मेघांच्या झुंबरांतून वाट करून श्रावणाची कोवळी उन्हे, मध्येच रिमझिम पाऊस सृष्टीचे साजिरे रूप आणखीनच  खुलवितो. यामुळे श्रावण म्हणजे भटक्यांसाठी पर्वणीच. रानवाटा तुडवत हा श्रावणसोहळा अनुभवण्याची मजा औरच.

आकाशाच्या घुमटात पाऊसभरल्या मेघांचे झुंबर विहरू लागले की आषाढ महिनाभरात सारी सृष्टी सजवून ठेवतो. मग पूर्ण महिनाभर त्याचा वेळ कसा निघून जातो हेच कळत नाही. हळूहळू हे निसर्गाचे इंटेरियर करून झाले की, निसर्ग पुढे येणाऱ्या सणांच्या स्वागतासाठी सज्ज होतो. मेघांच्या झुंबरांतून वाट करून श्रावणाची कोवळी उन्हे सृष्टीचे साजिरे रूप अजूनच खुलवितात. गाजावाजा करत कोसळणारे आषाढमेघ, धुवांधार पाऊस, सोसाटय़ाचा वारा, वाकलेली झाडे.. या साऱ्यांतून आषाढातली सृष्टी नुकत्याच वयात आलेल्या आणि सगळ्या बंधनांना झुगारून देऊन बंड करण्यास उतावीळ अशा नवथर तरुणीसारखी भासते. पण श्रावणाचे तसे नाही. अगदी अलगद, सोज्वळपणे धारा बरसणार, मागून हलकेच उन्हाची तिरीप त्याला इंद्रधनुषी रंगात रंगवून टाकणार. त्या नाजूक सप्तरंगी कमानीआडून ढगांचे स्वप्नातले इमले रचले जाणार. सारा भवताल चमचमता होणार. जणू लग्न होऊन नुकतीच सासरी आलेली नववधूच. सारे कसे एकदम नजाकतदार, डोळ्यांत इंद्रधनुषी स्वप्नांची चमक असलेली लावण्यवतीच. तसाच लज्जासुलभ घरभर वावर. न्हालेल्या केसांतून निथळणाऱ्या पाण्यासहित दोन भुवयांच्या मध्ये हळद-कुंकवाचे बोट लावून तुळशी वृंदावनाशी हात जोडलेली आणि साऱ्या घरावर सात्त्विक मोहिनी घालणारी.

श्रावणात एखाद्या टेकडीवर जाऊन निसर्गाचे रूप न्याहाळण्यात एक वेगळीच गंमत आहे. सृष्टीवर धरलेले मेघांचे छत्र, तिच्या अर्ध्या अंगावर सोवळे ऊन, त्यामुळे नारायणाने श्यामल मेघांना घातलेला रुपेरी जरीचा काठ. थंड हवेने त्या मेघांशी थोडी लगट करण्याचा अवकाश की तो अगदी तिच्या थंडगार स्पर्शाने वेडापिसा होऊन तिच्यामागे धावून बरसू लागतो. वर ढगांचा एक मोठ्ठा गोळा, त्यातून चमकणारी प्रकाशाची तिरीप, बरसणाऱ्या जलधारा, अर्ध्या  भागात सोनसळी ऊन, खाली तळाशी रेखलेली नदी.. अगदी वेड लागावे असे वातावरण. अशा श्रावणात छत्रीखाली दप्तर सांभाळत डबक्यांतून पाणी उडवत जाणारी शाळकरी पोरे, शाळेच्या स्कर्टच्या ओटीत रानभाजी भरून घरी आणणाऱ्या लाल रिबिनींच्या दोन वेण्या घातलेल्या पोरी, खाचरांतून भाताची मशागत करणारे बाप्ये.. श्रावणी व्रताचे सणवार उत्साहात करणाऱ्या भगिनी. सोमवारी शिवालयातून घुमणारा घंटेचा नाद, शनिवारी माळ करण्यासाठी रानातून पत्री गोळा करणाऱ्या परकरी पोरी. पंचमीच्या सणाला केवढा तो उत्साह. उंच झाडाला आकाशाशी लगट करू पाहणारे झोके, त्यासोबत खेळणाऱ्या तरुणी, त्यांचे खिदळणे.. या साऱ्यातून सृष्टीत सामावलेले श्रावणी चतन्यच वाऱ्यासवे आसपास विहरत असते. असे वातावरण अनुभवायला कूस उजवलेल्या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर भटकायला तर हवेच. अशाच श्रावणातल्या सोवळ्या सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी पुण्याजवळ कापूरहोळ-भोर रस्त्यावरचा नेकलेस पॉइंट हे ठिकाण अतिशय सुंदर. मुख्य रस्त्यावरून इंगवली गावाकडे जाणारा रस्ता फुटतो तिथून पायी चालत गेलो की नीरा नदीचे विस्तीर्ण खोरे सामोरे येते. हिरवाईच्या पाश्र्वभूमीवर नीरेचे पात्र असे काही घाटदार वळण घेते की जणू काही घरंदाज सृष्टीच्या गळ्यातला कंठाच. विस्तीर्ण आकाशात दाटलेले ढग, नदीचा विळखा पडलेले समृद्ध खोरे, पाणी भरलेली भातखाचरे, एक भातगिरणीची शेड, अधूनमधून विस्कटलेल्या वाडय़ावस्त्या.. एक खरेच नजरेचे पारणे फेडणारे दृश्य!

या श्रावणाच्या दिवसांत भटक्यांना खरे पाय फुटतात. पुण्यामुंबईच्या भटक्यांना एक हक्काची आणि अतिशय सोयीची जागा म्हणजे राजमाची. लोणावळा स्टेशनला उतरून तुंगार्लीच्या जलाशयाला वळसा घालून उधेवाडीची मळलेली वाट धरली की, चुकण्याची शक्यता नाहीच. साधारण पंधरा किलोमीटरची पायवाट प्रत्येक वळणावर सह्याद्रीचे एक आगळे रूपडे आपल्यासमोर ठेवते. या वाटेवर काय मिळत नाही? खळाळते निर्झर, हिरवाईने व्यापलेली पठारे, राकट सह्याद्रीचे कडे, तांबूस भिजट पायवाटा, उधाणलेले जलप्रपात, डोंगरांना फेटे बांधलेले ढग, चिंब पावसात न्हात उभ्या वाडय़ा, गोठय़ांच्या फटींतून पागोळ्यांचे पाणी जिभांवर झेलणारी जनावरे.. हे सारे मिळून पायपीट एवढय़ा मोठय़ा अंतराची असूनही त्याचा थकवा जराही जाणवू देत नाही. श्रावणाचा पाऊस काही आषाढासारखा धोधो करून अचानक ओढय़ांना पूर आणीत नाही, पण तरीही त्याचा अंदाज घेऊनच राजमाचीचे ओढेनाले पार केले तर ही आणि अशा अनेक रानवाटा एक आगळाच आनंद देतात. एवढय़ा पायपिटीनंतर संध्यासमयी माळावरल्या खोपटय़ात बसून कितीही अंधारून आले तरी हा श्रावणसोहळा अनुभवावा असा असतो. एखाद्या गवयाने रंगवून आणलेली सुरेल मफल जशी श्रोत्यांनी तल्लीन होऊन ऐकावी तसाच अनुभव. आपल्याला त्याच्याशी एकरूप करून टाकणारा, एक अजब मोहिनी घालून भुरळ पाडणारा आणि त्याच्या वेडात टाकणारा. ती असते शब्दश: अद्वैताची अनुभूती. आषाढात एक द्रुतताल धरून बराच वेळ जसा पाऊस कोसळतो तसे श्रावणाचे नाही. वेगवेगळ्या सतरंगी सुरावटींतले आलाप, बंदिशी, ठुमऱ्या यांच्या जडाव्याने मफल सजावी तसे श्रावणातल्या पावसाचे असते. मध्येच एखादी रिमझिम सर, अगदीच कधी तरी एखादा आभाळ फाटून यल्गार, कधी नुसतीच वीणेच्या तारेवर एकवार बोट फिरवावे तशी अलगद बुरबुर, कधी समेवर आल्यासारखा झिम्माड. पावसाचे हे सप्तसुरांचे गान आणि श्रोत्यांनी मुक्तहस्ते दाद दिल्यासारखा त्या मोकळ्या माळावरचा वाऱ्याचा उल्हासित उन्मेष!

अशीच एक आल्हाददायक अनुभव देणारी रानवाट म्हणजे महाबळेश्वर ते कास रस्ता. कच्चा गाडीरस्ता म्हणावा अशी ही सोप्पी वाट.. श्रावणात पायपीट करायला अतिशय सुंदर. दुतर्फा घनदाट जंगलांनी वेढलेली, धुक्यात लपेटलेल्या वळणावळणांच्या वाटेने आपण कासच्या दिशेने चालायला सुरुवात केली की सगळं भान हरवून जायला होतं. थोडं जास्त अंतर असलं तरी दिवसभर पायपीट करायला अतिशय सुंदर. अगदीच कंटाळा आला तर एखाद्या चुकार गाडी-टेम्पोला हात करून लिफ्ट मागून थोडे अंतर जायचे. घोटा-घोटा पाण्यातून ओहळ तुडवत वाटेच्या दुतर्फा फुलांचे गालिचे न्याहाळत रानात फिरणे म्हणजे एक आगळी मौज. तेरडा, सोनकी, चिरायत, कवळा अशी ओळखीची काही, रानहळद-गौरीहार-भंडिरा अशी नवलाची काही, ऑíकड-कळलावी अशी देवाच्या कौलाची (म्हणजे दुर्मीळ) काही. त्यावर साचलेले गुंजांसारखे पावसाचे थेंब पायांना मऊशार गुदगुल्या करतात, रंग डोळ्यांना सुखावतात, मन फुलपाखरू होते. या फुलावरून त्या फुलावर बागडते. नितळ पाण्याच्या डोहात डुंबते. कापूसढगांसवे रानभर उंडारू पाहते. रिमझिम पावसात झिम्माडते. श्रावणसरींत न्हाते, सोनसळी उन्हाने चमकून जाते, सतरंगी इंद्रधनुच्या रंगाने रंगून जाते. खरेच ‘खेळ मांडियेला..’ अनुभव!

पंकज झरेकर pankajzarekar@gmail.com