काही बाबतीत आपण उगाचच अशा काही कल्पना मनात घट्ट रुजवलेल्या असतात की, त्यांच्या चौकटीत अडकल्याने अनेकदा काही गोष्टींच्या आनंदाला, अनुभवाला आपण मुकतो (आणि हे आपल्याला कळतही नाही!). पर्यटनातील याचं एक नेमकं उदाहरण म्हणजे सर्वसाधारणपणे पावसाळा म्हटल्यावर बहुतेकांच्या मनात डोंगरमाथा आणि त्यावरून कोसळणारे धबधबे येतात. आता हे चित्र चूक नसलं तरी, आपल्या पावसाळ्याचे रंग बदलते असतात. आषाढाच्या धो धो जलधारा श्रावणाचं आगमन झाल्यावर ‘क्षणात येई सरसर शिरवे- क्षणात फिरूनी उन पडे’चा खेळ दाखवू लागतात. असा सुंदर साजिरा श्रावण जेंव्हा इंद्रधनुचे गोफ विणत अवघ्या सृष्टिवर आपलं गारूड पसरू लागतो तेंव्हा जायलाच हवं असं ठिकाण म्हणजे माडांच्या हिरव्यागार बनाने आणि किनाऱ्याकडे धावणाऱ्या फेसाळत्या लाटांनी साद घालणारा सागर किनारा. आषाढातील उन्मादी पाऊस थांबलेला असतो, सावन के तराने सुरू झालेले असतात. सागराला आलेली उधाणाची भरती आता कमी झालेली असते. पावसाळ्यात आपलं नेहमीचं रंगरूप (निळ्या निळाईनं चमकणारं किंवा हिरव्याशार रंगाची मोहिनी घालणारं) टाकून आकाशातल्या मेघमालांचं करडं, काळं रूप सागरानं अंगीकारलेलं असतं. श्रावणामध्ये जेव्हा ऊन-पावसाचा लपंडाव सुरू होतो आणि आकाशातील काली बदरिया हटू लागते तेव्हा पुन्हा एकदा सागराला त्याची जुनी रूपसंपदा प्राप्त होते. आता तर मधूनच पडणाऱ्या उन्हाच्या कवडशांमुळे सागराचे पाणी असे चमकू लागते की बा. भ. बोरकरांच्या ‘समुद्र बिलोरी ऐना गं, सृष्टीला पाचवा महिना गं’,  या ओळींचीच आठवण येते. खरोखरचं समुद्राचं विलोभनीय रूप अनुभवायला भारतीय कॅलेंडरमधला पाचवा महिना म्हणजे श्रावणाइतका उत्तम मुहूर्त दुसरा नाही.

ऊन-पावसाचे पक्षी घेऊन येणाऱ्या श्रावणात बिलोरी ऐन्यासारखा चमकणारा समुद्र पाहायचा असेल तर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील केरळमध्ये जायला हवं. केरळ म्हटल्यावर सर्वात आधी बॅक वॉटर आणि हिरवाई आठवते. पण या राज्याला ५९० किमीचा सागरकिनारा लाभलेला आहे. पूर्वी मलबारचा किनारा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या किनारपट्टीवर कोल्लम, कोवालम, वरकल असे एकाहून एक सुरेख बीचेस आहेत. त्यातलाच एक लक्षवेधी किनारा म्हणजे बेकलचा किनारा. केरळच्या उत्तर टोकावर असलेल्या कासारगौड जिल्ह्य़ात अरबी समुद्राच्या काठावर वसलेलं बेकल नावावरून जरी साधंसुधं गाव वाटलं तरी ते पर्यटकांचे आकर्षण आहे. तसं बेकल तुम्ही पाहिलेलं आहे.मणिरत्नमचा ‘बॉम्बे’ चित्रपट आठवतोय का? त्यातलं अरिवद स्वामी आणि मनीषा कोइरालावर चित्रित झालेलं ‘तू ही रे’ हे प्रेमगीत आठवा. हे गाणं बेकलच्या किनाऱ्यावर आणि इथल्याच किल्ल्यात चित्रित करण्यात आलं होतं. बेकलच्या किनाऱ्यावर अप्रतिम निसर्गसौंदर्य आणि रोमांचक इतिहास याचे अनोखे मिश्रण झाले आहे. बेकलच्या किनाऱ्याला वेगळे परिमाण लाभले आहे ते शिवप्पा नायकाने १७व्या शतकात उभारलेल्या भव्य आणि बुलंद किल्ल्यामुळे. सागराच्या लाटांचा मारा झेलत शतकानुशतके उभा असलेला हा किल्ला किनारपट्टीचे संरक्षण करण्यासाठी उभारला होता. त्यामुळे त्याची भरभक्कम तटबंदी आजही शाबूत आहे. पण आतमध्ये एक हनुमानाचे मंदिर आणि मशीद सोडली तर अन्य कोणत्या इमारतींचे- वाडा, घरे अवशेष दिसत नाहीत. किल्ल्याच्या समोर पसरलेला सागर किनारा आता मात्र सुंदर शिल्पांनी आणि कोरीव कलाकृतींनी सजवलेला आहे. तसेच इथल्या पार्किंग लॉटजवळ किनाऱ्यावरचे लॅटेराइटचे खडक वापरून रॉक गार्डन केलेलं आहे. या सागर किनाऱ्यावर बनवलेल्या वॉक वेवरून

Health Benefits of Avocado
झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात
Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग

संपूर्ण किनाऱ्याचा फेरफटका मारताना कानावर पडणारी सागराची गाज आणि डोळ्यांसमोर नाचणाऱ्या लाटा यामुळे एक अनोखे चित्र तुमच्या मनपटलावर कायमचं कोरलं जातं.

संध्याकाळी हा सागर किनारा प्रकाशझोतांनी उजळून निघतो. समुद्राच्या लाटा मोजत किनाऱ्यावर निवांतपणे बसून राहायचे असेल तर किनाऱ्यावर काही ठिकाणी शेड्स बांधलेल्या आहेत. तिथे स्थानिक सामग्रीपासून बनवलेल्या आसनांवर पहुडून सागरावरून येणाऱ्या वाऱ्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. बेकलमध्ये निवासासाठी पंचतारांकित रिसॉर्ट्सपासून ते घरगुती अगत्याने पाहुणचार करणाऱ्या होमस्टेजपर्यंत वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. खास केरळी पदार्थाचा आस्वाद घेत, श्रावणाचे सागररंग अनुभवण्यासाठी बेकलला अवश्य भेट द्या. माडाच्या झाडांची हिरवी महिरप, पांढऱ्याशुभ्र वाळूचा स्वच्छ किनारा आणि किनाऱ्याकडे आवेगाने येणाऱ्या लाटा हे बेकलचे दृश्य तिथून परत आल्यानंतरही तुम्हाला आठवत राहील यात शंका नाही.

कसे जाल ?

जवळचे विमानतळ मँगलोर (६५ किमी.), रेल्वे स्थानक- कासारगोड

कुठे राहाल – पंचतारांकित रिसॉर्टपासून ते होम स्टेजपर्यंत विविध पर्याय

कधी जाल –  श्रावणाची जादू अनुभवायला ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये. अन्यथा, वर्षभरात कधीही.

मकरंद जोशी makarandvj@gmail.com