28 February 2020

News Flash

दुर्लक्षित विष्णुमूर्ती

निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या कोकणात अनेक आश्चय्रे, अनेक सुंदर मंदिरे आणि अत्यंत देखण्या मूर्ती आहेत.

निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या कोकणात अनेक आश्चय्रे, अनेक सुंदर मंदिरे आणि अत्यंत देखण्या मूर्ती आहेत. खरं तर इथे दडलेला खजिना संपूर्णपणे कोणीच पाहिलेला नाही. अगदी छोटय़ा छोटय़ा गावांमधूनसुद्धा एखादे अप्रतिम मंदिर किंवा शिल्प पाहायला मिळते. रत्नागिरी जिल्ह्यतील मंडणगड तालुक्यात अशीच एक अतिशय सुंदर विष्णुमूर्ती वसली आहे. एकांतात असलेल्या या ठिकाणी क्वचितच कोणी जाते; परंतु मुद्दाम वाकडी वाट करून इथे गेले पाहिजे. मंडणगड-दापोली रस्त्यावर मंडणगडपासून १२ किलोमीटरवर दहागाव लागते. इथे उजवीकडे जाणारा रस्ता धरायचा आणि ७ किलोमीटपर्यंत गेले की आपण शेडवईला जातो. गावाच्या थोडे अलीकडे काजू फॅक्टरीकडे एक कच्चा रस्ता जातो. या रस्त्यावरून जाऊ लागले की किंचित उतार लागतो आणि आपण एका ओढय़ावर येतो. या ओढय़ावर एक छोटा पूल आहे. तिथेच डाव्या हाताला आपल्याला दिसते श्रीकेशरनाथ मंदिर. कोकणी पद्धतीचे कौलारू असे हे साधे देऊळ आहे. पण आत गेल्यावर आपल्याला नेत्रसुखद अशी अप्रतिम विष्णुमूर्ती दिसते. हिरवटसर छटा असलेली ही मूर्ती अंदाजे साडेतीन फूट उंचीची आहे. अत्यंत शिल्पसमृद्ध अशा या मूर्तीच्या हातात पद्म-शंख-चक्र-गदा अशी आयुधे असल्यामुळे मूर्तीशास्त्रानुसार ती केशवाची मूर्ती होते. मूर्तीच्या डाव्या बाजूला श्रीदेवी अर्थात लक्ष्मी आहे, तर उजवीकडे गरुड शिल्पित केलेला दिसतो. मूर्तीच्या मस्तकाशेजारी मेहेकरच्या मूर्तीप्रमाणेच उजवीकडे ब्रह्मा तर डावीकडे शिवप्रतिमा दिसते. पाठीमागील प्रभावळीमध्ये दशावतार कोरलेले आहेत. मूर्तीच्या अंगावर भरभरून कोरलेले दिसतात. शेडवई मंदिराचा परिसर अत्यंत रम्य आहे. भरपूर झाडी, बाजूलाच असलेला बारमाही वाहणारा ओढा, नीरव शांतता आणि इथे आढळणारे विविध जातींचे पक्षी यांनी हा परिसर खरोखरच रमणीय झालेला आहे.

दापोलीच्या अगदी जवळ असलेले सडवे हे ठिकाण मात्र माहिती नसल्यामुळे पाहिले जात नाही. दापोली- सडवली- कोळबांद्रे माग्रे आपण सडवे गावी जाऊ शकतो. किंवा दुसरा मार्ग म्हणजे खेड- वाकवली- गावतळे माग्रे सडव्याला पोहोचू शकतो. जिल्हा परिषद शाळेसमोर एका उताराच्या रस्त्यावर आपल्याला दगडी प्रकारातील एक मंदिर दिसते. मंदिरासमोरील दीपमाळ आपले लक्ष वेधून घेते. याच मंदिरात आहे अतिशय सुंदर श्रीकेशवाची मूर्ती. देवाच्या उजव्या पायाजवळ गरुड आणि इतर परिवार देवता आहेत. इथले वैशिष्टय़ म्हणजे मूर्तीच्या पादपीठावर एक लेख कोरलेला आहे. देवनागरी लिपीतील आणि संस्कृत भाषेतील हा लेख सहज वाचता येतो. त्याचा अर्थ असा की, श्रीविष्णूची मूर्ती सुवर्णकार कामदेवाने केली आणि तिची स्थापना सोमवारी, रोहिणी नक्षत्रावर केली. शिवाय या विषयातील तज्ज्ञ मंडळी असेही सांगतात की, या काळात उत्तर शिलाहार राजा द्वितीय केशीराज याचा मांडलिक जैत्र सामंत याचा प्रधान देवूगीनायक इथे अंमलदार होता. पादपीठावर असा स्पष्ट कालोल्लेख असलेली मूर्ती अन्यत्र कुठे नसावी म्हणून हे ठिकाण विशेष ठरते. या दोन्ही दुर्लक्षित ठिकाणी दापोली परिसरातील पर्यटनाच्या वेळी आवर्जून भेट द्यावी.

ashutosh.treks@gmail.com

 

First Published on December 21, 2016 1:56 am

Web Title: vishnu statue
Next Stories
1 पचमढी – भेडाघाट
2 म्यानमारच्या तळ्याकाठी
3 हम्पीमधील गुहाचित्रे
Just Now!
X