सातारा वन विभागाच्या महाबळेश्वर वनक्षेत्रात ८४.४८ हेक्टर एवढे क्षेत्र गुरेघर वनसंशोधन केंद्राने व्यापले आहे. समुद्रसपाटीपासून याची ऊंची १३०० मीटर एवढी आहे. १३ सप्टेंबर १९५६ च्या शासन निर्णयानुसार औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी पाचगणी-महाबळेश्वर मार्गावर पाचगणीपासून ६ कि.मी अंतरावर या केंद्राची स्थापना करण्यात आली. त्यानंतर १९७० साली केंद्राचा विस्तार करण्यात आला.

हे वनक्षेत्र पश्चिमेकडील दक्षिण कटिबंधीय डोंगराळ-वने या प्रकारात मोडते. येथे वार्षिक पर्जन्यमान दोन हजार मि.मी एवढे आहे तर तापमान जास्तीतजास्त ३६ आणि कमीत कमी १२ अंश से. इतके असते. इथली जमीन जांभ्या दगडाची आणि आम्लयुक्त आहे. ही सगळी एवढी माहिती सांगायचं कारण म्हणजे हे वन संशोधन केंद्र भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी विदेशी प्रजातींच्या प्रारंभिक चाचणीचे माहेरघर आहे. उदा. अगॅथस रोबस्टा (ऑस्ट्रेलिया), कॅरीबिया (कॅरिबीयन बेटे),पायनस पेट्युला (मॅक्सिको) इ. याशिवाय हिमालयाच्या परिसरामध्ये आढळणाऱ्या सुचीपर्णी वृक्षांमधील पाइन्स, क्युप्रेसस वृक्षांच्या प्रकारापासून दक्षिण भारतातील चहा, कॉफी, दालचिनी, निलगिरी, कापूर यांसारख्या वैशिष्टय़पूर्ण उष्णकटिबंधीय रुंदपर्णी वृक्षांच्या प्रजातींची प्रायोगिक लागवड येथे करण्यात आली आहे.

जगातील विविध हवामानातील, विविध भौगोलिक परिस्थितीत वाढणाऱ्या विशिष्ट वनस्पतींची एकाच ठिकाणी झालेली उत्तम वाढ येथे पहायवयास मिळते. येथील रोपवाटिकेमध्ये प्रायोगिक रोपवनासाठी तसेच स्थानिक लोकांची मागणी असलेल्या प्रजातींची जवळपास १५ ते २० हजार रोपे तयार करण्यात येतात. यामध्ये आवळा, नरक्या, क्युप्रेसस, क्रोकार्पस, सिल्व्हर ओक, सुरु, बेडकी, टेटु, ब्रह्मानंद यांसारख्या प्रजातींचा समावेश आहे.

येथे निलगिरी प्रजातींच्या विविध प्रकारांच्या (प्रजातींचा) संग्रह करण्यात आला आहे. निलगिरीच्या एकूण ९ प्रकारांची विविध वर्षांमध्ये ३५ प्रयोगाद्वारे लागवड करण्यात केंद्र यशस्वी झाले आहे. उदा. युकॅलिप्टस ग्रॅण्डीस, युकॅलिप्टस रोबस्टा, युकॅलिप्टस सेलिग्ना इ. येथे पायनस प्रजातींच्या विविध प्रकारांचा देखील संग्रह आहे. पायनस प्रजातींच्या एकूण ७ प्रकारांची साधारणत: ३२ प्रयोगांद्वारे प्रायोगिक लागवड विविध वर्षांमध्ये करण्यात आली आहे. यात पायनस कॅरिबिया, पायनस केशिया, पायनस रॉक्सबर्गाय यांसारख्या प्रकारांचा समावेश आहे.

क्युप्रेसस प्रजातींच्या एकूण ६ प्रकारांची १२ प्रयोगाद्वारे लागवड करण्यात ही केंद्र यशस्वी झाले आहे. १९६८ साली सुचीपर्णी वृक्षांचा संग्रह (कोनीफेरेटम) तयार करण्यात आला. क्युप्रेसस टोल्यूरोझा, पायनस इलिओटी, स्रेडस देवदारा यासारख्या प्रकारांचा त्यात समावेश आहे. बांबू सेटममध्ये बांबूच्या विविध प्रजातींची लागवड ही येथे करण्यात आली आहे.

वनसंशोधन केंद्र आणि आसपासच्या परिसरामध्ये १ ते २ प्रकारचे आíकड नैसर्गिकरीत्या आढळून येतात आíकड प्रजातींच्या अभ्यासकांना विविध प्रजाती एकाच ठिकाणी अभ्यासासाठी उपलब्ध होत नाहीत. ही उणीव लक्षात घेऊन या केंद्रात एकूण २९ प्रकारची ऑíकड उत्तरपूर्व भारत, केरळ, तापोळा, महाबळेश्वर, दाजीपूर या ठिकाणांहून आणून त्याची लागवड करण्यात आली आहे.

गुरेघर संशोधन केंद्रामध्ये स्थानिक, बाहेरील आणि परप्रांतीय बियांची जलद आणि जास्तीतजास्त बीजांकुरणासाठी योग्य पद्धत शोधून त्या रोपांची वाढ या क्षेत्रात कशी होते याचा अभ्यास केला जातो.  ज्या वनस्पतींची वाढ या क्षेत्रात चांगल्याप्रकारे होत आहे अशा वनस्पतींची कमीतकमी खर्चात जास्तीतजास्त चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी आवश्यक असलेले तंत्र ही येथे शोधले जाते.

गुरेघर वन संशोधन केंद्रात आजपर्यंत सुमारे ४७ औषधी, २५ सुचीपर्णीय वनस्पती आणि १०० हून अधिक इतर प्रजातींचा अभ्यास करण्यात आला आहे. यापैकी पिसा, वेखंड, कापूर, दालचिनी, जायफळ, मिरी, दमाकावळी, फणस, बांबू, सुरु, कॉफी, निलगिरी, जांभूळ, सिल्व्हर ओक, सोनचाफा, कॅज्युरिना, क्युप्रेसिस, पाइन्स, मोरपंखी, हिरडा., अगॅथस रोबस्टा अशा प्रजातींची वाढ चांगली झाल्याचे दिसून आले आहे.

पिसा आणि हिरडा या महत्त्वाच्या वनस्पतींची बीजांकुरण जलद आणि जास्त प्रमाणात होण्यासाठी केंद्राने प्रयोग केलेले असून पिसा प्रजातीचे ९० टक्के तर हिरडा प्रजातीचे ७० टक्के बिजांकुरण मिळालेले आहे. निलगिरीच्या विविध १८ प्रजातींची लागवड केल्यानंतर त्यापैकी युकॅलिप्टस ग्रँडीस, युकॅलिप्टस हायब्रीड, युकॅलिप्टस रोबस्टा या प्रजातीची वाढ समाधानकारक असून या जाती इतर ठिकाणी लावण्यास हरकत नसावी असा निष्कर्ष या अभ्यासातून निघाला आहे. निलगिरी व्यतिरिक्त सोनचाफा, सिल्व्हर ओक या वनस्पतींची वाढ गुरेघर संशोधन केंद्रात आणि आजुबाजूच्या परिसरात चांगली होत असल्याचे आढळून आले आहे. असेच काहीसे सुचीपर्णी वृक्षांबाबतीत देखील दिसून आले आहे.

सातारा वन विभागामध्ये सिल्व्हर ओक, युकॅलिप्टस ग्रॅन्डीस, पिसा आणि अब्रोकार्पस या वनस्पतींची लागवड महाबळेश्वर आणि पाटण येथील वनक्षेत्रात करण्यात आली आहे. जैवविविधतेचे मानवनिर्मित नंदनवन असे या केंद्राचे वर्णन केले जाते. विद्यार्थी, संशोधक विशेषत: वनस्पती शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी येथे खूप वाव असून हे केंद्र पर्यटकांना आकर्षति करत आहे. वनसंपदेने संपन्न असे गुरेघर वन संशोधन केंद्र पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाले आहेच; पण ते संशोधकांसाठी एक संदर्भ केंद्रदेखील आहे. वनस्पतीशास्त्रात संशोधन करून नवीन काही तरी करून दाखवू इच्छिणाऱ्यांसाठी हे केंद्र एखाद्या मार्गदर्शकाप्रमाणे मदतीला पुढे येते.

या केंद्राला भेट दिल्यास अनेक नवनवीन गोष्टी माहीत झाल्याखेरीज राहात नाहीत. तुम्ही या केंद्राला भेट देण्यासाठी महाबळेश्वरला येताच  सभोवतालचा हिरवाकंच निसर्ग तुमच्यावर गारुड घातल्याखेरीज राहात नाही. या केंद्राला भेट म्हणजे पर्यटनाच्या मौजेला ज्ञानाची जोड दिल्यासारखेच आहे.

डॉ. सुरेखा म. मुळे drsurekha.mulay@gmail.com