News Flash

लोक पर्यटन : येलघोल लेणी

मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील कामशेत येथून पवन-मावळातील कडधे नावाचे गाव गाठायचे.

लेण्याच्या मध्यभागावरील भिंतीवर बऱ्याच मानवी आकृत्या कोरलेल्या दिसून येतात.

येलघोल हे पुणे जिल्ह्यतील मावळ तालुक्यात असणारे एक छोटेसे गाव. डोंगराच्या कुशीत वसलेले. एरवी हे गाव नकाशावर शोधतानाही आपली दमछाक होईल, इतकं याचं अस्तित्व छोटं आहे. पण एका प्राचीन ठेव्यामुळे हे गाव हळूहळू भटकंतीच्या नकाशावर येऊ लागले आहे. तसे पाहिले तर सह्याद्रीच्या कुशीत असणाऱ्या या गावावर निसर्गाचा आशीर्वाद तसा जन्मापासूनच. त्यातही पावसाळा हा जास्तच कृपा दाखविणारा. आपल्यापैकी अनेकांना येलघोल हे नावही माहीत नसण्याची शक्यताच अधिक. एखाद्या आडवळणावर असणाऱ्या गावाला जशा अनंत अडचणी भोगायला लागतात, तशाच या गावालाही जन्मापासूनच त्या चिकटलेल्या आहेत. कच्चे रस्ते, चांगल्या शाळांची अन् दवाखान्यांची वानवा, उन्हाळ्यात पाण्यासाठीची वणवण.. वगैरे..वगैरे.. पण ही सारी गावे या अडचणींचा सामना करीत असतात. विकासापासून शेकडो मैल दूर असणाऱ्या या गावावर मात्र निसर्गाची कृपादृष्टी असते. याच नैसर्गिक वरदानावर हे गाव वेगळे ठरले आहे. तर सांगायचा उद्देश हा की, या येलघोल गावात एक प्राचीन लेणं लपलेलं आह. महाराष्ट्रात ज्या – ज्या अर्धवट गुहा, लेण्या सापडतात त्यापैकीच एक लेणी म्हणजे हे येलघोल. येथे प्राचीन काळी एक लेणं एक सुंदर निर्मिती होता होता राहिलं. याचं आणखी एक दुर्दैव म्हणजे या लेण्याचा उल्लेख कुठल्याही पुस्तकात अथवा शासनाच्या गॅझेटमध्ये सापडत नाही. अपवाद फक्त काही भटकंती लेख. अशी ही अगदीच दुर्लक्षित आणि अपरिचित लेणी पाहण्यासाठी आपल्याला मोठी कसरत करत यावे लागते. आपले स्वत:चे वाहन असेल तर उत्तम. कारण येथे दळणवळणाची साधने फारच कमी आहेत आणि थेट येलघोलपर्यंत तर एसटीही येत नाही. मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील कामशेत येथून पवन-मावळातील कडधे नावाचे गाव गाठायचे. कडधेवरून आर्डवमार्गे येलघोल गावात येता येते. रस्त्याने येतानाच या गावाची दुर्गमता आपल्या ध्यानात येते. गावात पोहोचलो की, आपल्याला मारुतीच्या मंदिरासमोर अनेक समाध्यांवरचे अवशेष आणि गजलक्ष्मीचे एक शिल्प पाहायला मिळते. या दगडी शिल्पावरून या गावाचा इतिहास हा बराच प्राचीन असल्याचे दिसते. कारण या येलघोल गावाजवळ म्हणजे काही किलोमीटर अंतरावरच तिकोणा, बेडसे आणि घोरावडेश्वर या लेण्यांच्या खाणाखुणा आहेत. त्यामुळे या भागात देखील त्याच काळात अशा लेण्यांचे खोदकाम झाल्याचे अनेक अभ्यासकांचे मत आहे.

गावात लेण्यांची चौकशी केली तर लोकही अगदी आपुलकीने रस्ता दाखवितात. गावापासून साधारण दोन किलोमीटर अंतरावर ही लेणी आहे. फक्त पायवाट आहे. त्यामुळे हा प्रवासही पायीच करावा लागतो. साधारण अर्ध्या -पाऊण तासात आपण येलघोलच्या लेणीपाशी पोहोचतो. येथे पोहोचल्यावर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे ही लेणी एका नैसर्गिक कपारीत अथवा घळीतच असून, त्याच्या अगदी शेजारून एक धबधबा लेणीसमोरच कोसळतो. यामुळे हे दृश्य पावसाळ्यात खूपच सुंदर दिसते. तर अशा नैसर्गिक कपारीतच ही लेणी खोदलेली आहे. पूर्वेस तोंड करून असलेल्या या लेणीच्या उजव्याच बाजूला एका दगडात कोरलेला स्तूप दिसतो. साधारण पाच फूट उंचीचा हा स्तूप आहे. तसेच डाव्या बाजूला खोल्यांचे बांधकाम अर्धवट अवस्थेत दिसते. तसेच लेण्याच्या मध्यभागावरील भिंतीवर बऱ्याच मानवी आकृत्या कोरलेल्या दिसून येतात. कुतूहल चाळविणाऱ्या या आकृत्यांचे प्रयोजन काय? तसेच यांची निर्मिती कोणत्या काळातील आहे याबद्दल कसलीही माहिती मिळत नाही. त्यामुळे यांचे संशोधन होणे अत्यंत गरजेचे आहे. याबरोबरच या लेण्यांचा परिसर जर पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत साफ केला तर अनेक बाबी उजेडात येतील यात शंका नाही. ज्यांना तंगडतोडीबरोबर प्रवासही करायचा आहे त्यांनी येथे जरूर यावे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 2:36 am

Web Title: ancient caves in maharashtra
Next Stories
1 वन पर्यटन : हातगड
2 पेंग्विन परेड
3 लोक पर्यटन : दुर्गाडी-नीरबावी
Just Now!
X