News Flash

टॅटू काढताय?.. काळजी घ्या!

टॅटू काढताना विविधरंगी ‘डाय’ वापरले जातात. या रंगांमध्ये ‘फेरस ऑक्साईड’ हा घटक असतो.

जीवनातील काही खास आठवणी जतन करून ठेवण्यासाठी एखादा सुंदरसा टॅटू काढून घ्यावा, असे अनेक जण ठरवतात. हल्ली टॅटूची लोकप्रियता वाढत आहे. पण टॅटू काढणे ही वाटते तेवढी साधी गोष्ट नव्हे. त्यात काही धोकेही असू शकतात. ते आधीच लक्षात घेऊन योग्य काळजी घेऊनच ही प्रक्रिया करणे केव्हाही चांगले. टॅटूच्या या फॅशनमधील काही संभाव्य धोक्यांबद्दल..

‘फॅशन अ‍ॅक्सेसरी’ म्हणून टॅटू काढून घेण्याचे वेड सध्या सगळीकडे दिसून येते. टॅटू ही खरे तर एक ‘मिनी सर्जिकल प्रोसिजर’ आहे. अशा प्रकारची गोष्ट करवून घेताना काही धोकेही असू शकतात. नेमका त्याचाच विचार पुरेसा होताना दिसत नाही. टॅटू काढताना सर्व खबरदारी घ्यायची म्हटले तर टॅटू काढण्याची किंमत वाढते. प्रत्येक ग्राहकासाठी वेगळ्या सुया वापरणे, स्वच्छता राखणे, ग्लोव्हज वापरणे अशा वेगवेगळ्या गोष्टींचा त्यात समावेश होतो.

काहीही काळजी न घेता अगदी स्वस्तात टॅटू करून देणारी मंडळी अनेकदा दुकान थाटून बसलेली बघायला मिळतात आणि त्यांच्याकडेही तरुणांची मोठी गर्दी दिसते. त्यामुळे टॅटू काढताना उद्भवू शकणाऱ्या धोक्यांबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. टॅटूसाठी वापरलेल्या सुयांचा एकाहून अधिक ग्राहकांसाठी वापर होत असेल तर त्यामार्फत एचआयव्ही, हिपेटायटिस ‘बी’, हिपेटायटिस ‘सी’ अशा आजारांचे संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘‘शरीरावर जिथे टॅटू करायचा तिथे एखादी महत्त्वाची शीर वा रक्तवाहिनी असेल तर त्याला इजा पोहोचून पांगळेपणा येऊ शकतो, तसेच रक्तवाहिनीतून संसर्ग होऊन त्या भागाला ‘गँगरीन’ होण्याचाही धोका असतो. त्यामुळे टॅटू ही खबरदारीचे निकष पाळणाऱ्या ठिकाणी व त्यातील धोक्यांबद्दल ज्ञान असलेल्या व्यक्तीकडूनच करून घेणे योग्य. हे सगळे लक्षात घेतले तर टॅटू काढण्याच्या व्यवसायालाही काही नियमन यायला हवे,’’ असे मत मानसोपचारतज्ज्ञ वाणी कुल्हळी यांनी व्यक्त केले.

टॅटू काढताना विविधरंगी ‘डाय’ वापरले जातात. या रंगांमध्ये ‘फेरस ऑक्साईड’ हा घटक असतो. फेरस ऑक्साईडचे वेगवेगळ्या तापमानाला वेगळे रंग मिळतात. काळा, गडद आणि फिकट चॉकलेटी, लाल आणि ‘टायटॅनियम डायऑक्साईड’पासून मिळणारा पांढरा अशा वेगवेगळ्या रंगांची शाई असते. त्वचारोगतज्ज्ञ डॉ. दिलीप शहा म्हणाले, ‘‘टॅटू काढून घेणाऱ्याची त्वचा त्यातील ‘डाय’ला संवेदनशील असू शकते आणि त्यामुळे त्वचेवर अ‍ॅलर्जी येऊ शकते. त्यात खाज येणे, फोड येणे, त्यातून पाण्यासारखा स्राव येणे हे होऊ शकते. त्वचेला संसर्गही होऊ शकते. टॅटू काढताना त्वचेच्या कोणत्या थरापर्यंत रंग टोचले जावेत यात गडबड झाल्यास त्वचेला इजा होऊन त्याचा चट्टा राहू शकतो. काही वेळा टॅटूची शाई कशी तरीच पसरते आणि असा टॅटू दिसायलाही चांगला दिसत नाही.’’

टॅटू काढून घेतल्यानंतरही काही विशिष्ट काळजी घ्यावी लागणे, टॅटू काढलेली जागा स्वच्छ ठेवण्यासाठी योग्य पद्धत वापरणे, ती त्वचा खसाखसा न चोळणे, काही काळ सूर्यप्रकाशात ती उघडी न ठेवणे अशी काळजी घेण्यास ‘टॅटू आर्टिस्ट’देखील सांगतात. पण त्यासाठी ती व्यक्तीसुद्धा प्रशिक्षित व अनुभवी असणे आवश्यक. शल्यचिकित्सातज्ज्ञ डॉ. संजय कोलते म्हणाले, ‘‘काही वेळा टॅटू काढलेल्या ठिकाणी लहान गाठी येऊ शकतात. टॅटू काढताना टोचलेली त्वचा जेव्हा शरीर नैसर्गिकरीत्या भरून काढत असते तेव्हा काही वेळा जास्त त्वचा तयार होते आणि तिथला त्वचेचा चट्टा जाड होत जातो. हाडाच्या जागी, कानावर, छातीच्या पुढच्या वा खांद्याच्या भागावर असे ‘किलॉईडस्’ तयार होऊन तो भाग विद्रूप दिसू शकतो.’’

टॅटू काढल्यावर ‘एमआरआय’ चाचणी करावी लागली तर ती करता येते की नाही, असा प्रश्नही अनेकांच्या मनात असतो. याबद्दल डॉ. कोलते म्हणाले, ‘‘‘एमआरआय’ चाचणी टॅटू काढल्यांनाही करता येते, पण एमआरआयची प्रतिमा थोडी खराब येण्याची शक्यता असते.’’

sampada.sovani@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2017 12:11 am

Web Title: tattoos and precautions
Next Stories
1 पिंपळपान : अशोक
2 राहा फिट : चरबी – आवश्यक आणि अनावश्यक
3 दम्याचा त्रास
Just Now!
X