसाला मीठ लावून आणि त्यावर किमान एक ते दीड तास पाणी सेवन करू नये. काकडी, खरबूज, मैद्याचे तळलेले पदार्थ खाऊ  नयेत. आंबे व जांभळे पावसाळ्यात मिळतात, परंतु ते सेवन केल्यास त्रास होतो.

पाऊस व व्यक्ती याचं अतूट नाते आहे. पाणी नेहमीच सर्वाना हवेहवेसे वाटणारे, परंतु शरीरात किंवा निसर्गात पाणी जास्त झाले की दलदल होते आणि क्रिया बिघडतात, ही गोष्ट ध्यानात घ्यावी आणि पाऊस निसर्ग आरोग्याचा आनंद लुटू या.

vikrantayur@gmail.com