मार्च-एप्रिल हा सुट्टय़ांचा हंगाम खास उत्तरेकडील हिमालयाच्या कुशीतील राज्यांसाठी राखीव असतो. पण त्यात अरुणाचलला तुलनेने कमीच प्राधान्य असते. ईशान्येकडील या राज्यात हिमालयाच्या भटकंतीचा आनंद तर आहेच, पण त्याचबरोबर सीमेवरच्या पर्यटनाचा अनोखा अनुभवदेखील घेता येतो.

केवळ पाच हजार फूट उंचीवर गोठलेल्या दवबिंदूंनी आच्छादलेलं गवताळ कुरण तुम्हाला अनुभवायचे आहे? तळ्यांच्या प्रदेशात भटकायचे आहे? जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोनेस्ट्री पाहायची आहे आणि थेट सीमेवर जाऊन पर्यटनाचा एक अनोखा आनंद घ्यायचा आहे? तर अरुणाचल प्रदेश हे त्यासाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणावे लागेल.

Pune records highest temperature in April in eleven years
पुण्यात अकरा वर्षांतील एप्रिलमधील सर्वाधिक तापमानाची नोंद; तापमानाचा आलेख कसा चढा राहिला?
Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प
Mukesh Ambani
जागतिक महाश्रीमंतांमध्ये मुकेश अंबानी नवव्या स्थानी; देशातील धनाढ्याच्या संपत्तीत वर्षभरात ४१ टक्क्यांची वाढ
over rs 3206 crore collected as stamp duty from raigad district
रायगड जिल्ह्यातून ३ हजार २०६ कोटींचे मुद्रांक शुल्क जमा

उगवत्या सूर्याचा प्रदेश म्हणून आणि १९६२च्या चीनबरोबरच्या युद्धातील मानहानिकारक पराभवाचा साक्षीदार म्हणूनच आपल्याला माहीत असलेला हा भाग. उत्तर पूर्व पसरलेल्या नगाधिराज हिमालयाच्या पर्वतरांगेतले हे उत्तर पूर्व टोक. पण हिमालयातील पर्यटनाइतकी चालना न लाभलेलं. आपल्या चिरपरिचित पर्यटनात येतं ते जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड. पण दहा पंधरा हजार फुटांपर्यंतच्या डोंगराळ प्रदेशांनी वेढलेल्या अरुणाचलमध्ये सृष्टीसौंदर्याची मुक्तहस्ते उधळण आहे. आजही अनेक जंगलं अस्पर्शित आहेत. येथे पठारी भाग तुलनेने कमीच. त्यामुळे शेती मर्यादित. वस्तीदेखील विरळच. अगदी दोनशे किलोमीटरच्या प्रवासात चहाची साधी टपरीदेखील सापडणार नाही. पण डोंगरातून थेट दहाएक हजार फूट खाली उतरणाऱ्या लोहीत, दिबांग, सियांग, सुबानसिरी, कामेंग अशा नद्यांनी विकसित केलेलं येथील जनजीवन, जंगलांचे मुक्तहस्ते उधळलेले सृष्टीवैभव ही याची खासियत. ब्रह्मपुत्रेने विराट रूप धारण करण्यापूर्वी ती अरुणाचलच्याच डोंगरातूनच वाहत येते.

किंबहुना सारं अरुणाचलच डोंगरउतारावर वसलेलं आहे. नामचा बारवा हे हिमालयातील शेवटचे शिखर तिबेटमध्ये अरुणाचलच्याच सीमेवर वसले आहे. डोंगर उतारावरूनच साऱ्या नद्या वाहतात आणि ब्रह्मपुत्रेला मिळतात. नद्यांच्या नावानेच येथील जिल्हेदेखील ओळखले जातात. जणू काही घोडय़ाच्या नालेच्या आकाराचा हा प्रदेश. तिबेट, म्यानमारच्या सीमांनी वेढलेला.

सुमारे दहा वर्षांपूर्वी येथे रस्त्यांचे प्रमाण अगदीच तुरळक होते, पण आता ते बऱ्यापैकी विकसित झाले आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळाली आहे. पर्यटन व्यावसायिकांच्या माध्यमातूनच नाही तर अगदी चार-पाच जणांच्या ग्रुपनेदेखील येथे आरामात भटकता येते.

अरुणाचलला जाण्यासाठी गुवाहाटी हे सर्वात सोयीस्कर ठिकाण. गुवाहाटीवरून एक-दोन दिवस काझीरंगा राष्ट्रीय अभयारण्य पाहून तेजपूरमार्गे आसामच्या सीमेवरील भालुकपाँग या ऑर्किडसाठी प्रसिद्ध ठिकाणी जावे. येथे ऑर्किडची प्रचंड विविधता आहे. महत्त्वाचं म्हणजे आसाम पर्यटन मंडळाची राहण्याची सुविधा आहे. येथून लगेचच आपण उंची गाठायला लागतो. वाटेत बोमदिला हे जिल्हा मुख्यालय लागते. भटकंतीचे खास आकर्षण पुढे आहे ते म्हणजे सेला पास. १४ हजार फूट उंचीवरील हे अरुणाचलमधील सर्वात उंच ठिकाण. सदैव बर्फाच्छादित. अतिउंचावरील हिमालयाचे सौंदर्य येथे अनुभवता येते. एप्रिल हा त्यासाठीचा सर्वात आनंददायी कालावधी म्हणावा लागेल. सेला पासजवळ जसवंत गड आहे. ६२च्या युद्धात जसवंतसिंग या सैनिकाने चिनी सैन्याला बराच काळ रोखून धरले होते. सध्या येथे सैन्यतळ आहे.

तेथून पुढे तवांगचा प्रवास साधारण तीन तासांचा आहे. तवांगला मुक्कामाच्या सुविधा तुलनेने बऱ्या आहेत. तवांगच्या पुढे बुमला पास च्यापुढे थेट भारत तिबेट सीमेवर जाता येते. त्यासाठी सेनादलाची परवानगी घ्यावी लागते. हवामानाच्या अंदाजानुसार ती परवानगी सहज मिळते. तवांगवरून जवळच असणाऱ्या सांगेत्सर लेकला आवर्जून भेट द्यावी.

गुवाहाटी-काझीरंगा-भालुकपांग-बोमदीला-सेला पास-तवांग अशी सात-आठ दिवसांची भटकंती अगदी आरामात होऊ शकते. अगदी स्वत: नियोजन करूनदेखील जाता येते.

अरुणाचलच्या अंतर्गत भागात इतर अनेक पर्याय आहेत, पण सर्वच ठिकाणी रस्ते आदी सुविधा विकसित झालेल्या नाहीत. त्यामुळे गुवाहाटी-इटानगर-झिरो-लखीमपूर-मजोली-जोरहाट-गुवाहाटी असा नितांतसुंदर प्रवास करता येतो.

इटानगर हे राजधानीचे शहर असल्यामुळे बऱ्यापैकी विकसित झाले आहे. येथे राहण्याची सुविधा चांगलीच आहे. एक दिवस मुक्काम करुन दुसऱ्या दिवशी झिरो गाठायचे. या गावाचे नाव जरी झिरो असले तरी सृष्टीसौंदर्यात ते हिरो आहे. फेब्रुवारीपर्यंत बर्फ वितळून जाते. नंतर विस्तीर्ण अशा गवताळ कुरणांवर मार्च-एप्रिलमध्ये दवबिंदू पडल्यानंतर सारी कुरणं अगदी हिमाच्छादित वाटू लागतात. पाच हजार फूट उंचीवर येथील तापमान शून्यापर्यंत जाते. त्यामुळेच याला झिरो हे नाव पडले आहे. या काळात बर्फ नसतो पण ते वातावरणच मनमोहक असते. हा अनोखा आनंद आवर्जून घ्यावा असा आहे. डोंगरांनी वेढलेले हे गाव अनुभवायला एक दिवस पुरेसा आहे. हॉटेल्सबरोबरच घरगुती पद्धतीची निवासव्यवस्थाही आहे. आपतानी या आदिवासी जमातीचे हे गाव. येथील जुनी बाजारपेठ पाहण्यासारखी आहे. सध्या तेथे एक तीस फुटी शिवपिंड सापडली. तेदेखील आकर्षण आहे. झिरोतली टॅली व्हॅली हीदेखील अशीच निसर्गसौंदर्याने नटलेली. टिपिकल हिमालयाची अनुभूती येथे मिळते.

झिरोवरून ब्रह्मपुत्रेच्या काठावर येतो. तेथे पसीघाटाकडे जाणारा महामार्ग ओलांडून पुन्हा आसाममध्ये यायचे ते मजोली बेटावर जाण्यासाठी. नदीमधले जगातील सर्वात मोठे असे हे बेट. आसामच्या जनजीवनच्या प्राचीन खुणा जपणारे. मजोली नितांतसुंदर असे बेट आहे. दोन दिवस येथे काढायला हरकत नाही. तेथून थेट विरुद्ध दिशेला म्हणजे जोरहाटला बाहेर पडायचे. जोरहाटजवळ जादव पायेंग या अतिशय हिकमती मेहनती माणसाने कोकिळामुख या बेटावर तयार केलेले- जोपासलेले जंगल पाहायचे, त्याच्याशी गप्पा मारायच्या. जोरहाट ते गुवाहाटी हा महामार्ग असल्यामुळे परतीचा प्रवास अगदी आरामात करता येतो.

अरुणाचल आता हळूहळू पर्यटनाच्या नकाशावर स्थिरावू लागले आहे. तेथील आदिवासी जमात फारशी मुख्य धारेशी जोडली गेलेली नाही. त्यामुळे भाषेच्या अडचणी येऊ शकतात. खाण्यापिण्याबाबत शक्यतो शाकाहारी असलेले उत्तम. आदिवासींचे उत्सव भरपूर आहेत. पण इतर राज्यांत पर्यटनाच्या दृष्टीने जसा वापर केला जातो तसा येथे फारसा दिसत नाही. तरीदेखील सात-आठ दिवस हिमालयाची अनोखी भटकंती करायची असेल अरुणाचल भटकायला काहीच हरकत नाही.

कधी जाल?

अरुणाचलमध्ये भटकायचे असेल तर तुम्हाला अंतर्गत भागात भटकण्याचा विशेष परवाना (इनर लाइन परमिट) काढावा लागतो.

गुवाहाटी, दिल्ली, तेजपूर, दिब्रुगड, कोलकाता या ठिकाणी असा परवाना छायाचित्र आणि सरकारी ओळखपत्र देऊन घेता येतो. तो सहज मिळतो. अरुणाचलमध्ये जाण्यासाठी सर्वोत्तम कालावधी मार्च-एप्रिल. मे महिन्यात पावसाची रिपरिप सुरू होते. ऑक्टोबर-नोव्हेंबर या पावसाळ्यानंतरच्या काळातदेखील जाता येते. पण त्याला मार्च-एप्रिलची मजा नाही.

हृषीकेश यादव hrishikeshyadav@hotmail.com