परिसस्पर्शाचं माहीत नाही पण एकदा सुवर्णस्पर्श झाला तर माणूसच काय अगदी गावाचेही चित्र पालटू शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे ऑस्ट्रेलियातील बल्लारात हे टुमदार शहरवजा गाव. १८५१ मध्ये इथे सोन्याच्या खाणींचा शोध लागला आणि या चिमुकल्या गावाचा बघता बघता कायापालट झाला. बल्लारातमधील सोवरिन हिलला भेट दिल्यानंतर आपण पाहता पाहता सोन्याच्या जादुई दुनियेत प्रवेश करतो आणि  आपली भटकंती समृध्द होते.

ऑस्ट्रेलिया हा मुळातच निसर्गाच्या विविध रंगांत रंगलेला देश. भटकंतीसाठी अगदी उत्तम पर्याय. अशाच रपेटीत आपण येऊन पोहोचतो ते बल्लारातमध्ये वसलेल्या सोवरिन हिल या संग्रहालयात. संग्रहालयाच्या तथाकथित संकल्पनांपेक्षा काहीसे वेगळे असलेले हे संग्रहालय लगेच आपले लक्ष वेधून घेते. जवळपास २५ हेक्टरमध्ये वसलेल्या या सोवरिन हिलचा निम्मा भाग हा आऊटडोअर संग्रहालयाने व्यापलेला आहे. खरे तर हे संग्रहालय चार भिंतीत बंद नसून सोन्यांच्या खाण्यांच्या आसपासच्या परिसरात वसवलेले गाव आहे. संपूर्ण गाव हे आपल्याला थेट १८-१९ व्या शतकात घेऊन जाते. गावात प्रवेश करताच एक छोटासा ओहोळ आपल्या स्वागतास सज्ज असतो. गाव म्हटले की असा छोटा ओढा किंवा ओहोळ असणारच, यात काय नवीन..पण इथेच खरी गम्मत सुरू होते. आणि सोन्याच्या जादूई दुनियेत आपण खेचले जातो. या छोटय़ाशा ओहोळात सापडतं अव्वल नंबर सोने आणि मजेशीर गोष्ट म्हणजे आपण ते आपल्या हातांनी काढू घेऊ शकतो. ओहोळाच्या काठी बसून आपल्याला फावडय़ाच्या मदतीने पाण्याखालचा गाळ काढायचा असतो. तो गाळ एका घमेल्यात घेऊन तो हळूहळू गाळत जाऊन त्यात लपलेले सुवर्णकण शोधायचे असतात. पूर्वी सोनं असंच शोधलं जायचं म्हणे. सोनं शोधायची ही कला जर आपल्याला चांगली आत्मसात झाली तर मिळालेले सर्व कण आपले. असं हे संग्रहालय आपलं स्वागतच मुळी इतकं सुवर्णमय करते की पुढे काय असेल याची उत्सुकता शिगेला पोहोचते. आता आपण हळूहळू गावात शिरतो. आणि खरेच १८ व्या शतकात पोहोचलो की काय असा भास होऊ लागतो. त्या काळातील लोहार, सुतार इतकेच काय तर त्या काळातील चित्रपटगृहाचीही आपल्याला सफर घडते. पावलोपावली पायघोळ झगा आणि केसांवर नाजूकशी टोपरीसदृश बांधलेल्या बायका आपले तोंडभर हसून स्वागत करतात अन् अचानक दाणदाण पाय आपटल्याचा आवाज येतो. ‘‘परेड सुरू झाली, परेड सुरू झाली’’ म्हणत सगळे जण मोकळ्या मदानाकडे जमा होतात आणि गावाच्या एका गल्लीतून कुठूनशे दहा-पंधरा सनिक पारंपरिक लाल सनिकी पोशाखात रुबाबात चालत येतात. ते संचलनही अगदी पाहण्यासारखे असते. अशाच एकेक गोष्टी न्याहाळताना आपण पोहोचतो कॅन्डी बनवण्याच्या कारखान्यात. कारखाना कसला तो.. छोटेखानी दुकानच ते. साखरेची ती आंबट-गोड गोळी आपल्यासमोर बनवून अगदी गरमागरम आपल्या हातात ठेवली जाते. या गोळीला लॉली असे म्हटले जाते. या लॉलीच्या मिटक्या मारता मारता ती कधी तोंडात विरघळून जाते हे कळतसुद्धा नाही.

सोन्याच्या खाणींच्या शोधामुळे इथल्या लोकांचे राहणीमानच बदलून टाकले हे चटकन जाणवते. अजून काय वेगळे असणार या विचारात असतानाच आपण पोहोचतो एका प्रात्यक्षिकाच्या ठिकाणी. आपल्यासमोर शुद्ध सोने वितळवले जाते आणि साच्यात ओतून तब्बल दहा लाख डॉलरपेक्षाही जास्त किमतीची वीट तयार केली जाते. इथली प्रत्येक छोटी गोष्ट पाहायला दिवस अपुरा पडतो. रात्री ‘ब्लड ऑन सदर्न क्रॉस’ नावाचा साऊंड आणि लाइट शो सादर केला जातो. रात्रीच्या कडकडणाऱ्या थंडीत हा शो एक वेगळी पर्वणी घेऊन येतो. खाणकामगारांनी तेथील ब्रिटिश सत्ताधाऱ्यांच्या पिळवणुकीविरुद्ध केलेला ‘युरेका उठाव’ यात दाखवला जातो. शो सुरू होतो पेक्षागृहात, तिथून तो नेला जातो पार खाणींच्या ठिकाणी आणि पुन्हा खुल्या बसेसमधून आणून तो संपतो तिथल्या विक्टोरिया थिएटरमध्ये. एकदा तरी पाहावाच अशा या शोला जाताना मात्र उबदार कपडे घालायला विसरता कामा नये. बल्लारातमध्ये वसवलेले हे गाव १८ व्या शतकातल्या खुणा अजूनही जपतेय, जतन करतेय. तिथे जवळच असलेले गोल्ड म्युझिअम त्याचीच साक्ष देते. जवळपास एक लाखांहून जास्त गोटींचा खजिना या संग्रहालयात दडलेला आहे. गोल्ड रशच्या संपूर्ण इतिहासाची माहिती या संग्रहालयात मिळू शकते. इथे अगदी पहिल्यांदा सापडलेल्या सोन्याच्या गोळ्याच्या प्रतिकृतीपासून ब्रिटिशांनी बाहेरून आणलेल्या सोन्यांचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. त्यात आपल्या भारतातून आणलेल्या ‘मोहर’चा पण समावेश आहे.

सकाळी सकाळी सोनं गाळण्यापासून सुरू होणारी ही सफर त्यापायी रक्त गाळलेल्या लोकांच्या लढाईच्या वर्णनात्मक साऊंड आणि लाइट शोला येऊन संपते. बल्लारातला भेट देऊन आल्यावर जाणवते, सोनं केवळ माणसाचंच नाही तर संपूर्ण गावाचं नशीबदेखील सहज पालटू शकते.

 प्राची साटम prachisatam14@gmail.com