01 June 2020

News Flash

जायचं, पण कुठं? : आरकू व्हॅली, बोरा केव्हज

१८०७ साली भूगर्भतज्ज्ञ किंग विल्यमने याचा शोध लावल्याची नोंद आहे.

गोस्तानी नदीमुळे चुनखडीची ही अजस्र गुंफा तयार झाली आहे

भारताच्या पूर्वेस असलेल्या बंगाल उपसागराच्या आंध्रप्रदेशातील किनारपट्टीलगतच्या अनंतगिरी पर्वतरांगात आपल्या महाबळेश्वरच्या उंचीइतके आरकू हे ठिकाण प्रसिद्ध आहे. त्या रस्त्यावरील महत्त्वाचं आकर्षण म्हणजे दहा लाख वर्षांपूर्वीच्या लवणस्तंभाची गुंफा ‘बोरा केव्हज’. वाल्टेर-वैजाग-विशाखापट्टणम या नावाने प्रसिद्ध बंदराहून रस्त्याने किंवा रेल्वेने अंदाजे शंभर किमीवर बोरा केव्हज आहे. निसर्ग दर्शनासाठी पूर्वतटीय रेल्वेच्या काचेचे छत व मोठय़ा खिडक्या असलेल्या खास बोगीने पहाडातील ५८ बोगद्यातून, गुहेच्या शंभर फूटवरून एक रेल्वे मार्ग आरकूकडे जातो. त्या रेल्वेमार्गावरील बोरा केव्हज हे एक स्टेशन.

१८०७ साली भूगर्भतज्ज्ञ किंग विल्यमने याचा शोध लावल्याची नोंद आहे. गोस्तानी नदीमुळे चुनखडीची ही अजस्र गुंफा तयार झाली आहे. सध्या गुंफेच्या आतून वाहणारी ही नदी कधीकाळी या चुनखडीच्या खडकावरून वाहत असे. गुहेच्या छतातून झिरपणाऱ्या क्षारयुक्त द्रवांतील क्षारांच्या निक्षेपणामुळे लवणस्तंभाची निर्मिती होते. खनिजे, लाव्हारस, कोळसा, वाळू इ. सारख्या अनेक पदार्थापासून ते निर्माण होऊ शकतात. अशाच प्रक्रियेमुळे गुहेच्या छतावर तयार होणाऱ्या भूरूपाला अधोमुखी लवणस्तंभ तर जमिनीवर तयार होणारे ऊध्र्वमुखी लवणस्तंभ म्हणतात. कधीकधी अधोमुखी लवणस्तंभ लांबीने वाढून एकमेकांत मिळतात आणि तळापासून छतापर्यंत एकसंध चुनखडीचे स्तंभ तयार होतात.

बोरा केव्हजमध्ये पायऱ्या उतरून खाली जावे लागते. सुमारे ७५ फूट उंच व ३५० फूट लांब अशा या गुंफेत शेकडो लोक सामावू शकतात. गुंफेमध्ये लावलेल्या दिव्यांमुळे लवणस्तंभाचे नैसर्गिक रूपदर्शन जास्त खुलत होते. अगणित भव्य लवणस्तंभाच्या अचंबित करणाऱ्या विलक्षण निसर्गविष्कारांच्या दर्शनाने आपण स्तिमित होतो. गुंफेच्या छता, भिंतीवरून लोंबकळणारे तसेच जमिनीवरून वर झेपावणारे कित्येक फूट उंचीचे लवणस्तंभाचे अजस्र्ो सुळके; त्यांची थक्क करणारी वैविध्यपूर्ण आकाररूपे.

एके ठिकाणी अधोमुख आणि उर्ध्वमुख लवणस्तंभाचे मिलन होऊन नजरेत न मावणारी अती विशाल जलशीला तयार झाली होती. पाण्याचे बाष्पीभवन होऊन त्यातील क्षार एकावर एक साठत त्यांची एक सेंटीमीटर लांबी होण्यासाठी हजार वर्षे लागतात. येथे तर कित्येक फूट घेराचे, उंचीचे अफलातून लवणस्तंभ आहेत. निसर्गाने सुमारे दहा लाख वर्षांपासून चालवलेली आपली अजब किमया कारागिरी विस्मयचकित करणारी आहे. त्यावर टाकण्यात आलेल्या रंगीत प्रकाशझोतांमुळे त्याचं चमत्कृतीपूर्ण, रौद्र सौंदर्य अधिकच दिसत होतं. एके ठिकाणी भलं मोठं झुंबर लटकावल्यासारखे नजरेत भरत होते.

क्षणोक्षणी भारावलेल्या अवस्थेत थबकून थांबत पुढे जाताना एक किलोमीटरपेक्षा जास्तीच्या चढ उताराच्या वाटचालीनंतर शेवटचा उंच पॉइंट येतो. एका मोठय़ा खडकाखालून वाकून जाताना गंधकमिश्रित पिवळ्या मातीचं पाणी येताना दिसले. गुहेच्या आतील मोकळ्या छतावर असंख्य वटवाघुळे लटकलेली होती. आंध्रमध्ये एवढी मोठी निसर्गनवलच्या लवणस्तंभाची विलक्षण गुंफा असेल आणि तिचा पर्यटन स्थळ म्हणून एवढा चांगला विकास केला गेला असेल याची आधी अजिबात कल्पना नसल्याने बोरा केव्ह्जची भेट म्हणजे आश्चर्याचा सुखद  धक्का होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2017 3:36 am

Web Title: araku valley tourist attractions
Next Stories
1 टाकळी ढोकेश्वर आणि सोमेश्वर
2 लोक पर्यटन : दर्याची दौलत..
3 वन पर्यटन : काटेपूर्णा
Just Now!
X