पावसाळा सुरू झाला की सगळ्यांना वेध लागतात ते जंगल, डोंगर आणि किल्ल्यांचे. कारण या दिवसांमध्ये ट्रेकिंगची मजा काही औरच असते. पण नेहमीच पायी जाण्यापेक्षा कधीतरी सायकलनेही डोंगरदऱ्यांमध्ये भटकण्याचा आनंद लुटायला हवा. सुरुवातीला शहरानजीकच्या गावांमधून जाणारे रस्ते निवडा. मातीच्या रस्त्यांवरून, हिरव्यागर्द झाडीतून पावसाचा आनंद घेत सायकलिंग करण्याचा थरार एकदा तरी अनुभवायलाच हवा. पण डोंगरामध्ये सायकलिंग करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याची माहिती आज आपण घेणार आहोत.
* डोंगरातील रस्त्यांमध्ये दगड, वेली, वाळू, माती, चिखल हे तुमच्या वाटेत येतील. त्याशिवाय वळणावळणाचे आणि सतत बदलणारा पृष्ठभाग, वाटांवरूनही साकलिंग करावे लागते. त्याची तयारी ठेवा.
* डोंगरामध्ये सायकलिंग करताना तुमच्या शरीराची ठेवण योग्य असेल तर कोणत्याही वाटेवरून सायकलिंग करणं सोप्प जातं. त्यामुळे सायकलिंग करताना तुम्हाला आरामात बसून चालत नाही. नेहमी दक्ष असावं.
* नेहमी १५ ते २० फूट लांबच्या अंतराचा सतत अंदाज घेत राहिलं पाहिजे. ज्याचा उपयोग वेग कमी जास्त करणे, गिअर बदलणे, वेळोवेळी मार्ग बदलणे यासाठी होऊ शकतो.
* डोंगरामध्ये सायकलिंग करताना सायकलच्या सीटची स्थिती काय आहे यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. नेहमीपेक्षा वेगळा रस्ता असल्याने तुमचे पाय सहज जमिनीवर टेकवता येतील त्याप्रमाणे सीटची उंची कमी-जास्त करावी.
* पहिल्यांदाच आडवाटेला सायकलिंग करत असाल तर आधी त्या रस्त्याची माहिती करून घ्या. त्या वाटेवर कुणी सायकलिंग केलं असेल तर त्यांना वाटेवरचे खाचखळगे विचारा. किंवा गुगल मॅपवर रस्ता कसा आहे याचा अंदाज घ्या.
* सुरक्षितता आणि अपघाताच्या दृष्टिकोनातून हलणारे दगड, वाळू, पाणी, शेवाळे आलेल्या वेली, कीटक, पक्षी, प्राणी, सोबतचे सायकलस्वार आणि वाटेने चालणारे ट्रेकर्स यांच्यावरही लक्ष ठेवणं गरजेचं आहे.
* डोंगरामध्ये सायकलिंग करताना ब्रेकिंग खूप महत्त्वाचं आहे. ब्रेकिंग करताना ते सहज असावं. अचानक ब्रेक दाबू नये. तसंच दगड, वेली, वाळूमध्ये ब्रेकिंग करू नये. शक्यतो सपाट रस्त्यावर ब्रेक मारून वेग कमी करून घ्यावा.
* चढ-उताराच्या खडबडीत रस्त्यावर गिअर शिफ्ट करणं हेदेखील एक कौशल्य आहे. कधीही सर्वात वरच्या किंवा खालच्या स्थितीत गिअर्स ठेवू नये. रस्त्याचा अंदाज घेऊन गिअर्स कमी किंवा जास्तीच्या क्रमांकावर ठेवावेत. चढ किंवा उतार आल्यावर गिअर्स बदलण्याचा प्रयत्न करू नये. तसंच पायडलिंग करत असतानाच गिअर बदलावेत.
* जंगलातील रस्त्यांवर अपघात होऊ शकतो, यासाठी मनाची तयारी ठेवा. प्रथमोपचार पेटी जवळ असावीच.
* तुम्हाला अपघात झाला तरी तुमची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. त्यामुळे अपघातानंतर आधी स्वत: सुरक्षित आहात याची खात्री करून घ्या. त्यानंतर सायकलची सुरक्षितता पाहा.
* जंगलामध्ये मोबाइलला नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे सायकलिंगला निघण्यापूर्वीच किती अंतरावर कोणती गावं आहेत, तिथे काय सुविधा आहेत याचीही माहिती घेऊन ठेवा. जेणेकरून संकटसमयी आपण कुठे आहोत आणि गरज भासल्यास उपचारासाठी किती लांब जायचे आहे याचा अंदाज घेता येऊ शकतो.
* जंगलात अनेकदा रस्तेच नसतात. त्यावेळी सायकल उचलण्याचा प्रसंग येतो. म्हणून तुमच्याकडे कमीतकमी सामान ठेवा.
* जंगलातील रस्त्यांवर ट्रेकर्सही असतात. त्यामुळे सायकलस्वार मागून येत आहे याची त्यांना कल्पना देणं आवश्यक आहे. जंगलातील इतर ट्रेकर्स आपल्या ओळखीचे नसतील तरी त्यांच्याशी संवाद साधणं आवश्यक आहे. जेणेकरून गरज पडल्यास त्यांची मदत आपल्याला मिळू शकते.
* सायकलवर असताना एका हातात कॅमेरा धरून फोटो, व्हिडिओ काढण्याचं साहस करणं टाळा. शक्य असल्यास गो-प्रोसारख्या कॅमेऱ्याचा वापर करा. नाहीतर सायकल थांबवून फोटो किंवा व्हीडिओ शूट करा.
* जंगलात रात्रीचं सायकलिंग करणं टाळा.
* हेल्मेटचा वापर आवर्जून करावा.
* सायकल रिपेरिंग किट जवळ बाळगणं अतिशय गरजेचं आहे.
प्रशांत ननावरे prashant.nanaware@expressindia.com