News Flash

युरिक अ‍ॅसिड

कोणतीही सांधेदुखी झाली आणि थोडय़ा दिवसांत बरी होत नसेल तर ‘युरिक अ‍ॅसिड’ वाढले असे सहजपणे म्हटले जाते.

कोणतीही सांधेदुखी झाली आणि थोडय़ा दिवसांत बरी होत नसेल तर ‘युरिक अ‍ॅसिड’ वाढले असे सहजपणे म्हटले जाते. युरिक अ‍ॅसिड वाढण्याचा त्रास आणि त्यायोगे होणारा संधिवात हा अनेक तरुण, मध्यमवयीन व्यक्तींना अस्वस्थ करणारा आहे. ‘युरिक अ‍ॅसिड’ म्हणजे नेमके काय, ते कशाने वाढते, काय खावे, जेणेकरून ते सतत नियंत्रणात राहील. गुणात्मकदृष्टय़ा आयुर्वेदाच्या नजरेतून जाणून घेणार आहोत. योग्य प्रकारे पथ्य अवलंबल्यास यातून कायमची सुटका मिळू शकते.

युरिक अ‍ॅसिड वाढलेले असताना वा त्याची प्रवृत्ती असताना मका व तत्सम पदार्थ पूर्णत: टाळायला हवेत. कोणत्याही देशातून आलेला, कोणत्याही चवीचा मका युरिक अ‍ॅसिडचा त्रास असताना वज्र्य. उडीद डाळ, चण्याची डाळ, राजमा, वाळवलेले कडवे वाल, गोडे वाल, वाटाणे यांचे सेवन युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण तात्काळ वाढवते. कुळिथाचा वापर वात व्याधीत फायदेशीर असला तरी युरिक अ‍ॅसिडद्वारे होणाऱ्या संधिवातामध्ये तो वज्र्य आहे. पालक, चुका अंबाडी, मेथीची भाजी, करडई या पालेभाज्या त्रास वाढवताना दिसून येतात. साबुदाणा, भगर, दही हे पदार्थ टाळलेले उत्तम. डाळींच्या पिठाचे डांगरसुद्धा हा त्रास वाढवते. उसाचा रस, चिंचेचा वापर या व्यक्तींनी टाळल्यास फायदा होतो. बाजारात सध्या उपलब्ध असणारे हवाबंद डब्यातील किंवा पाकिटातील पदार्थही टाळावेत. हे पदार्थ टिकवण्यासाठी वापरलेल्या रासायनिक घटकांमुळे युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. थंड पदार्थ, विशेष करून आइस्क्रीमसारख्या वात वाढवणाऱ्या पदार्थाचे सेवन करू नये. पाणीपुरीमधील पुरीसुद्धा या आजारामध्ये त्रास वाढवते. नासवलेले पदार्थ, त्यातही अनैसर्गिकरीत्या नासवलेले पदार्थ हा आजार असताना खाऊ  नयेत. डाळींचा आहारामध्ये प्रमाणापेक्षा जास्त वापर करू नये. कोणत्याही प्रकारे केलेल्या उडिदाच्या पापडामुळे युरिक अ‍ॅसिड वाढते.

काय खावे?

युरिक अ‍ॅसिडच्या त्रासामध्ये न खाण्याचीच यादी मोठी असते, हा विचार करून कित्येक व्यक्ती पथ्य सोडून देतात आणि व्याधी वाढवून घेतात; परंतु खाण्याचे खूप उत्तम चविष्ट प्रकार युरिक अ‍ॅसिड कमी करताना दिसून येतात. यामध्ये हळदीचा उपयोग अधिक फायदेशीर आहे. विविध भाज्यांमध्ये हळदीचे प्रमाण वाढवावे, तसेच हळद आणि आल्याचे लोणचे नियमित खावे. मूग, मसूर, तूर पाण्यात हळद टाकून त्याचे सूप सेवन केल्यास उत्तम. मूग, मसूर, तूर, मटकी यांचे घट्ट वरण निषिद्ध असले तरी त्याचे शिजवलेले पातळ पाणी ऊर्जा देणारे असून या आजाराचा त्रास कमी करते. बऱ्याच रानभाज्या खाण्यानेही फायदा होतो. तांदुळका, चाकवत, लाल माठ, शेवगा पाने, करडी, सरसू, पुनर्नवा उपयुक्त ठरतात.

गुळवेल ही वनस्पती अनेकांना परिचित असेल. त्याच्या पानांची भाजी युरिक अ‍ॅसिडच्या त्रासाबरोबरच इतर अनेक उपद्रवात्मक त्रासही कमी करते. यासोबतच रक्त शुद्ध होते, वजनही कमी होते आणि प्रतिकारक्षमता वाढते. कारली, पडवळ या भाज्यादेखील फायदेशीर आहेत. मात्र यामध्ये डाळी घालू नयेत. धने व जिरे घालून पाणी उकळावे आणि नंतर ते गाळून दिवसभरात सेवन केल्यास त्रास कमी होतो.

मांसाहार आणि युरिक अ‍ॅसिड

मांसाहारी व्यक्तींना त्रास झाल्यास झिंगे, खेकडे, बोकडाचे मटन, भेजा, सुके मासे, हलवा हे पदार्थ टाळावेत. उकडलेली अंडीसुद्धा खाणे शक्यतो टाळावे. हे पदार्थ शिजवताना त्यामध्ये तीळ, दगडफूल, मिरे, सुंठ यांचा अधिक वापर केल्यास ते बाधण्याची शक्यता कमी असते. तळलेले मासे मात्र खाऊ  नयेत. मांसाहाराच्या पदार्थामध्ये खोबऱ्याचा वापर करावा. लाल मिरची, धने, जिरे, किंचित मेथी दाणे असलेले वाटप भेंडी, बटाटा, मासे तयार करताना आवर्जून घालावे. डुकराचे मांस, सुकवलेले मासे, साठवलेले मांस यांचे सेवनही अहितकारक आहे. पांढऱ्या पाण्याचे पापलेट, सुरमई, रावस, मांदेली, करली आदी लहान माशांचा वापर वरील वाटप करून करावा. भाजलेले मांस किंवा मासे म्हणजेच तंदूर खाल्ल्यास फायदा होतो. त्याला मिरे, दालचिनी, दगडफूल यांचे वाटलेले मिश्रण लावावे. युरिक अ‍ॅसिडचा त्रास असताना दह्य़ाचे सेवन करू नये. सर्व प्रकारच्या कोशिंबिरी, रायते, फ्रुट सॅलड तसेच दही घालून केलेल्या भाज्यांमुळे युरिक अ‍ॅसिडचा त्रास वाढतो. ताकसुद्धा आंबट असल्यास रुग्णांनी टाळावे. आहारामध्ये वरून मीठ घेऊन खाण्याची सवय रुग्णांना त्रासदायक ठरू शकते. हवाबंद डब्यातील पदार्थामध्ये मिठाचा वापर अधिक होत असल्याने त्यांचे सेवन टाळलेले उत्तम. मैद्याचे तळलेले पदार्थ रुग्णांनी सेवन केल्यास तात्काळ त्रास होण्याची शक्यता असतो.

युरिक अ‍ॅसिडचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी दिवसा झोपू नये. वात विकारांमध्ये युरिक अ‍ॅसिडचा त्रास समाविष्ट असला तरी गरम पाण्याचे सेवन या व्यक्तींनी टाळावे. सुंठ, वावडिंग, पिंपळी घालून उकळलेल्या पाण्याचे सेवन केल्यास फायदेशीर असते. युरिक अ‍ॅसिड ही एक अवस्था असून पथ्यांचे पालन करून आरोग्यदायी पदार्थाचे सेवन केल्यास या अवस्थेतून बाहेर पडणे सहज शक्य आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2018 12:34 am

Web Title: uric acid
Next Stories
1 स्वमदत
2 तृणधान्यांचे आहारातील महत्त्व
3 आम्लपित्ताचा त्रास
Just Now!
X