जगभरच्या विद्वानांना सर्वोच्च प्रतिष्ठेचे नोबेल पुरस्कार प्रदान करणारं ठिकाण म्हणून स्टॉकहोम प्रसिद्ध आहे. पण, त्यापलीकडे पर्यटकांना भुरळ पाडणारी अनेक पर्यटनस्थळं स्टॉकहोममध्ये आहेत. तेथील भ्रमंतीतून स्टॉकहोमचे बहुरंगी-बहुढंगी चित्र आपले पर्यटन समृद्ध करते.

‘स्टॉकहोम’ हे पूर्व युरोपातल्या स्वीडन या देशाचं सर्वात मोठं असं राजधानीचं शहर होय. मुंबईप्रमाणे स्टॉकहोम शहरासही ‘अनेक बेटांच्या समूहातून तयार झालेलं शहर’ असं म्हणता येऊ शकेल. अगदी जवळजवळ असणाऱ्या तब्बल १४ बेटांचं हे शहर आहे. ही सारी बेटं ५० छोटय़ा-मोठय़ा पुलांनी एकमेकांशी जोडली गेलेली आहेत. स्वीडन हा देश मुळातच उत्तरेकडील ध्रुवीय वर्तुळाच्या जवळचा देश असल्याने तिथे सूर्यप्रकाश कधी कमी तर कधी जास्त वेळ उपलब्ध असतो. इथे येणाऱ्या पर्यटकांना हिवाळ्यात बर्फावर स्कीईंग, आइस स्केटिंग, आणि वॉटर हायकिंग आणि उन्हाळ्यात सायकिलग, गिर्यारोहण, आणि डोंगर-दऱ्यांत कॅम्पिंग या गोष्टी ऋतुनिहाय करता येतात. स्टॉकहोम हे जगभरच्या विद्वानांना सर्वोच्च प्रतिष्ठेचे नोबेल पुरस्कार प्रदान करणारं ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध आहे. १९०१ सालापासून इथल्या आल्फ्रेड नोबेल नावाच्या एका वैज्ञानिकाच्या नावानं हे ‘नोबेल पुरस्कार’ देण्यास सुरुवात झाली. शिवाय जगभर ‘प्रति-नोबेल’ मानला जाणारा ‘स्टॉकहोम जल-पुरस्कार’ देखील या स्टॉकहोम शहरातूनच दिला जातो. जलव्यवस्थापनाच्या क्षेत्रात जगात फार मोलाची कामगिरी बजावणाऱ्या कोणत्याही एका तज्ज्ञाला तो दरवर्षी दिला जातो. जगभरच्या गुणी व्यक्तींचं भरभरून कौतुक करणाऱ्या या स्टॉकहोम शहराची अशी अनेक रूपं एकीकडे आहेत. तर दुसरीकडे दहशतवादामुळे हिंसेचं गालबोट लागलेलं एक भयाण रूपही अलीकडच्या काळात जगानं पाहिलेलं आहे. मध्यपूर्वेकडील वेगवेगळ्या देशांमधून येणाऱ्या सुमारे दीड लाख निर्वासितांना २०१५ साली या शहरानं सामावून घेतलं होतं. काही वर्षांपूर्वी  एका आत्मघाती दहशतवाद्यानं भर रस्त्यात स्फोट घडवून स्वत:ला नष्ट केलं होतं. यंदाच्या वर्षी सात एप्रिलला उझबेकिस्तानातून आलेल्या एका माथेफिरूने स्टॉकहोमच्या रस्त्यावर गर्दीत ट्रक घुसवला. आम्ही लगेच मे महिन्यात तिथे गेलो. त्यामुळे तिथल्या सुरक्षिततेविषयी मन थोडं साशंक होतं. पण तरीही विविध प्रकारच्या क्रीडा, साहसं, कला, शास्त्रं, गुणग्राहकता, जागतिक शांतता आणि दहशतवादी हिंसा अशी निरनिराळी रूपं लाभलेल्या स्टॉकहोम शहराला भेट देण्याची ती संधी मनातली उत्कंठा वाढवणारी होती.

स्टॉकहोम शहरात पाहण्याजोग्या अशा अनेक जागा आहेत. स्वीडिश पार्लमेंट, स्वीडिश पंतप्रधानांचं ‘सॅगर हाऊस’ नामक निवासस्थान, स्वीडनच्या राजाचा आलिशान महाल, एरिकसन ग्लोब नावाचं एक गोलाकार आणि प्रचंड मोठं स्टेडियम, अशा बऱ्याच देखण्या वास्तू तिथे आहेत. पण त्या सर्वापेक्षा जास्त रमणीय आणि निरनिराळे अनुभव देणारा असा एक रस्ता या शहरात आहे. आणि त्याचं नाव आहे ‘ड्रॉट्टिन्ग्गॅटन रोड.’ एकूणच स्वीडिश भाषेत अनेक जोडाक्षरं असणारे शब्द खूप आहेत. शिवाय त्यांचे उच्चारही फार अवघड असतात. ‘ड्रॉट्टिन्ग्गॅटन’ हा तसाच एक शब्द होय. हा अवघ्या दोन किलोमीटर लांबीचा रस्ता दक्षिणोत्तर असा पसरलेला आहे. या रस्त्यावर वाहनांना जाण्यास मज्जाव असतो. केवळ पादचाऱ्यांसाठीचा हा रस्ता आहे. इथे येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांसाठी हा एक मौजमजेच्या पायपिटीचा रस्ता झाला आहे. कोणत्याही देशात गेल्यावर तिथे पायी फिरल्याशिवाय आणि तिथल्या लोकांमध्ये मिसळल्याशिवाय त्यांच्या लोकजीवनाची आणि संस्कृतीची नीट ओळख होत नसते. ड्रॉट्टिन्ग्गॅटन रस्त्याच्या दुतर्फा नानाप्रकारची, सजवलेली दुकानं आहेत. तिथे डेली स्टोअर्स, शोभेच्या वस्तूंची दुकानं, उपाहारगृहं इत्यादींची रेलचेल असते. शिवाय रस्त्याच्या कडेला उभे असणारे फेरीवाले, वाद्यं घेऊन करमणूक करणारे गायक-वादक, नर्तक-नíतका, बहुरूपी, चित्रकार असे नानाप्रकारचे कलावंत या रस्त्यावरच्या गर्दीत होते. तसेच छोटय़ा-मोठय़ा हातगाडय़ांवर खाद्यपेयं विकणारे बल्लवाचार्यही तिथे होते. घोळक्या-घोळक्याने फिरणाऱ्या देशोदेशीच्या पर्यटकांच्या गर्दीने हा ड्रॉट्टिन्ग्गॅटन रोड अगदी फुलून गेलेला असतो. या देशात उन्हाळा हा एकच असा ऋतू आहे की जेव्हा पाऊस किंवा बर्फ पडत नाही. त्या काळात इथले स्थानिक लोकही नेहमीच काही ना काही निमित्ताने घरांतून बाहेर पडून या बहुरंगी रस्त्यावर फिरताना दिसतात.

एका पुलाखालच्या फुटपाथवर दुरून आम्हाला जुनी, जीर्ण, मळकी ब्लँकेट्स पांघरून बसलेल्या माणसाचा पुतळा दिसला. आम्ही जवळ जाऊन पाहिलं तेव्हा कळालं की तो माणसाचा नव्हे, तर फाटकी ब्लँकेट्स पांघरून बसलेल्या कोल्ह्यचा पुतळा होता. हा पुतळा लॉरा फोर्ड नावाच्या एका इंग्रज शिल्पज्ञ बाईनं २००८ साली तयार केलेला होता. या शहरातल्या श्रीमंत आणि सुखवस्तू लोकांना तिथल्या वंचितांच्या दारिद्रय़ाची आठवण द्यावी म्हणून इथल्या शहर-प्रशासनानं तो पुतळा फुटपाथवर बसवला होता असं कळालं. एका चौकाच्या कोपऱ्यावर असणाऱ्या बििल्डगची रस्त्याकडेची भिंत रंगीबेरंगी कागदी चिठ्ठय़ांनी भरलेली दिसली. तिथून येणारे जाणारे स्वीडिश नागरिक तिथे थांबून आपापली चिठ्ठी त्या भिंतीला चिकटवून पुढे जात होते. तिथे जाऊन पाहिलं तर त्या साऱ्या श्रद्धांजलीपर चिठ्ठय़ा होत्या.  सात एप्रिलच्या ट्रक हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या चार नागरिकांना श्रद्धांजली वाहून दहशतवादाचा निषेध करणारा मजकूर भिंतीवरच्या त्या चिठ्ठय़ांवर लिहिलेला होता.

पुढे तिथे रस्त्याच्या कडेला खाद्यपेयांचं एक दुकान होतं. दुकानाबाहेर खुर्च्यावर काही गिऱ्हाईकं बसलेली होती. आणि एक देखणं आणि हसतमुख तरुण जोडपं वाद्यं वाजवत नाचत-गात होतं. आम्ही थांबलो तोच त्या गाणाऱ्या तरुणीनं ‘कम ऑन सर, डान्स विथ मी’ असं म्हणत हात पुढे केला. तसे फिरंगी डान्स मी सिनेमात पाहिले होते, पण केले कधीच नव्हते. त्या सुंदरीसोबत दोन मिनिटं माझा पहिलावहिला बॉल डान्स केला. आम्ही तिथून निघालो, तेव्हा ते तरुण जोडपं अपेक्षेनं आपल्याकडे बघताहेत हे माझ्या ध्यानी आलं. मग खिशातून दोन युरो काढून मी तिच्या हातात ठेवले.  असे बहुरंगी, बहुढंगी अनुभव घेत स्टॉकहोम भटकण्यात खरंच मजा असते हे मात्र नक्की.

विजय दिवाण vijdiw@gmail.com